‘‘साक्षरतेचा प्रसार होणे आवश्यकच आहे. मात्र, शिक्षण हे ज्ञानाधिष्ठित असावे आणि त्यासाठी शिक्षकांनी त्यांची गुणवत्ता वाढवणे आवश्यक आहे,’’ असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.
डॉ. गावडे गुरुवारी नव्वदीमध्ये पदार्पण करत आहेत. त्या निमित्त त्यांच्याशी लोकसत्ताने संवाद साधला. शिक्षणक्षेत्राशी गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ डॉ. गावडे जोडले गेले आहेत.
ते पुढे म्हणाले, की शिक्षण हे ज्ञानाधिष्ठित आणि अनुभवाधारित असणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांनी त्यांची गुणवत्ता तपासून पाहणे आवश्यक आहे. आपली अध्यापनामधील उंची वाढवण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षकांनी सातत्याने लेखन करणे, चिंतन करणे आवश्यकच आहे. शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्था या अध्यापनाचे तंत्र शिकवतात. मात्र, विषयाची खोली वाढवण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत.
विद्यार्थ्यांना विषयांचे शिक्षण देण्याबरोबरच त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास करणे, त्यांच्यात मूल्य रुजवणे हेही शाळेचेच काम आहे. त्या दृष्टीने अभ्यासक्रमांची आखणी होणे आवश्यक आहे. मात्र, त्याचवेळी व्यवसायभिमुखताही असावी. शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांना आणि शाळांना अधिक स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे. सध्या तांत्रिक आणि प्रशासकीय गोष्टींमुळे शाळा आणि शिक्षकांवर बंधने आल्याचे दिसत आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, साक्षरतेचा प्रसार आवश्यक आहेच. मात्र, त्याचबरोबर गुणवत्ता, प्रयोगशिलता आणि काळाची गरज ओळखून शिक्षणपद्धत बदलणेही गरजेचे आहे.
मराठी शाळांबाबत डॉ. गावडे म्हणाले, की पालकांची मानसिकता ही शासकीय धोरणांवर अवलंबून असते. मराठी शाळांच्या विकासासाठी आणि मातृभाषेतून शिक्षणाच्या प्रसारासाठी शासनाने त्यांच्या पातळीवर सक्षम धोरणे आखणे गरजेचे आहे. मातृभाषा ही संकल्पना स्पष्ट करण्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरते. मुलगा इंग्लिशमध्ये शिकल्याशिवाय त्याला काही भवितव्यच नाही, अशी पालकांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. बदललेल्या मानसिकतेमुळे विशिष्ट शाखांकडे ओढा वाढत आहे. मात्र, काही विषयांसाठी विद्यार्थी आणि शिक्षकच नाहीत अशी स्थिती दिसून येते. विद्यार्थीच नसल्यामुळे काही विषयांचे ज्ञान पुढच्या पिढीकडे देण्यासाठी शिक्षक तयारच होत नाहीत. या सर्व परिस्थितीमध्ये मार्ग काढण्यासाठी शिक्षणाचा र्सवकष विचार होणे आवश्यक आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jun 2013 रोजी प्रकाशित
शिक्षकांनी गुणवत्ता वाढवणे आवश्यक – डॉ. प्र. ल. गावडे
डॉ. गावडे गुरुवारी नव्वदीमध्ये पदार्पण करत आहेत. त्या निमित्त त्यांच्याशी लोकसत्ताने संवाद साधला. शिक्षणक्षेत्राशी गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ डॉ. गावडे जोडले गेले आहेत.

First published on: 20-06-2013 at 02:42 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers must increase their merritt dr p l gawade