घरातील व्यक्तींची सुदृढता जितकी कौतुकाची, तितकीच त्या घरात लाडाकोडाने पाळण्यात आलेल्या प्राणिमात्रांची शरीरसंपदाही महत्त्वाची असते. मात्र माणसांमध्येच वाढत चाललेल्या शरीर स्थूलत्वाची लक्षणे त्या त्या घरांतील प्राण्यांवर दिसू लागली आहेत. पाळीव कुत्र्या-मांजरांची वजनाच्या बाबत ‘माणसाळ’ण्याची ही बाब दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या घरातील कुत्र्या-मांजरांचे गुबगुबीत, गोबरेपण उत्तम असल्याचा पारंपरिक गैरसमज प्राणिपालकांमध्ये दिसून येतो. त्यासाठी खास करून कुत्र्यांना आपल्याप्रमाणेच सतत खाऊ घालण्याची सवय मालक आणि कुटुंबातील इतर व्यक्तींना लागते. कौतुकाच्या या गोष्टीचा परिणाम श्वानांच्या भीषण लठ्ठपणात (ओबेसिटी) होतो. सध्या पाळीव कुत्र्यांचा वाढत चाललेला लठ्ठपणा त्यांच्यासाठी कैक आजारांना निमंत्रण देत आहे.

पशू खाद्य आणि पशू उत्पादनांच्या बाजारपेठेने पाळीव कुत्र्यांच्या आहारशैलीत बदल केले. मात्र या खाद्याची मात्रा किती ठेवावी याचा संभ्रम प्राणिपालकांमध्ये कायम राहिला. परिणामी, श्वानांमध्ये लठ्ठपणा हाच गंभीर आजार बनून समोर आला. गरजेपेक्षा जास्त गुटगुटीत झालेल्या या ‘श्वानुल्यां’चा लठ्ठपणा कमी करण्यासाठी पुन्हा एकदा बाजारपेठच सरसावली. प्राण्यांची ही लठ्ठपणाची समस्या हेरून त्यानुसार अनेक उत्पादने, सेवा बाजारात उपलब्ध झाल्या.

‘पाळीव प्राणी’ हा बाजारेपेठेचा महत्त्वाचा घटक होण्याच्या सुरुवातीच्या काळात प्राणी गुटगुटीत करण्यासाठी प्राणिपालकांना विविध उत्पादनांची प्रलोभने दिली जात होती. जाहिरातीतही गुटगुटीत कुत्र्यांना मान मिळत होता, पण आता उलट परिस्थिती झाली आहे. कुत्र्यांच्या लठ्ठपणाबाबत जगभर जागृती अभियान राबवले जात आहे आणि जाहिरातींचा रोख बदलून कुत्रे गुटगुटीत असण्यापेक्षा, चपळ (अ‍ॅक्टिव्ह) असणे चांगले असा झाला आहे. त्यातूनच कुत्र्यांच्या जाडपणाच्या समस्येची जाणीव करून देण्यासाठी अनेक देशांमध्ये ‘डॉग ओबेसिटी अवेअरनेस डे’ साधारणत: ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ात बहुतेक देशांमध्ये पाळला जातो. श्वान उत्पादनांच्या बाजारपेठेला प्रोत्साहन देणाऱ्या आणि श्वानप्रेमींच्या पसंतीस उतरलेल्या इतर संकल्पनांप्रमाणेच ‘डॉग ओबेसिटी डे’ या संकल्पनेचे उमगस्थानही अमेरिका. दशकभरापूर्वी अमेरिकेतील पन्नास टक्क्यांहून अधिक पाळीव कुत्री ही गलेलठ्ठ असल्याचा अहवाल एका स्वयंसेवी संस्थेने दिला आणि तेव्हापासून कुत्र्यांमधील लठ्ठपणाची समस्याही अनेक घरांतील चिंतेचा विषय बनला. त्यानंतर श्वानांमधील लठ्ठपणा कमी करणारे उद्योग मात्र सुदृढ होत गेले.

