छंद असणं हे वेगळंच रसायन असतं. काहींना वेगवेगळे छंद असतात. मला सूर ऐकण्याचा छंद आहे. लहानपणी गुरुजींनी कान ओढला. आता चांगले सूर ऐकू आले की कान त्याकडे ओढले जातात. पण, एकच छंद जोपासणे ही एका अर्थाने अवघड कला असते, असे मत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी शनिवारी व्यक्त केले.
राजा दिनकर केळकर संग्रहालयातर्फे नाना पाटेकर यांच्या हस्ते हिंदूी चित्रपट संगीतातील रागतत्त्वाचा वापर यावर संशोधनपर लेखन करीत चित्रपटगीतांचा संग्रह करणारे के. एल. पांडे यांना दिनकर गंगाधर ऊर्फ काका केळकर स्मृती छंद वेध पुरस्कार प्रदान करण्यात आला. डेक्कन कॉलेजचे कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर, राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगिरवार, नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर, सुधन्वा रानडे या वेळी उपस्थित होते. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ‘आपलं घर’चे विजय फळणीकर, ‘सैनिक मित्र परिवार’चे आनंद सराफ, विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलिसांच्या भोजनाची व्यवस्था करणारे विद्याधर अनास्कर आणि रक्तदाते दत्तात्रेय मेहेंदळे यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
हे जग इतकं छान आहे की ते पाहायला एक आयुष्य पुरणारे नाही. मेल्यावरही हे जग बघायचे आहे म्हणून मी नेत्रदान करणार आहे. पण, ज्याच्या नशिबी हे डोळे जातील त्याला काय बघावे लागेल हे सांगता येत नाही. चांगले चित्रपट येत असले तरी सध्या मंत्र्यांइतके विनोदी नट लोकांना पाहायला मिळत असतील तर, चित्रपट पाहायला जायलाच नको, अशी टिप्पणी करून नाना पाटेकर म्हणाले, काका केळकर यांनी ज्या परिस्थितीमध्ये ही संस्था सुरू केली ते कळाल्यावर या संग्रहालयाशी मी भावनिकपणे जोडला गेलो.
नाना सरांबरोबर काम करायला मिळाले हाच मोठा पुरस्कार असल्याचे सोनाली कुलकर्णी हिने सांगितले. पैसा आणि स्कोअरच्या कालखंडात आवड, छंद आणि पॅशनला महत्त्व असलेच पाहिजे. प्रकाश आमटे चित्रपट करून माझे आयुष्य बदलून गेले आहे, असेही तिने सांगितले.
संग्रह करण्याच्या छंदातून पुरातत्त्वशास्त्र आकाराला आले. या शास्त्राचा विविधांगी अभ्यास सुरू आहे, असे डॉ. देगलूरकर यांनी सांगितले. बोंगिरवार यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीकांत केळकर यांनी काका केळकर यांच्या कार्याची माहिती दिली. अरुणा केळकर यांनी प्रास्ताविक केले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patekar hobby art