घरात पेस्ट कंट्रोल करणे तरुण-तरुणीच्या जीवावर बेतले आहे. निगडी येथील यमुनानगरमध्ये प्रेमांकूर सोसायटीमध्ये रविवारी सकाळी ही घटना घडली. धवल शंकर लगारीया(२४) व मंदिरा चौधरी(२६) असे मृत्यू झालेल्या प्रेमी युगुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लगारीया वास्तव्याला असलेल्या फ्लॅटमध्ये शनिवारी पेस्ट कंट्रोलचे काम करण्यात आले होते. एकाच ठिकाणी काम करणारे धवल आणि मंदिरा शनिवारी सायंकाळी ऑफीसमधून घरी आले. तेव्हा घरात पेस्ट कंट्रोल केल्याचे त्यांना माहित नव्हते. काहीकाळ घरात बसल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. दोघांचाही श्वास गुदमरल्याने तातडीने त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान रात्री नऊच्या सुमारास धवलचा तर आज सकाळी मंदिरा हिचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद निगडी पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.