नाटककार हा कधी आत्मकेंद्री नसतो. तर, तो सतत समूहामध्ये असतो. कलाकारांशिवाय नाटककाराला अर्थच उरत नाही, असे मत ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. नाटक पोहोचविण्यासाठी त्या ताकदीचे कलाकार मिळाले नाहीत तर, नाटककाराची ताकद क्षीण होत राहाते, असेही त्यांनी सांगितले. नाटकातून मला जे म्हणायचे ते कदाचित बेताचे असेल. त्याचा आवाका छोटा असेल. पण, मला जे म्हणायचे तेच मी नाटकामध्ये म्हणतो. याबाबत मी उर्मट आहे, असेही आळेकर म्हणाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे ‘नाटककार सतीश आळेकर’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रातील दुसऱ्या दिवशी डॉ. रेखा इनामदार-साने आणि वैभव आबनावे यांनी सतीश आळेकर यांची मुलाखत घेतली. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आणि ज्येष्ठ नाटककार दत्ता भगत यांच्या हस्ते आळेकर यांचा सत्कार करण्यात आला.
मी काही प्रगल्भ वगैरे नाटककार नाही. इंजिनीयर होऊ न शकलेला आणि वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळू न शकलेला सर्वसाधारण विद्यार्थी आहे. शनिवार पेठेतील मध्यमवर्गीय घरामध्ये मी वाढलो. माझे मामा विठ्ठलराव गाडगीळ यांच्यामुळे काँग्रेस, साधना कार्यालयाजवळ घर असल्याने राष्ट्र सेवा दल आणि शेजारीच मोतीबाग असल्याने संघविचार असे सर्वसमावेशक संस्कार माझ्यावर झाले. माझ्या बालपणी असलेला कनिष्ठ आणि उच्च मध्यमवर्ग ही सीमारेषा पानशेत पुरानंतर धूसर झाली, या आठवणींना उजाळा देत आळेकर म्हणाले, ‘मेमेरी’ ही पहिली एकांकिका मी ‘पीडीए’च्या शशिकांत कुलकर्णी याला वाचून दाखविली. ‘‘फर्स्ट क्लास, कळतच नाही. तू ‘सत्यकथे’ला पाठव’’, असे त्याने सुचविल्यानुसार मी ती पाठविली. राम पटवर्धन यांनी ती प्रसिद्ध तर, केलीच. पण, मानधन म्हणून १५ रुपयांचा धनादेशही पाठविला. त्यासाठी मला बँकेत खाते उघडावे लागले. ‘झुलता पूल’ एकांकिकेबाबत त्यांनी मला सुधारणा सुचविल्या. तेव्हा मी त्या प्रयोगात दिसतील, असे त्यांना सांगितले. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पारितोषिक मिळाल्यानंतर पटवर्धन यांनी ही एकांकिका सत्यकथेमध्ये प्रसिद्ध केली होती.
मी नाटक करतो तेव्हा नटमंडळी जवळ असावी लागतात. संच घेऊन फिरणे या वयात शक्य होत नाही. त्यामुळे आता नाटक लिहिले तरी ते दिग्दर्शित करेनच असे नाही, असे सांगून आळेकर म्हणाले, आम्ही नोकरी करून नाटक करू शकलो. आम्ही नाटकांबरोबरच वाढलो. आताची मुले गुणवान आहेत. पण, त्यांचे प्राधान्यक्रम बदलले आहेत. तालमीच्या जागी कमीत कमी वेळात पोहोचणे कठीण झाले आहे. गेल्या दोन पिढय़ांच्या अंगावर दृश्य माध्यमाचा मारा वाढला असून मंचीय आविष्कार हा अभिव्यक्तीचा भाग झाला आहे का आणि नाटकाशिवाय मांडता येणार नाही अशी अटकळ आहे का, या प्रश्नांची उत्तरे त्यांना शोधावी लागतील. जे लोकप्रिय नाही ते नाटक करायचे की नाही हेदेखील ठरवावे लागेल.
‘घाशीराम’ची सबसिडी
आम्ही करत असलेली नाटके म्हणजे थिएटर भाडे आणि जाहिरातीवरचाच खर्च अधिक. कलाकार हौसेखातर विनामूल्य काम करायचे. ‘घाशीराम कोतवाल’या नाटकाची सबसिडी मिळाली की त्या ग्रँटवर ‘बेगम बर्वे आणि ‘महानिर्वाण’चे प्रयोग होत असत, अशी माहिती सतीश आळेकर यांनी दिली.