म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यानचा शंभर फुटी डीपी रस्ता उखडून तो काँक्रिटचा करण्याचा घाट घालण्यात आला आहे. रस्ते खोदाईला आयुक्तांनी बंदी केल्यानंतरही हे काम बुधवार (४ जून) पासून तातडीने सुरू केले जाणार आहे. त्यासाठीची आवश्यक यंत्रसामग्रीही मंगळवारी जागेवर आणण्यात आली. हा रस्ता सद्य:स्थितीत अतिशय चांगला असूनही कोटय़वधी रुपये खर्च करून तो काँक्रिटचा करण्यात येत असल्यामुळे या कामाला विरोध करण्यात आला आहे.
म्हात्रे पूल ते राजाराम पूल यांना जोडणारा हा रस्ता असून वारजे ते खराडी या नदीकाठच्या रस्त्याचे जे नियोजन करण्यात आले आहे, त्या रस्त्याचाच हा रस्ता एक भाग आहे. सध्या हा रस्ता डांबरी असून तो पूर्णत: चांगल्या स्थितीत आहे. तरीही आहे तो रस्ता उखडून या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. सध्या शहरभर गल्ली-बोळांचे काँक्रिटीकरण सुरू असून अनेक ठिकाणी आवश्यकता नसताना ही कामे केली जात आहेत. तसेच अनेक ठिकाणी ही कामे चुकीच्या पद्धतीनेही केली जात आहेत. तसाच प्रकार या रस्त्याबाबतही होत आहे. वारजे ते खराडी हा एकोणीस किलोमीटर लांबीचा प्रस्तावित रस्ता असून त्या अंतर्गत या रस्त्याचे काम केले जात असल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात नवसह्य़ाद्री चौक ते राजाराम पूल दरम्यानचा रस्ता काँक्रिटचा केला जात आहे. आधी काम आणि नंतर टप्प्याटप्प्याने पैसे या तत्त्वावर हे काम केले जात आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त विकास देशमुख यांनी दिले होते. त्यानुसार शहरातील ऐंशी टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे येत्या आठवडय़ात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकीकडे डांबरीकरण, रस्ते दुरुस्ती ही कामे वेगाने होत असताना दुसरीकडे मात्र एक महत्त्वाचा रस्ता उखडून त्याचे काम बुधवारपासून हाती घेतले जाणार आहे. पावसाळ्यात रस्त्यांची तसेच खोदाईची कामे करू नयेत, असा आदेश असतानाही महापालिकेकडून रस्त्याचे काम सुरू केले जात असून त्याला विरोध करण्यात आला आहे.
महापालिकेच्या अनेक आवश्यक कामांना निधी नसताना हेच काम प्राधान्याने हाती घेतले जात असल्यामुळे त्याबाबत आता शंका घेण्यात आली आहे. इतर आवश्यक कामे सोडून काँक्रिटीकरणाचा अट्टहास कशासाठी, असाही प्रश्न विचारण्यात येत आहे. मात्र, या कामाला पूर्वीच मंजुरी असल्यामुळे ते करण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dp road digging oppose pmc