बॉलिवूडमधील आपली ओळख बदलण्यासाठी सनी लिऑन धडपडत असल्याची चर्चा असतानाच सनीने मात्र ‘मला माझी ओळख बदलायचीच नाहीये,’ अशी नवाच पवित्रा घेतला आहे. ‘माझी ओळख बदलणार नाही. मात्र, मला अभिनेत्री म्हणून नवे काही शिकायचे आहे, पुढे जायचे आहे. त्यासाठी ‘एक पहेली लीला’ हा चित्रपट माझ्यासाठी महत्त्वाचा आहे,’ असे सनीने बुधवारी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. संधी आणि चांगले कथानक असेल, तर मला भारतीय स्थानिक भाषांतील चित्रपटही करायला आवडतील, असेही सनी या वेळी म्हणाली.
सनी लिऑनचा ‘एक पहेली लीला’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सनी लिऑन आणि चित्रपटाचे दिग्दर्शक बॉबी खान पुण्यात आले होते. ‘पॉर्न स्टार’ म्हणून असलेली ओळख बदलण्यासाठी ‘एक पहेली लीला’ हा चित्रपट महत्त्वाचा आहे का याबाबत बोलताना सनी म्हणाली, ‘आतापर्यंतच्या चित्रपटांमधील व्यक्तिरेखा या एका ‘ग्लॅमरस’, ‘बोल्ड’ अशा होत्या. माझी ओळख बदलण्याबाबत मला नेहमीच विचारले जाते. मात्र, मला माझी ओळख बदलायचीच नाहीये. ती बदलणार नाही हे मला माहीत आहे. या चित्रपटात माझा वेगळा लूक आहे. मात्र, हा चित्रपट मला अभिनेत्री म्हणून पुढे नेईल. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारण्याची अभिनेत्री म्हणून असलेली इच्छा या चित्रपटाने पूर्ण केली आहे. असे अजूनही वेगळ्या व्यक्तिरेखा असणारे बॉलिवूडमध्ये ७ नवे चित्रपट मी करते आहे.’
अवघ्या ४९ दिवसांत चित्रीकरण झालेल्या या चित्रपटातील अनुभवाबाबत सनीने सांगितले, ‘हा चित्रपट हे नक्कीच आव्हान होते. माझे इंग्रजी उच्चारही अमेरिकन आहेत. त्यात हिंदी आणि राजस्थानी उच्चार शिकणे आव्हानात्मक होते.’
या चित्रपटाबाबत बॉबी खान यांनी सांगितले, ‘हा बॉलिवूडमधील मसाला चित्रपट आहे. लोकांना हा चित्रपट आवडेल असा विश्वास वाटतो. यापूर्वी मी सनीला भारतीय व्यक्तिरेखा आणि लूकमध्ये मी पाहिले नव्हते. मात्र, सनीने या चित्रपटातील लीला ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ती ‘सनी लिऑन’ आहे म्हणून मी तिला घेतले नाही, तर ती माझ्या चित्रपटातील व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला योग्य वाटली म्हणून तिला घेतले आहे.’
सनीचा अॅटिटय़ूड..
कोणत्या अभिनेत्याबरोबर काम करायला आवडेल, या प्रश्नावर सनी लिऑन स्पेशल अॅटिटय़ूड असलेले उत्तर तिच्याकडून मिळाले. ती म्हणाली, ‘कुणाही मोठय़ा अभिनेत्याबरोबर काम करायला नक्कीच आवडेल. मात्र, त्याहीपेक्षा ज्याला माझ्याबरोबर काम करायला आवडेल, त्याच्या बरोबरच मला काम करायला आवडेल.’
संग्रहित लेख, दिनांक 9th Apr 2015 रोजी प्रकाशित
‘मला ओळख बदलायचीच नाहीये!’
बॉलिवूडमधील आपली ओळख बदलण्यासाठी सनी लिऑन धडपडत असल्याची चर्चा असतानाच सनीने मात्र ‘मला माझी ओळख बदलायचीच नाहीये,’ अशी नवाच पवित्रा घेतला आहे.
First published on: 09-04-2015 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone actress identity