सासवड येथे होणाऱ्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आतापर्यंत १ कोटी २० लाख रुपयांचा रुपयांचा निधी संकलित झाला आहे. देणगी, प्रायोजकत्व, ग्रंथनगरीतील स्टॉलचे भाडे, स्वागत समिती सदस्य आणि प्रतिनिधी शुल्क या माध्यमातून ९० लाख रुपये जमा झाले असून राज्य सरकारतर्फे मिळालेल्या निधीतील २० लाख रुपयांचा त्यामध्ये अंतर्भाव आहे. १५ लाख रुपयांची देणगी देऊन मुख्य प्रायोजक म्हणून कोणीच पुढे आले नसल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय कोलते यांनी दिली.
संमेलनासाठी १५ लाख रुपये देणगी देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेस मुख्य प्रायोजकत्व देण्याचा निर्णय स्वागत समितीने घेतला होता. मात्र, अशी कोणतीही व्यक्ती किंवा संस्था पुढे आली नाही. कोणार्क रिअस्टरचे भाऊसाहेब सिंगाडे आणि पुण्यातील भुजबळ ब्रदर्स कन्स्ट्रक्शन्सचे सूरज भुजबळ यांनी प्रत्येकी दहा लाख रुपयांची देणगी दिली आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांना सहप्रायोजकत्व देण्यात येणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, सिंहगड इन्स्टिटय़ूट, भारती विद्यापीठ, महाराष्ट्र अॅकॅडमी, पुणे जिल्हा परिषद, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॉसमॉस बँक, डेक्कन मर्चंटस् को-ऑप बँक या देणगीदारांचा त्यामध्ये समावेश आहे, असे कोलते यांनी सांगितले.
सासवड येथील ग्रंथनगरीला पत्र्याचे आच्छादन असून या ग्रंथनगरीचा सहा कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याने या खर्चात वाढ झाली आहे.
संमेलनासाठी ८ हजार साहित्यिकांची सूची करून त्यांना निमंत्रण दिले आहे. याखेरीज इतरांना रसिक म्हणून निमंत्रण दिले असले तरी त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मात्र, असे असले तरी या संमेलनाचे व्यासपीठ हे राजकीय नाही तर, साहित्याचेच असेल, असा दावाही कोलते यांनी केला आहे.
संत सोपानदेव नगरी
सासवड येथील साहित्य संमेलन परिसराचे ‘संत सोपानदेव नगरी’ असे नामकरण करण्याचा निर्णय स्वागत समितीने घेतला आहे. संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला आचार्य प्रल्हाद केशव अत्रे व्यासपीठ, ग्रंथनगरीच्या स्थळाला छत्रपती संभाजीराजे ग्रंथनगरी असे नाव देण्यात आले आहे. विविध ठिकाणच्या तीन सभागृहांचे श्रीमंत गोदाजीराजे सभागृह, राजे उमाजी नाईक सभागृह आणि महात्मा जोतिबा फुले सभागृह असे नामकरण करण्यात आले असून ग्रंथनगरीतील प्रकाशनमंचाचे शाहीर होनाजी बाळा प्रकाशन मंच असे नाव देण्यात आले आहे. संमेलनाच्या मुख्य मंडपाच्या दोन प्रवेशद्वारांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार आणि श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले असल्याचे विजय कोलते यांनी सांगितले. या नामकरणामुळे आंदोलने करणाऱ्या सर्वाचे समाधान करण्यात आले असल्याचा दावाही संयोजन समितीने केला.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jan 2014 रोजी प्रकाशित
१५ लाखांची देणगी देणारा मुख्य प्रायोजक मिळालाच नाही!
सासवड येथे होणाऱ्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आतापर्यंत १ कोटी २० लाख रुपयांचा रुपयांचा निधी संकलित झाला आहे.
First published on: 01-01-2014 at 02:41 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saswad sahitya sammelan sponserer vijay kolate fund