हिंजवडी येथील आयटी कंपनीत ग्राफीक डिझायनर म्हणून काम करणाऱ्या रूपाली चव्हाण या महिलेच्या खून प्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर ससून रुग्णालयातून पळून गेलेला आरोपी गणेश ऊर्फ हनुमंत धोंडिबा ननावरे (रा. कवडेवाडी, ता. पुरंदर) याला तीन वर्षांनंतर अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. ननावरे पकडला गेल्यामुळे रूपाली चव्हाण खून खटल्याचे कामकाज होण्यास मदत होणार आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस कर्मचारी ननावरेच्या मागावर होते. पोलीस हवालदार बाबा शेख आणि माणिक पवार यांना ननावरे कुटुंबीयांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण वालतुरे यांच्या पथकाने बोपदेव घाटातील खडी मशिन चौकात सोमवारी सापळा रचून त्याला अटक केली. ननावरे पळून गेल्यानंतर चेन्नई येथे ट्रक चालक म्हणून काम करत होता. तो नेहमी रात्री ट्रक चालविण्याचे काम करायचा आणि दिवसभर ट्रकमध्ये झोपयाचा. पकडले जाण्याच्या भीतीने तो फोन वापरत नव्हता. तो काही वेळा पुण्यातही येऊन गेला होता, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे व सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी दिली.
हिंजवडी येथील एका आयटी कंपनीत रूपाली संतोष चव्हाण (वय २४) ही ग्राफीक डिझायनर म्हणून काम करत होती. याच कंपनीत ननावरे कॅबचालक म्हणून काम करत होता. तो दररोज रूपालीसह कंपनीतील कर्मचाऱ्यांना नेण्या-आणण्याचे काम करीत असे. रूपाली ही फुरुसुंगी येथे राहण्यास असल्यामुळे तिचा उतरण्याचा स्टॉप शेवटचा होता. या काळात ननावरे रूपालीवर एकतर्फी प्रेम करू लागला. त्याने रूपालीला त्याबाबत विचारल्यानंतर तिने त्याला नकार दिला होता. त्यामुळे तो चिडून होता. २ एप्रिल २००७ रोजी सायंकाळी रूपाली कंपनीच्या बसमधून सोलापूर बाजार जवळ उतरली. तेथून ननावरे याने तिचे मोटारीतून अपहरण केले. त्यानंतर तिचा भोर परिसरात खून करून वरंधा घाटात मृतदेह फेकून दिला. या प्रकरणी ननावरेला पोलिसांनी अटक केली होती.
या खून प्रकरणी पोलिसांनी ननावरेवर न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले होते. एप्रिल २००७ पासून तो येरवडा कारागृहात होता. ननावरे याला उपचारासाठी १२ जून २०१० रोजी रुग्णालयात आणले असता पाणी पिण्याच्या बहाण्याने तो पळून गेला होता. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ननावरे पळून गेल्यामुळे रूपाली चव्हाण खून खटला रखडला होता.
संग्रहित लेख, दिनांक 18th Sep 2013 रोजी प्रकाशित
उपचारादरम्यान पळालेल्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना तीन वर्षांनंतर यश
ननावरे पळून गेल्यानंतर चेन्नई येथे ट्रक चालक म्हणून काम करत होता. तो नेहमी रात्री ट्रक चालविण्याचे काम करायचा आणि दिवसभर ट्रकमध्ये झोपयाचा. पकडले जाण्याच्या भीतीने तो फोन वापरत नव्हता.

First published on: 18-09-2013 at 02:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fugitive accused nanavare arrested after three years