‘एडिस इजिप्ती’विरोधात काम करणारी नवी संयुगे बनवण्यास यश

डासांपासून संरक्षणासाठी घरोघरी डासरोधकाच्या वडय़ा वा अगरबत्ती जाळली जाते. पण दिवसेंदिवस या डासरोधकांचा डासांवरचा परिणाम कमी-कमी होत असल्याची अनेकांची तक्रार आहे. वर्षांनुवर्षे वापरल्या जाणाऱ्या डासरोधकांविरोधात डासांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याने हे घडते. त्यामुळे प्रस्थापित डासरोधकांपेक्षा वेगळे गुणधर्म असलेले नवे कीटकरोधक तयार करण्यासाठी सध्या संशोधन सुरू आहे. पुण्यातील ‘राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळे’ने यातील मूळ संशोधन केले असून डेंग्यू, चिकुनगुनिया आणि झिका पसरवण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या ‘एडिस इजिप्ती’ डासांच्या विरोधात काम करणारी कंपाउंड्स (संयुगे) संस्थेच्या शास्त्रज्ञांनी बनवली आहेत.

‘ग्रेपफ्रूट’ नावाच्या संत्र्यासारख्या फळातील नैसर्गिक कंपाउंड्सशी मिळतीजुळती असलेली ही कंपाउंड्स असून त्यांची ‘एडिस इजिप्ती’विरोधात चाचणी करण्यात आली. त्यात ती परिणामकारक असल्याचे दिसून आले. हे संशोधन अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असून ‘अ‍ॅनाफिलिस’ आणि ‘क्यूलेक्स’ या डासांच्या इतर प्रजाती, तसेच घरात आढळणाऱ्या माश्या व ढेकणांसारख्या कीटकांवरही त्याचा उपयोग होतो का, हे तपासणार आहे.

एनसीएलचे रसायनशास्त्रज्ञ डॉ. आलोक सेन व डॉ. श्रीनिवास रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या डासरोधक उत्पादने ही ‘सिंथेटिक पायरिथ्रॉइड’ नावाच्या कंपाउंडपासून बनवतात. डास या उत्पादनांना प्रतिरोध निर्माण करत असल्याने डासांना पळवण्यासाठी डासरोधकाचा अधिक डोस लागतो. नव्याने बनवलेल्या कंपाउंड्सची रचना वेगळी असून अद्याप डास वा कीटकांना या रोधकांची सवय नाही.

दररोज आढळणाऱ्या ताप-रुग्णांची संख्या मोठी

दररोज शहरात आढळणाऱ्या ताप-रुग्णांची संख्या मोठी असून सध्या चिकुनगुनियाचे रुग्ण अधिक संख्येने आढळत आहेत. मंगळवारी पुण्यात चिकुनगुनियाच्या ८८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून डेंग्यूचेही ३८ संशयित रुग्ण सापडले. महापालिकेकडे ऑक्टोबरमध्ये शहरात ७७७ चिकुनगुनियाच्या आणि ४४६ डेंग्यूसदृश रुग्णांची नोंद झाली आहे.