शाळा तपासणीला गेले असता नूमवी प्रशालेच्या प्राथमिक शाळेमध्ये कोंडून ठेवल्याचा आरोप शिक्षणविस्तार अधिकारी के. डी. भुजबळ यांनी केला आहे. मात्र, भुजबळ यांच्याकडून व्यक्तिगत त्रास दिला जात असून त्यांच्या विरूद्ध तक्रार करणार असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा माने यांनी गुरूवारी सांगितले.
शाळा तपासणीला गेलो असता शाळेने कोंडून ठेवले असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी के. डी. भुजबळ यांनी सांगितले. भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार भुजबळ हे सकाळी शाळा तपासण्यासाठी गेले असता शाळेमध्ये पालक आणि काही संघटनांचे कार्यकर्ते आले होते. त्यांनी शाळेकडे कागदपत्रे मागितली असता शाळेने दिली नाहीत आणि त्यांना कोंडून ठेवले. शाळेबाबत शिक्षणअधिकाऱ्यांकडे तक्रार केली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
याबाबत शाळेशी संपर्क साधला असता, शाळेने भुजबळ यांचा आरोप फेटाळून लावला आहे. भुजबळ हे व्यक्तिगत पातळीवर आकस ठेवून त्रास देत असल्याचा आरोप माने यांनी केला आहे.
याबाबत माने यांनी सांगितले, ‘‘शाळेवर २००७ पासून आर्थिक घोटाळ्यांचे आरोप केले जात आहेत. एक माणूस बुधवारी शाळेत आला आणि आम्हाला सांगितले की उद्या भुजबळ साहेब येतील, त्यांच्याशी तडजोड करून टाका म्हणजे शाळेचे प्रकरण संपून जाईल. मात्र, शाळेत कोणताही घोटाळा नाही त्यामुळे आम्ही पैसे देण्यास नकार दिला. गुरूवारी सकाळी भुजबळ शाळेत आले. त्या वेळी त्यांच्याकडे शाळेची तपासणी करण्याच्या आदेशाची मागणी केली. त्यांनी जे पत्र दाखवले त्यावर जावक क्रमांक नव्हता आणि त्यावर फक्त भुजबळ यांची सही होती. भुजबळ हे व्यक्तिगत आकसाने शाळेची बदनामी करत आहेत. शाळेच्या ऑडिट रिपोर्टची तपासणी वर्षांतून एकदा केली जाते. मात्र, २००७ पासून आतापर्यंत शाळेचा ऑडिट रिपोर्ट तपासण्यासाठी २२ वेळा अधिकारी शाळेत आले आहेत. त्यांच्याकडून आम्हाला वारंवार त्रास दिला जातो. याबाबत शिक्षण संचालक महावीर माने आणि भुजबळ यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.’’