१०० टक्के निकालाचा मंत्र सापडला
दहावीच्या जुलैमधील पुरवणी परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाचले असले, तरी आता अर्धी परीक्षा मार्चमध्ये आणि अर्धी जुलैमध्ये देण्याचा नवा पर्याय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या परीक्षेमुळे आता आपले निकाल चांगले लागावेत म्हणून धडपडणाऱ्या शाळांनाही नवी पळवाट मिळाली आहे.
या वर्षीपासून राज्यात दहावीच्या मार्च महिन्यांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलैमध्ये पुरवणी परीक्षा सुरू करण्यात आली. यापूर्वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येत होती. मात्र, त्यामुळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात होते. या वर्षीपासून जुलैमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लगेच अकरावीला प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे आपापल्या शाळांचे निकाल चांगले लागावेत म्हणून धडपडणाऱ्या शाळांनाही नवी पळवाट मिळाली आहे.
शाळांची प्रतिष्ठा ही दहावीच्या निकालावर अवलंबून असल्याचे मानले जाते. त्यामुळे दहावीचा निकाल चांगला लागावा यासाठी अनेक शाळा थोडय़ा मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना नववीलाच अनुत्तीर्ण करतात आणि बाहेरून दहावीची परीक्षा देण्याचा सल्ला देतात. शाळांच्या या कारभारावर अनेक स्तरांमधून सातत्याने टीका झाली आहे. या वर्षी मात्र अनेक शाळांचे नववीचे निकालही तुलनेने चांगले लागले आहेत. विद्यार्थ्यांना बाहेरून परीक्षा देण्याऐवजी जुलैची परीक्षा देण्याचा सल्ला काही शाळांमधून देण्यात येत आहे.
पहिल्याच वर्षीही मार्चची परीक्षा न देता एकदम जुलैची परीक्षा काही विद्यार्थ्यांनी दिली आहे. या परीक्षेने कठीण वाटणाऱ्या विषयांचे नियोजन करण्याची संधी विद्यार्थ्यांनाही दिली आहे. अभ्यासक्रमातील अध्र्या विषयांची परीक्षा मार्चमध्ये आणि अध्र्या विषयांची परीक्षा जुलैमध्ये असेही विद्यार्थ्यांना करता येणार आहे.
पुरवणी परीक्षेचीही दुकानदारी सुरू
दहावीच्या फक्त पुरवणी परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी विशेष वर्ग खासगी क्लास चालकांनी सुरू केले आहेत. मार्चच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर जुलै महिन्यात होणाऱ्या परीक्षेची तयारी करण्यासाठी अभ्यासवर्गामध्ये विद्यार्थ्यांनी हजेरी लावणे साहजिक आहे. मात्र, नवे शैक्षणिक वर्ष सुरू होताच काही क्लासेसमध्ये पुरवणी परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी जाऊ लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दहावीचा निकालही मेअखेरीस?
गेली अनेक वर्षे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होतो. मात्र, आता पुरवणी परीक्षा वेळेत व्हावी यासाठी दहावीच्या मार्चमधील परीक्षेचा निकाल ३१ मे पूर्वी जाहीर करण्याच्या सूचना राज्य मंडळाला देण्यात आल्या आहेत. त्यानंतर जून महिन्यांत पुरवणी परीक्षा घेऊन जुलैमध्ये त्याचा निकाल जाहीर करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पुढील वर्षी या विद्यार्थ्यांचे प्रवेश वेळेत होऊ शकतील, अशी माहिती राज्य मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.

विद्यार्थ्यांकडून आधीच्या परीक्षेचा क्रमांक घेऊन ते आधी परीक्षेला बसले आहेत का, याची शहानिशा केली जाते. मात्र, अनुपस्थित राहणाऱ्या विद्याथ्र्र्याचाही विचार होणे गरजेचे आहे. मार्चच्या परीक्षेत अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची अनुपस्थितीत राहण्याच्या कारणांची शहानिशा करूनच त्यांना पुरवणी परीक्षेला बसू द्यावे. किंवा मार्च आणि पुरवणी परीक्षा दोन्हीचा निकाल गृहीत धरून शाळांचा दर्जा ठरवला जावा. – हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ssc students get new option for supplementary exam in july