पिंपरी-चिंचवड आरटीओमधील प्रकार; छापील प्रमाणपत्रांचा तुटवडा
पिंपरी-चिंचवडमधील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये वाहन नोंदणी प्रमाणपत्रांचा तुटवडा असल्यामुळे सध्या हे प्रमाणपत्र साध्या कागदावर दिले जात आहे. स्मार्ट कार्ड बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर नोंदणीप्रमाणपत्र पुस्तक स्वरुपात दिले जात होते. मात्र येथील कार्यालयात त्याचाही तुटवडा असल्यामुळे गेले काही महिने साध्या कागदावरील प्रमाणपत्रांचे वितरण केले जात आहे.
राज्यात सर्वत्रच वाहन नोंदणी प्रमाणपत्रांचा तुटवडा आहे. पिंपरी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातही त्या प्रमाणपत्रांच्या तुटवडय़ाचा वाहन मालकांना फटका बसत आहे. फेब्रुवारी २०१६ पासून पिंपरी येथील कार्यालयातून नोंदणी प्रमाणपत्र मिळत नव्हती. मात्र, जुल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून वाहन नोंदणी प्रमाणपत्र साध्या कागदावर छापील स्वरूपात देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला हे प्रमाणपत्र स्मार्ट कार्ड स्वरूपात दिले जात होते. मात्र, युतीचे शासन आल्यानंतर स्मार्ट कार्ड बंद करण्यात आले आणि नोंदणी प्रमाणपत्र पुस्तक रूपात देण्यास सुरूवात करण्यात आली. मात्र त्याचाही फेब्रुवारी पासून तुटवडा निर्माण झाला.
राज्य शासनाला कोटय़वधी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या पिंपरी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये स्टेशनरी नसल्याचे उत्तर अधिकाऱ्यांकडून दिले जात आहे. जून महिन्यापर्यंत पिंपरी येथील कार्यालयामधून ६० हजार वाहन नोंदणी प्रमाणपत्र वाहन मालकांना मिळाले नव्हते. उशिरा का होईना ती देण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र तीही साध्या कागदावर असल्यामुळे वाहन मालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. साध्या कागदावरील वाहन नोंदणी प्रमाणपत्रामुळे किमती वाहनांचे बोगस हस्तांतरण सहजरीत्या होऊ शकते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रमाणपत्रामध्ये
खाडाखोड करून चोरीची वाहनेही अशा प्रमाणपत्रामुळे स्वमालकीची होण्याचा धोका आहे. अशा वाहनांचा गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांमध्येही वापर होऊ शकतो. त्यामुळे वाहन नोंदणी प्रमाणपत्र पुस्तक रुपातच देण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाहन नोंदणी प्रमाणपत्रांची मागणी सरकारकडे केली आहे. हा प्रश्न राज्य शासनाचा आहे. वाहन नोंदणी प्रमाणपत्र सध्या साध्या कागदावर छापून देण्यात येत आहे आणि तो सरकारचाच निर्णय आहे. त्यामुळे येत्या महिना अखेपर्यंत ६० हजाराहून अधिक वाहन नोंदणी प्रमाणपत्र वाहनधारकांना वितरित केली जातील.
अजित शिंदे, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad rto office has shortage of vehicle registration certificates