‘श्री गणराय नर्तन करी’ या ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाच्या नांदीवर पदन्यास करणाऱ्या कलाकारांच्या रांगेतील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी वामनमूर्ती.. ‘सामना’मधील मास्तरांना सेवा देणारा वेटर.. ‘गाढवाचं लग्न’ चित्रपटातील राजा.. छोटय़ा पडद्यावरील ‘नाजूका’ मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेला ‘धम्र्या’.. अशा भूमिकांसह गणपती मंडळांच्या देखाव्यांमागचे शब्द-सूर ध्वनीमध्ये बांधण्यासाठी रात्र-रात्र जागविणारा तंत्रज्ञ.. ‘थिएटर अॅकॅडमी’चे एक संस्थापक-सदस्य.. शास्त्रीय संगीताच्या मैफली, जुनी हिंदूी
देखणा चेहरा आणि सर्वसाधारण माणसासारखी उंची याची उणीव आपल्यातील गुणवत्तेने भरून काढत गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ रंगभूमी, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि ध्वनिमुद्रण अशी चौफेर वाटचाल करणारे नंदू पोळ यांनी त्यांचा कलाप्रवास शब्दबद्ध केला आहे. मी काही मोठा नाव असलेला नट नाही याची मला जाणीव आहे. पण, वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे बालवयातच ‘साष्टांग नमस्कार’ नाटकापासून सुरू झालेला प्रवास हा निश्चितच समाधानकारक आहे. मित्रमंडळींशी गप्पा मारताना अनुभवांची पोतडी खुली होते. ‘नंदू, तू हे सारे लिहून का ठेवत नाहीस,’ असे अनेकांनी सुचविल्यामुळे मी हे लेखन केले आहे. वेगवेगळ्या माध्यमात विविध पातळ्यांवर काम करताना गाठीशी आलेला अनुभव गप्पांच्या ओघात यावा असा प्रयत्न लेखनातून केला आहे, अशा शब्दांत नंदू पोळ यांनी लेखनामागची भूमिका मांडली. नाटकामध्ये वैविध्यपूर्ण भूमिका मिळाल्या नसल्या, तरी चित्रपटामध्ये ही उणीव भरून निघाली. त्यामुळे माझ्या कारकीर्दीविषयी मी समाधानी आहे.
आवडीतून संपादन केलेल्या ज्ञानाचा वापर व्यवसायासाठी करावा या उद्देशातून स्टुडिओ सुरू केला. ‘पुरुषोत्तम करंडक’ स्पर्धेत ‘फोर ट्रॅक रेकॉर्ड’ सुरू केला. काळाबरोबर जाण्याच्या उद्देशातून डिजिटल रेकॉर्डिगचे तंत्रज्ञान आत्मसात केले. सध्या प्रायोगिक रंगभूमीवर उत्तम काम होत आहे. नवे रंगकर्मी स्वतंत्र विचाराने नाटक करण्याची क्षमता बाळगून आहेत. धडपडून उभे राहण्याची जिद्द हीच त्यांना प्रेरणा देत असून हा बदल नक्कीच आशादायी असल्याचे नंदू पोळ यांनी सांगितले. उत्कर्ष प्रकाशनतर्फे ‘मी नंदू पोळ’ या पुस्तकाचे शुक्रवारी (२ मे) ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. एस. एम. जोशी सभागृह येथे सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ आणि राहुल सोलापूरकर उपस्थित राहणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 30th Apr 2014 रोजी प्रकाशित
‘मी नंदू पोळ’ पुस्तकातून उलगडणार हरहुन्नरी कलाकाराचा जीवनप्रवास
गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ रंगभूमी, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि ध्वनिमुद्रण अशी चौफेर वाटचाल करणारे नंदू पोळ यांनी त्यांचा कलाप्रवास शब्दबद्ध केला आहे.

First published on: 30-04-2014 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nandu pol autobiography play actor