शहरात सध्या गल्लीबोळांच्या आणि छोटय़ा रस्त्यांवरील ‘विकासकामाला’ भलताच
आपापल्या प्रभागातील मतदारांना खूश करण्यासाठी नगरसेवकांकडून जी ‘लोकप्रिय कामे’ केली जातात त्यात यंदा गल्लीबोळ काँक्रिटीकरण या कामाने भलताच जोर धरला आहे. जुन्या पुणे शहरातील अनेक गल्लीबोळांमधील रस्ते सध्या काँक्रिटचे केले जात आहेत आणि इतरही अनेक प्रभागांमधील अस्तित्वातील चांगले रस्ते उखडून त्या रस्त्यांवर स्लॅब टाकण्याची कामे जोरात सुरू आहेत. या काँक्रिटीकरणाला बहुतेक ठिकाणच्या स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. चांगले डांबरी रस्ते उखडून काँक्रिटीकरणाची गरज काय, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. मात्र, नगरसेवकांना आपण प्रभागामध्ये विकासकामे करत आहोत हे दाखवायचे असल्यामुळे त्यांना रस्ते सिमेंटचे करण्यातच रस आहे.
कर्वेनगरमधील सात रस्त्यांवर काँक्रिटीकरणाचा घाट घालण्यात आला आहे आणि
मध्य पुण्यातही तपकीर गल्ली परिसर तसेच शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ आदी अनेक ठिकाणी काँक्रिटीकरणाचा धडाका सुरू असून उपनगरांतही चांगले रस्ते फोडून तेथे स्लॅब टाकल्या जात आहेत. नगरसेवक त्यांच्या वॉर्डस्तरीय निधीमधून छोटे रस्ते व गल्लीबोळ काँक्रिटीकरणाची कामे करू शकतात. त्यामुळे प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीही शहानिशा होत नाही. नगरसेवकांच्या सूचनांप्रमाणे ही कामे केली जातात.
* उत्तम प्रतीचे डांबरी रस्ते सध्या फोडले जात आहेत
* फारशी वर्दळ नसलेल्या रस्त्यांचेही काँक्रिटीकरण
* गेल्या वर्षी डांबरी केलेले रस्ते यंदा काँक्रिटचे
* काँक्रिटीकरणानंतर अनेक जागांचा वापर पार्किंगसाठी
कामाच्या दर्जाकडेही दुर्लक्ष
गल्लोगल्ली जे काँक्रिटीकरण केले जात आहे त्यात अनेक ठिकाणी कामाच्या दर्जाकडे लक्ष दिले जात नसल्याचेही दिसत आहे. रस्त्यावर दिला जाणारा काँक्रिटचा थर मानकांप्रमाणे नसून पातळ थर देऊन ही कामे पूर्ण केली जात असल्याची चर्चा आहे.