गेल्या काही शतकांमध्ये भारतीय घरांमधील पक्षीप्रेम कबुतर आणि पोपट यामध्ये अडकलेले होते. शहर, गावातील जहागिरदार, वतनदार असण्याच्या लक्षणांमध्ये त्यांच्याजवळील कबुतर आणि इतर पाखरांचा ताफा हा एक महत्त्वाचा घटक असे. भारतीय पोपट बाळगणे हा सत्तरच्या दशकात कायद्याने गुन्हा ठरला. तरीही कारवाई होत नसल्यामुळे जंगलातल्या किंवा घरातील झाडांच्या ढोलीमधील पोपटांची पिलावळ पिंजऱ्यात कैद करण्याची ही टूम कोकण, घाटामधील पट्टय़ात अजूनही कायम आहे, पण गेल्या दोनेक दशकात परदेशी पाखरांनी भारतीय पेट बाजारात सहज शिरकाव केला आणि त्यांच्या प्रजोत्पादनाच्या व्यवसायाने भारतीय बाजारपेठेत आपले बस्तान बसवले. पोपटानंतर रंगीबेरंगी ‘लव्हबर्ड्स’ची ओळख भारतीय बाजारपेठेला झाली. सतत किलबिलणाऱ्या या रंगीबेरंगी पक्ष्यांचा पिंजरा हा दर दोन इमारतींमागे एखाद्या तरी खिडकीत किंवा गॅलरीत दिसू लागला. सध्या अधिकाधिक दुर्मीळ किंवा वेगळा पक्षी बाळगण्याची असोशी प्राणी पालकांमध्ये दिसून येते. गेल्या दशकभरात या उद्योगाची उलाढाल दरवर्षी शंभर कोटीहून अधिक होत असल्याचे या बाजारपेठेचा अभ्यास करणाऱ्या संस्थांच्या अहवालातून समोर येते.
* विस्तार का?
पूर्वी प्राणीपालनाचा विचार करताना कुटुंब कुत्रा किंवा मांजर या पर्यायांपलीकडे विचार करीत नव्हते. कुत्री किंवा मांजर बाळगण्यापेक्षा कमी प्रमाणात लागणारे श्रम आणि वेळ, काळजी घेण्याची आवश्यकता असली तरी प्रमाणबद्ध खाणे, कमी जागा आणि परदेशी प्रजाती बाळगण्याला चिकटलेली सामाजिक प्रतिष्ठा अशा अनेक जमेच्या बाजू हौशी पालकांनी हेरल्या आणि प्राणीपालनाकडून आता पक्षीपालनाकडे असा या बाजारपेठेचा प्रवास सुरू आहे. प्रतिसाद देण्याची क्षमता आणि इतर प्राण्यांच्या तुलनेने जास्त आयुर्मान अशा अनेक कारणास्तव परदेशी पक्ष्यांना पसंती मिळाली. ऑनलाईन बाजारपेठेने या उद्योगाला आता अधिक बळ दिले. संकेतस्थळावरून नोंदणी करून हे पक्षीदेखील आता घरपोच मिळतात.
* आवडीचे मोल..
कुत्री आणि मांजराप्रमाणेच हे पक्षीही आपल्या मालकाला लळा लावतात. या पक्ष्यांची प्रतिसाद देण्याची क्षमता खूप असते. सर्वात स्वस्त म्हणून परदेशी लव्हबर्ड्स, त्याच आकाराचे विविध रंगांचे पोपट यांना हौसेनी बाळगले जात आहे. पण त्यापलीकडे खास वैशिष्टय़ांचा अभ्यास करून लाखो रुपये ओतून पक्षी खरेदी केले जातात. सध्या मूळचा ब्राझीलमधील निवासी ‘मकाऊ’, आफ्रिकेतील ‘ग्रे पॅरेट’, ‘ऑस्ट्रेलियातील ‘कोकॅटो’ आणि किंग पॅरेट या पोपटाच्या प्रजाती सध्या भाव खाऊन आहेत. साधारण ५० हजार रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत त्याच्या किमती आहेत. त्याशिवाय टुकान आणि फेजंट हे तुलनेने मोठे पक्षी आणि काही पाणपक्षी यांना आवर्जून मोठी हॉटेल्स किंवा अपवादात्मक प्रसंगी घरी पाळण्यासाठीही मागणी आहे. यांच्या किमती एक लाखाच्या पुढेच सुरू होतात. यांच्यापेक्षा थोडे लहान असे कनेरी, लॉरीकिट या प्रजातींना मागणी आहे. तुलनेने किंमत कमी, जागा कमी या जमेच्या बाजूंमुळे या पक्ष्यांचीही मागणी वाढते आहे. अगदी दोन हजार रुपयांपासून पुढे हे पक्षी मिळू शकतात.
‘हँड रेझ्ड’ किंवा ‘टॅम्पर्ड’ म्हणजेच पूर्णपणे कृत्रिम वातावरणात वाढवलेल्या पक्ष्यांना अधिक मागणी आहे. पिल्ले झाली की ती हाताळून त्यांना माणसांची सवय लावली जाते. ब्रिडरचं खाणे भरवून, निगा राखून त्यांना वाढवतात. त्यामुळे अनेकदा हे पक्षी घरात मोकळेही राहू शकतात.
* उद्योगाची स्थिती..
आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज बेटे, ब्राझील आणि इतर देशांमधून पक्ष्यांच्या विविध प्रजातींचे भारतात प्रजोत्पादन करण्याची सुरुवात दोन दशकांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये झाली. भारतीय पक्ष्यांना पाळण्यासाठी १९७२च्या वन्यजीव संरक्षण कायद्याद्वारे बंदी घातली गेली आहे. मात्र त्याच वेळी परदेशी जातीच्या पक्ष्यांना पाळण्यासाठी कोणतीच बंधने नाहीत. या पक्ष्यांचा व्यापार करण्यासाठी बंदी आली असली तरीही त्या नियमांमधील पळवाटा या व्यवसायाच्या पथ्यावरच पडल्या आहेत. गाय आणि इतर पशुपालनापेक्षा यातील फायदा मोठा आहे, हे लक्षात आल्यावर हा उद्योग वाढला. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामीळनाडू, राजस्थान, ओडिसा आणि आसाम या प्रमुख राज्यांमध्ये पश्चिम बंगालमधून पक्ष्यांचा पुरवठा झाला. रंगीबेरंगी आणि विविध आकारांचे पोपट, लव्हबर्ड्स आणि त्याचबरोबर देशाच्या विविध भागांत मिळणारा मुनिया हा चिमणीसारखा पक्षी यांच्या विक्रीचा व्यवसाय देशभरात बघता बघता पसरला. या उद्योगाची सुरुवात कोलकात्यातून झाली असली तरी गेल्या दशकभरात चेन्नई हे परदेशी पक्ष्यांच्या प्रजोत्पादनाचे माहेरघर बनले.
आता अनेक राज्यांमध्ये स्वतंत्ररीत्या परदेशी पक्ष्यांची ब्रिडिंग्ज होत आहेत. रीतसर कृत्रिम पर्यावरण निर्माण करून ब्रिडर्स परदेशी पक्षी बाजारात उपलब्ध करीत आहेत. सुरुवातीच्या काळात तगले की ही परदेशी पाखरे इथल्या वातावरणाला सहज स्वीकारतात. कायद्याने या उद्योगावरील बंधने आता अधिक कडक केली आहेत. तरीही मुळातच अर्निबधपणे वाढलेला हा पक्षी प्रजोत्पादनाचा उद्योग भविष्यात आणखी विस्तारणार आहे.
