वाद्ये वेगळी असली तरी संगीतातील सुरांनी एकत्र आलेले दोन दिग्गज.. शास्त्रीय संगीताच्या मैफलींसह त्यांच्यातील स्नेहाचा चित्रपट संगीतामध्ये दिसलेला ‘सिलसिला’.. योगायोगाने आकाशी रंगाचा कुर्ता परिधान केलेल्या ‘शिव-हरी’ ऊर्फ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा आणि बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्यातील प्रेमाचे काही ‘लम्हे’ रसिकांनी शनिवारी अनुभवले.
निमित्त होते ‘पं. शिवकुमार शर्मा- द मॅन अँड हिज म्युझिक’ या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशनाचे. व्हायोलिन अॅकॅडमीतर्फे आयोजित स्वरझंकार महोत्सवामध्ये पं. शिवकुमार शर्मा यांच्या उपस्थितीत पं. हरिप्रससाद चौरासिया यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. दिल्लीच्या नियोगी बुक्सने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या संपादिका इना पुरी आणि महोत्सवाचे संयोजक पं. अतुलकुमार उपाध्ये या प्रसंगी उपस्थित होते.
प्रेम हे कधी कोणाला दिसत नाही तर, ती एक भावना आहे. पं. शिवजी यांच्याप्रती असलेली भक्ती हेच माझे प्रेम आहे. मी त्यांना ‘फॉलो’ करतो. त्यांनी ज्या रंगाचा कुर्ता घातला तसाच कुर्ता मी देखील परिधान केला आहे. आमचे प्रेम हे असेच आहे. शिव-हरी ही जोडी अशीच आहे. त्यांची संगीताची यात्रा अशीच सुरू राहावी, हीच इच्छा असल्याची भावना पं. चौरासिया यांनी व्यक्त केली.
शिव-हरी ही आमची साथ या जन्मातली नाही तर त्याही पूर्वीची आहे, आम्ही एकमेकांशी हृदयाने जोडले गेलो आहोत, अशी भावना पं. शिवकुमार शर्मा यांनी व्यक्त केली. एरवी कॉफी टेबल बुकमध्ये केवळ छायाचित्रे असतात. मात्र, यामध्ये माझी प्रदीर्घ मुलाखत, आमच्या चित्रपट संगीताचा आढावा घेणारा लेख, ‘कॉल ऑफ द व्हॅली’ या अल्बमच्या ध्वनिमुद्रणाच्या स्मृती जागृत करणारी छायाचित्रे यांचा समावेश आहे. या वेगळ्या पुस्तकाने जुन्या आठवणी जागृत झाल्याचे त्यांनी सांगितले. उपाध्ये यांनी आभार मानले. मंगेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv hari lamhe the man and his music coffee table book