शहरातील अनेक सिग्नलसह पादचाऱ्यांसाठी बसवण्यात आलेले बहुतेक सर्व सिग्नल बंद असले, तरी या सिग्नलच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मात्र तब्बल ४८ लाख रुपयांची निविदा स्थायी समितीने मंगळवारी एकमताने मंजूर केली.
पुणे महापालिका तसेच पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील सर्व सिग्नलच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पुणे महापालिकेकडे आहे. या तिन्ही हद्दींमध्ये मिळून १७२ सिग्नल आहेत. तसेच पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे शक्य व्हावे यासाठी पादचारी वाहनांसाठी लाल दिवा लावू शकतील, अशा प्रकारचे पादचारी सिग्नलही शहरात १६ ठिकाणी बसवण्यात आले आहेत. प्रमुख चौकांमधील अनेक सिग्नल फक्त शोभेपुरतेच असून अनेक सिग्नल वारंवार बंद असतात. त्याबरोबरच १६ पादचारी सिग्नलमधील अपवादात्मक एखाद-दोन सिग्नल चालू स्थितीत आहेत. उर्वरित सर्व सिग्नल बंद आहेत. तरीही या सिग्नलच्या देखभाल-दुरुस्तीपोटी एका कंपनीला ८८ लाख १३ हजार २०० रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला. एका वर्षांच्या कामासाठी ही रक्कम देण्यात येणार आहे.
क्रीडा संकुलाचे गौडबंगाल
खराडी सर्वेक्षण क्रमांक ४ येथे महापालिकेने उभारलेल्या क्रीडा संकुलाच्या क्रीडा वसतिगृहासाठी तब्बल पावणेतीन कोटी रुपयांची निविदाही स्थायी समितीने मंगळवारी घाईगर्दीने मान्य केली. हा प्रस्ताव आयत्यावेळी मांडण्यात आला आणि तो लगेचच मान्य करण्यात आला. अंदाजपत्रकात या क्रीडा संकुलासाठी वेगवेगळ्या तरतुदी आहेत. मात्र, त्या कामांसाठी त्या तरतुदी खर्च न करता त्या रकमा वसतिगृहासाठी वापरल्या जाणार आहेत. या खर्चाला भारतीय जनता पक्षाचे हेमंत रासने आणि शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार यांनी जोरदार आक्षेप घेतला.
मूळ प्रकल्प काय आहे आणि वाढीव खर्च कोणत्या कामावर व कोणत्या तरतुदीमधून केला जात आहे, याबाबत बैठकीत अधिकाऱ्यांना समाधानकारक खुलासा करता आला नाही. तसेच वसतिगृहाची बांधणी हे महापालिकेचे काम आहे का, या प्रश्नावरही मौन बाळगण्यात आले आहे.