न्यायालयात दाखल होण्याअधीच खटला तडजोडीने मिटविण्याची इच्छा असलेल्या पक्षकारांना आता वाट पाहात बसावे लागणार नाही. कारण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने शिवाजीनगर न्यायालयात ‘ मिडीएशन क्लिनिक’ सुरू केले आहे. दाखलपूर्व खटले सामोपचाराने आणि सामंजस्याने मिडीएशनद्वारे (मध्यस्थी) मिटवण्याची कायदेशीर प्रक्रिया प्रथमच या योजनेद्वारे पक्षकारासांठी सुरू करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य मिडीएशन सेंटरकडून राज्यातील सर्व जिल्हा न्यायालयात अशा प्रकारचे मिडीएशन क्लिनिक सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुण्यातील जिल्हा न्यायालयात मुख्य जिल्हा न्यायाधीश अनंत बदर यांच्या मार्गदर्शनाखाली हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. के मलाबदे यांनी सांगितले की, दाखलपूर्व खटले मिटवायचे असतील तर यापूर्वी लोकन्यायालयात किंवा महालोकअदालत मध्ये ते पाठविले जात. त्यासाठी रीतसर संबंधिताना नोटीस पाठवून खटला निकाली काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात असे. मात्र, आता मिडीएशन क्लिनीकद्वारे दाखलपूर्व खटले सामोपचाराने मिटवता येणार आहेत. दाखलपूर्व खटल्यांमध्ये वेळीच मार्गदर्शन मिळावे आणि पक्षकारांना खटले मिटविण्याची संधी मिळावी म्हणून मिडीएशन क्लिनीक सुरू करण्यात आले आहे. याबाबत काही पक्षकारांनी चौकशी केल्याचे मलाबदे यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mediation clinic started in shivajinagar court