मुकुंद संगोराम

गेले चार दिवस कोविशिल्डच्या लसीचा दुसरा डोस मिळावा, म्हणून रोज पहाटे उठून घराजवळच्या सगळ्या लसीकरण केंद्रांवर हेलपाटे मारतोय. आज मिळाली एकदाची. कोविन या अ‍ॅपवर नोंदणी होणार नाही, असं सांगितलं पण तरीही त्यावर काही ठिकाणी ती होतेच आहे, असं लक्षात आलं. काय गौडबंगाल माहीत नाही. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असं वाचलं वृत्तपत्रांत, म्हणून खूप लवकर गेलो. तर तिथं आधीच कुणीतरी नावांची यादी करून ठेवलेली. म्हणे पहाटेच यावं लागतं, त्या यादीत नाव नोंदवण्यासाठी.

पुन्हा दुसऱ्या दिवशी, पहाटे उठून केंद्रावर जाऊन नाव नोंदवायचं ठरवलं. गाडगीळ दवाखान्यात पहाटेच गेलो, तर तिथे कुणीच नव्हतं. ना पालिकेचे कर्मचारी ना नगरसेवकाचे कार्यकर्ते. कुणीतरी माणूस आला, म्हणाला, यावर नाव लिहा आणि या साडेआठला. नाव लिहिलं, तेव्हाचा क्रमांक होता ८५. परत गेलो, तर ही गर्दी. तो नावं लिहिलेला कागद ज्या कुणाकडे होता, तो जागेवर नव्हता. मग बऱ्याच वेळानं आला तो. तर म्हणाला, ‘आज पन्नासच लसी येणार.’ म्हणजे आम्हाला मिळणार नाही तर. मग हीच यादी उद्यासाठी ठेवता नाही का येणार? तो म्हणाला, ‘उद्या पुन्हा यावं लागेल नाव लिहायला.’

मग कर्वेनगरच्या दुसऱ्या केंद्रावर गेलो. तिथं तर ही झुंबड. पण कुणी चार कार्यकर्ते टेबल टाकून नावं लिहून तरी घेत होते. माझा क्रमांक काहीतरी दोनशेच्या आसपास असल्यानं नाद सोडला. तिसऱ्या आणि चौथ्या ठिकाणी हीच स्थिती. दुसऱ्या दिवशी पुन्हा गाडगीळ दवाखाना. इथले नगरसेवक कोण असं कुणाला विचारलं, तर काय माहीत? असं उत्तर मिळालं. परत नावनोंदणी केली आणि आठ वाजताच गेलो. परत एकदा हिरमोड. पण थांबलो. एक आजोबा नाव नोंदवून गेले होते आणि परत येऊन आजींची वाट पाहत होते. तिथला कुणी अचानक उद्भवलेला नेतासदृश माणूस त्यांच्यावर खेकसला, ‘आता इथं जे आहेत, त्यांनाच मिळणार लस.’ आजोबा कावरेबावरे झाले. डोळ्यात प्राण आणून विनवण्या करत होते, पण आपण या लसीकरणाचे सर्वेसर्वा आहोत, असाच तिथल्या सगळ्यांचा आविर्भाव.

सगळी यंत्रणा ताब्यात घेणारे हे भलतेच कुणीतरी. म्हणजे नगरसेवक नाही, त्यांची माणसं नाहीत, दवाखान्याचे कर्मचारी नाहीत की महापालिकेच्या आरोग्य खात्याचे अधिकारी नाहीत. कुणीही उठतो आणि लसीकरण केंद्र ताब्यात घेतो, एखाद्या मतदान केंद्रासारखं. तिसऱ्या दिवशी जरा शक्कल लढवली. माझे मेव्हणे पहाटे  कोरा कागद घेऊनच पोहोचले. तर तिथं कागद तयारच होता. त्यावर सगळी नावं नोंदवून आले. (ही व्यवस्था नागरिकांनी आपली आपणच तयार केलेली. कारण कुठलीही यंत्रणा जागेवर आहेच कुठे.) नंबर मिळाला पंचेचाळीस. हायसं वाटलं. म्हणजे पन्नास लसी आल्या, तरी मिळतील. बरोब्बर आठ वाजता पोहोचलो, तर दवाखान्याचे दरवाजे बंद. पण नावं लिहिलेल्यांचा आणि लिहू इच्छिणाऱ्यांचा कोलाहल सुरू होता. कुणी स्थानिक त्या सगळ्यांना समजावण्याच्या प्रयत्न करत होता. मनात एक शंकेची पाल चुकचुकून गेली. आपलं नाव लिहिलेला कागद हरवला तर? तर पुन्हा उद्या पहाटे यायचं, अशी मनोमन तयारी करून उभा राहिलो.

नऊ वाजण्याच्या सुमारास कुणी एकाने दवाखान्याचा दरवाजा उघडला. तोवरही पालिकेचे कर्मचारी जागेवर नव्हतेच. तर तो म्हणाला, ‘ही लिहिलेली यादी वगैरे काही नाही. कुणाचं डोकं हे? आम्ही जाऊच देणार नाही कुणाला आत.’ पुन्हा पोटात गोळा. म्हणजे आजही नाहीच मिळणार बहुतेक लस. हे किती भयंकर मनस्ताप देणारं आहे! काही व्यवस्थाच नाही कुठे. सगळीकडे मनमानी. जो कुणी आवाज चढवून बोलेल, त्याला सगळ्यांनी फक्त घाबरायचं. कुणालाही जराही लाज वाटू नये या निर्लज्जपणाची? कोणत्या शहरात आहोत आपण? कुठे गेले नगरसेवक, कुठे गेले त्यांचे कार्यकर्ते, कुठे गेले पालिकेचे अधिकारी- कर्मचारी? सगळ्यांनी लाज गुंडाळून पळ काढला, तर सामान्यांच्या या हालअपेष्टांचं काय करायचं? कुणाला तरी जाणवतंय का हे रोज पहाटे होणारं रणकंदन. सगळ्या लसीकरणाचा शहरभर फज्जा उडालाय आणि येत्या आठ महिन्यांत निवडणुकीला उभे राहणाऱ्यांना त्याबद्दल जराही चाड नाही. एक तरी नगरसेवक रुग्णालयाबाहेर उभा राहून अडचणीत सापडलेल्यांच्या पाठीवरून हात फिरवताना दिसलाय का? एखादा अपवाद वगळता, किती नगरसेवक लसीकरण केंद्रावर रोज सकाळी उभा राहिल्याचं पाहिलंय? काय करतात हे सगळे, कुठून येतो हा आत्मविश्वास की आपण कसेही वागलो, तरी हेच मतदार पुन्हा आपल्यालाच मत देणार म्हणून. नगरसेवक, त्यांचे नेते या कुणालाही शहरभर काय सुरू आहे, याची जराही कल्पना असू नये, हे किती लज्जास्पद आणि आपण सारे किती हतबल आणि क्षीण!

येत्या निवडणुकीत मत देताना लस घेताना झालेले हाल आठवा म्हणजे झालं.