डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन महिना उलटला, तरी अद्याप त्यांचे मारेकरी सापडले नसल्याबाबत नाराजी वाढत असल्याच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची सोमवारी मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत तपासाबाबत पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी याबाबतची माहिती दिली. पोलीस खात्यातील बदल्यांबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यात क्रीडाविषयक कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पवार म्हणाले, की महाराष्ट्राच्या पोलिसांचा नावलौकिक आहे. मात्र, दाभोलकरांच्या हत्येबाबत तपासाला उशीर होत असल्याने सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे. या प्रकरणामध्ये सरकारलाही दोषी धरले जाते. मात्र, सरकारचा यात कोणताही हस्तक्षेप नाही. काही जण राजकीय हेतूने टीका करतात. राज्य शासनाकडून पोलिसांना हवे ते सहकार्य देण्यात येत आहे. तपासाबाबत त्या वेळी दिरंगाई होत असल्याचे वाटत असल्याने आपण पूर्वी नाराजी व्यक्त केली होती. या तपासाला व शोधमोहिमेला गती येण्यासाठी आणखी काय करता येईल, यासाठी आम्ही बैठक घेणार आहोत.