कर्वे रस्त्यावरील ‘गॅलेक्सी केअर इन्स्टिटय़ूट’ला सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागण्याची जी घटना घडली, त्यात सर्व रुग्णांना सुखरूप हलवण्यात यश आले, तरी रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा योग्यप्रकारे कार्यान्वित नव्हती तसेच इमारतीच्या वापरातही अनेक नियमबाह्य़ बदल करण्यात आल्याची वस्तुस्थिती या निमित्ताने समोर आली आहे. संबंधित डॉक्टर महापालिका आयुक्त महेश पाठक यांचे नातेवाईक असल्यामुळेच अनेक आक्षेप असतानाही या रुग्णालयाला नोंदणीपत्र देखील तातडीने मिळाल्याची जोरदार चर्चा आहे.
या रुग्णालयाने नवीन नोंदणीसाठी अर्ज केल्यानंतर आरोग्य कार्यालयाने त्याबाबत अनेक आक्षेप घेतले होते व त्यांची पूर्तता केल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनाही कळवले होते. अर्जासोबत जी विविध कागदपत्रे व परवाने सादर करायचे होते, त्यात अग्निशमन दलाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ही सादर करणे आवश्यक होते. त्याबरोबरच नोंदणी अर्जातील नाव व जागेच्या कराच्या पावतीवरील नाव यात तफावत होती. जागेबाबतचा लिव्ह अ‍ॅन्ड लायन्सेसचा करारही डिसेंबर २०११ मध्येच संपला होता. त्याबरोबरच महापालिकेच्या बांधकाम खात्याने मान्य केलेले पहिल्या व दुसऱ्या मजल्याचे नकाशे आणि प्रत्यक्षातील जागेचा वापर यात मोठीच तफावत होती. तसा स्पष्ट अहवाल सहायक आरोग्य प्रमुखांनी २९ मार्च २०१२ रोजी आरोग्य प्रमुखांना सादर केला होता. तसेच संबंधितांना परवाना द्यावा किंवा कसे, अशी विचारणाही आरोग्य प्रमुखांकडे करण्यात आली होती.
अशाप्रकारचे अनेक गंभीर आक्षेप नोंदवल्यानंतरही आरोग्य प्रमुखांनी संबंधित रुग्णालयाला २४ मे २०१२ रोजी नोंदणी प्रमाणपत्र दिले. त्याची मुदत ३१ मार्च २०१३ पर्यंत होती. विविध आक्षेपांची पूर्तता झालेली नसतानाही हे प्रमाणपत्र संबंधित डॉक्टर आयुक्तांचे नातेवाईक असल्यामुळेच दिले गेले, अशी चर्चा महापालिकेत सर्वत्र सुरू आहे. रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे, असे रुग्णालयाकडून सांगितले जात असले, तरी ही यंत्रणा पुरेशी नव्हती आणि ती योग्य रीत्या कार्यान्वित नव्हती, ही वस्तुस्थिती आहे. आगीनंतर काही वेळ रुग्णालयात असलेल्या यंत्रणेच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर लगेचच अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. दरम्यान, या घटनेबाबत आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.