ओबेसिटी मॅनेजमेंट प्रोग्रॅम्स

खाण्याच्या चुकीच्या पद्धती, जास्त खाणे, पुरेसा व्यायाम नसणे अशाच कारणांमुळे कुत्र्यांमध्येही लठ्ठपणाची समस्या दिसते. घरी कुत्रा आणला जातो, मात्र त्यानंतर त्याला नियमित, ठराविक वेळी फिरवणे यासाठी पुरेसा वेळ दिला जात नाही. सुरुवातीच्या काळात उत्साह असतो. मात्र, रोज सकाळी उठून कुत्र्याला फिरायला नेणे हळूहळू बारगळू लागते. त्यामुळे अर्थातच कुत्रे लठ्ठ होऊ लागते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी व्यावसायिक यंत्रणा उभी राहिली आहे. कुत्र्यांसाठी ओबेसिटी मॅनेजमेंट प्रोग्रॅम्स चालवले जातात. यामध्ये कुत्र्यांच्या खाण्याच्या सवयी, खाण्याचे प्रमाण, कुत्र्याला मिळणारा व्यायाम या सगळय़ाचा अभ्यास केला जातो. त्याप्रमाणे प्रत्येक कुत्र्यासाठी स्वतंत्र दिनक्रम तयार केला जातो. कुत्र्याला कशाप्रकारचे खाणे द्यायचे, किती वेळ फिरायला न्यायचे, कोणत्या वेळी न्यायचे असा कार्यक्रम प्रशिक्षकांकडून (डॉग ट्रेनर्स) आखला जातो. कुत्र्यांना व्यायाम होईल असे खेळ तयार केले जातात. अनेक वेळा ओबेसिटी मॅनेजमेंट प्रोग्रॅमबाबत श्वानपालकांकडून चौकशी होत असल्याचे प्रशिक्षक सांगतात. महिन्याला साधारण एक ते तीन हजार रुपये घेऊन कुत्र्यांना फिरवून आणण्याची जबाबदारी घेणाऱ्या ‘डॉग वॉकर्स’चा व्यवसाय सध्या शहर-निमशहरी भागांत उभारी घेऊ  लागला आहे.

श्वान आहारतज्ज्ञ

पशुवैद्य त्यांच्याकडे येणाऱ्या कुत्र्यांबाबत सूचना देतच असतात. मात्र त्याचबरोबर कुत्र्यांचे आहारतज्ज्ञ देखील आहेत. कुत्र्याची आहाराची गरज ओळखून त्यानुसार त्यांच्या आहाराची आखणी करणे आणि तो पुरवणे अशी जबाबदारी ‘डॉग न्यूट्रिशनिस्ट’ उचलतात. अशा कुत्र्यांसाठी स्वतंत्र डबाही दिला जातो. देशपातळीवर अशा श्वानआहाराची विशेष डबासेवा देणारी साखळी तयार झाली आहे. लठ्ठपणाची समस्या असलेल्या कुत्र्यांसाठी अनेक कंपन्यांनी विशेष खाणेही बाजारात आणले आहे. साधारणपणे ६०० ते २००० रुपये किलो अशी या खाण्याची किंमत आहे.

व्यायामाची ‘डोगा’ संकल्पना

सध्या ‘डोगा’ म्हणजे ‘डॉग योगा’ ही नवी संकल्पना श्वानपालकांनी उचलून धरली आहे. ‘मालक आणि कुत्रे यांनी एकत्रपणे व्यायाम करणे,’ अशी ‘डोगा’ची थोडक्यात व्याख्या करता येईल. श्वान आणि त्यांच्या पालकांना एकत्रपणे करता येतील असे काही व्यायाम प्रकारही शोधून काढण्यात आले आहेत. युरोप, अमेरिका या देशांत ‘डोगा’ लोकप्रिय असून, भारतातही लवकरच डोगा रूढ झाल्यास आश्चर्य वाटू नये.

डोगा प्रशिक्षण केंद्र, पुस्तके अशी सामग्रीही तयार झाली आहे. जानेवारीमध्ये चीनमध्ये २७० श्वान आणि त्यांच्या पालकांनी एकत्र ‘डोगा’ करून गिनिज बुकात विक्रमाची नोंदही केली आहे. भारतातही बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, गोवा येथे ‘डोगा’ प्रशिक्षण केंद्रे सुरू झाली आहेत. याची काही प्रमाणात खिल्ली उडवली जात असली, तरीही सध्या ‘डोगा’ हा योगाइतकाच फोफावत आहे.

rasika.mulye@expressindia.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obesity of dog