सनई-चौघडय़ाचा नाद, प्रभात बँडचे सादरीकरण आणि विद्यार्थ्यांचा उत्साह अशा वातावरणात ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट’ च्या (एफटीआयआय) पहिल्या विद्यार्थी चित्रपट महोत्सवाला शुक्रवारी सुरुवात झाली.
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया आणि कलकत्ता येथील सत्यजीत रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट यांच्या वतीने देशभरातील विद्यार्थ्यांसाठी ‘नॅशनल स्टूडंट्स फिल्म अॅवॉर्ड आणि पहिल्या विद्यार्थी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्यजीत रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटचे अध्यक्ष संजीव पटनाईक, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सईद अख्तर मिर्झा, संचालक डी. जे. नारायण उपस्थित होते.
हा महोत्सव बुधवापर्यंत (२४ एप्रिल) सुरू राहणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रपटांचेही प्रदर्शन होणार आहे. त्या शिवाय तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध विषयांवरील कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.