आजच्या पत्रकारितेपुढे लोकशाही प्रगल्भ करण्याचे आणि विश्वासार्हतेचे आव्हान आहे. लोकशाहीच्या चारही स्तंभांनी विश्वासार्हता वाढवली पाहिजे. पत्रकारांनी सामाजिक सलोखा बिघडणार नाही, अशा पध्दतीने वृत्तांकन करावे. मूल्यापेक्षा मूल्याधिष्ठीत बातमी देण्यावर भर दिला पाहिजे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोसरीत व्यक्त केले.
अंकुशराव लांडगे नाटय़गृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४० व्या द्वैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर शकुंतला धराडे, खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, माजी खासदार भारतकुमार राऊत, आमदार दिलीप वळसे पाटील, लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, बाळा भेगडे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम, परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक, माजी अध्यक्ष एस. एम. देशमुख, कार्याध्यक्ष चंद्रशेखर बेहेरे, महापालिका आयुक्त राजीव जाधव आदी या वेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, लोकशाहीतील प्रत्येक स्तंभास महत्त्व असून चौथ्या स्तंभाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पत्रकारितेने प्रबोधन व परिवर्तनाची चळवळ राबवली. १५० वर्षांच्या पत्रकारितेच्या इतिहासात वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम केले. आज समाजमनावर माध्यमांचे आक्रमण होते आहे. त्यामुळे माध्यमांचे प्रबोधन व्हायला हवे. ‘ब्रेकिंग न्यूज’च्या जमान्यात ‘पराचा कावळा’ होतो. चुकीच्या बातम्या दिल्यास सामाजिक सलोखा बिघडू शकतो. एखाद्या बातमीचे काय परिणाम होऊ शकतात, याचा विचार व्हावा, अन्यथा एका थोर परंपरेशी बेईमानी ठरेल. समाजाचे प्रतिबिंब लेखणीद्वारे उमटविणाऱ्या पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे आहे. समाजात प्रगल्भता वाढवण्याचे त्यांचे कार्य वाखाणण्यासारखे आहे. पत्रकार हल्ला कायदा करण्यासंदर्भात विविध मत-मतांतरे आहेत. गेल्या सरकारने नेमलेल्या समितीने विरोधी अहवाल दिला आहे. पत्रकारांना सुरक्षा देणे सरकारचे कर्तव्यच असून शासन याबाबतीत योग्य निर्णय घेईल. पंतप्रधानांनी ‘सर्वासाठी घर’ अशी घोषणा केली आहे. त्यानुसार, पत्रकारांनी गृहनिर्माण संस्था स्थापन केल्यास त्यांना भूखंड उपलब्ध करून देण्यात येतील. पत्रकारांच्या पेन्शन योजनेबाबत दोन महिन्यात ठोस निर्णय घेऊ. पत्रकार भवनाची कार्यवाही करू.
‘पॅकेज, ‘पेड न्यूज’ बंद करा’
अलीकडे पत्रकारितेत ‘पॅकेज’, ‘पेड न्यूज’चे प्रमाण वाढले आहे. त्यातून एकसुरी बातम्या दिल्या जातात, हे प्रकार कुठेतरी थांबले पाहिजेत, असे स्पष्ट मत खासदार शिवाजीराव आढळराव यांनी अधिवेशनात मांडले. अॅड. उज्ज्वल निकम यांनी, प्रसारमाध्यमांनी बातम्या देताना प्रामाणिक हेतू ठेवावा आणि पातळी सोडून पत्रकारिता असू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jun 2015 रोजी प्रकाशित
पत्रकारितेपुढे विश्वासार्हता जपण्याचे आव्हान – मुख्यमंत्री
‘ब्रेकिंग न्यूज’च्या जमान्यात ‘पराचा कावळा’ होतो. चुकीच्या बातम्या दिल्यास सामाजिक सलोखा बिघडू शकतो.

First published on: 07-06-2015 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Press reporting cm news