भारतावर मुघलांचे आणि इंग्रजांचे राज्य असतानाही धर्म टिकून होता. धर्म साऱ्या समाजाला एकत्रित ठेवण्याचे काम करीत असतो. संस्कृती, अर्थ आणि मोक्षाची जाण धर्मशास्त्राने प्रत्येकाला दिली आहे. त्यामुळे समाज संघटनासाठी कीर्तनकाराने कीर्तनातून आध्यात्माबरोबरच धर्मशास्त्र शिकवावे, असे मत करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांनी व्यक्त केले.
शाहीर िहगे लोककला प्रबोधिनीतर्फे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक किसनमहाराज साखरे यांच्या गौरवार्थ ‘पुणे कीर्तन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शंकराचार्याच्या हस्ते शशिकांत उत्पात यांना राष्ट्रीय कीर्तनकार कमलाकरबुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. संपदा सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक मठकरी, कीर्तनकार मंगलमूर्ती औरंगाबादकर, प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे आणि शिरीष मोहिते या वेळी उपस्थित होते.
शंकराचार्य म्हणाले, सध्याच्या आधुनिक युगात पाश्चात्त्य संस्कृतीचे आचरण केले जाते. त्यातून माणसाला भौतिक सुख मिळत असले तरी आत्मिक सुख मिळत नाही. योग्य आचरण, चांगले विचार, संस्कृती आणि उत्तम आरोग्याची माहिती आपल्याला धर्मशास्त्रात मिळते. त्यासाठी धर्माचे आचरण केले पाहिजे. विज्ञानातही धर्मशास्त्रात सांगितलेल्या गोष्टींचे आचरण केले जाते. त्यामुळे कीर्तनकारांनी आध्यात्माबरोबर धर्मही शिकविला तर त्यातून चांगले संस्कार होतील आणि धर्म टिकून राहण्यास मदत होईल.
शशिकांत उत्पात म्हणाले, सांस्कृतिक प्रदूषण कमी करण्याची जबाबदारी युवा कीर्तनकारांची आहे. त्यांनी समाजजागृती करण्यासाठी राष्ट्रभक्ती जागविणारी शाहिरी कवने निर्माण करावीत. हिंदूू धर्म हा मानवतेची जाणीव करून देणारा आहे. प्रा. संगीता मावळे यांनी सूत्रसंचालन केले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Dec 2015 रोजी प्रकाशित
कीर्तनकाराने कीर्तनातून धर्मशास्त्र शिकवावे
शंकराचार्याच्या हस्ते शशिकांत उत्पात यांना राष्ट्रीय कीर्तनकार कमलाकरबुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Written by दया ठोंबरे

First published on: 07-12-2015 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shankaracharya vidya nrusinha bharti