श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचन आणि त्या बरोबरच लेखन करण्यास प्रोत्साहित करणारा लहान मुलांचा अंक म्हणजे ‘निर्मळ रानवारा’. वंचित विकास या संस्थेच्या विविध उपक्रमांबरोबरच सातत्याने सुरू असलेला हा उपक्रम. लहान मुलांचे मराठीतील अनेक अंक काळाच्या ओघात पडद्याआड गेले. पण अनेक संकट येऊनही प्रकाशित होणारा ‘निर्मळ रानवारा’ हा अंक प्रकाशित करण्याचा उपक्रम कोणत्याही नफ्याशिवाय वर्षांनुवर्षे राबविला जातो आहे. मुलांसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन, विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांना तसेच मोठय़ांनाही लेखनासाठी प्रोत्साहित करण्याचे कार्य या अंकाच्या निमित्ताने करण्यात येते.

उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे धमाल करण्याचे दिवस. मनसोक्त बागडण्याचे, खेळण्याचे, खूप सारी पुस्तके वाचण्याचे, एकंदर काय तर धमाल करण्याचे हे दिवस. वाचन हा एक उपयुक्त छंद आहे, जो छंद कधीही, कुठेही जोपासता येतो. जो ज्ञान देखील देतो आणि वेळेचा सदुपयोग करण्यासही मदत करतो. या सुटीत दुपारच्या उन्हात बाहेर खेळायला देखील जाता येत नाही आणि घरात खेळायचे म्हणले तर मित्र मैत्रीणीही नसतात. अशा वेळी एखादे पुस्तक वाचायला घेतले, तर वेळही निघून जातो आणि ज्ञानही मिळते. मुख्य म्हणजे चांगले वाचन जर आपण करीत असू तर वाचनाबरोबरच, लेखनही करता येणे शक्य होते. सुटीमध्ये वाचण्यासारखी खूप सारी पुस्तके अगदी सहजतेने उपलब्ध होऊ शकतात. मुलांनी वाचावे आणि त्या बरोबरीने लिहावे देखील यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे मासिक म्हणजे ‘निर्मळ रानवारा’. हे मासिक अनेक पिढय़ांनी वाचले आणि त्यात सातत्याने लेखनही केले. आजच्या आणि उद्याच्या पिढीलाही ते वाचायला मिळावे यासाठी ‘वंचित विकास’ ही सामाजिक संस्था हा अंक सातत्यपूर्वक, वैविध्याने नटलेला, ज्ञान आणि मनोरंजन दोन्ही मिळवून देईल अशा दृष्टीने सर्वसमावेशक प्रकाशित करीत आहे.

१९८२ मध्ये जाणीव संघटनेची स्थापना झाली, तेव्हा पुन्हा एकदा मुलांसाठी काही केले पाहिजे या विचारातून चाफेकर आणि मंडळींनी ‘अभिरुची वर्ग’ सुरू केले.  मुलांचे व्यक्तिमत्त्व विकसन करणारे हे वर्ग आजही सुरू असून खेळ, गाणी, गोष्टी, नाटक, छंद अशा अनेक गोष्टी येथे घडतात, घडवल्या जातात.  पुण्यातील या मुलांना आपण जे देतो ते महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या मुलांना दिले तर?  हा विचार चाफेकर यांच्या मनात आला आणि त्यातून ‘रानवारा’ ची कल्पना पुढे आली आणि सुरुवातीला मुलांना वाचायला उत्तम खाद्य देणाऱ्या ‘रानवारा’ च्या पाक्षिकाचा पहिला अंक नोव्हेंबर १९८४ ला प्रकाशित झाला. १९८५ मध्ये वंचित विकास संघटनेची स्थापना करण्यात आली आणि १९८६ मध्ये वंचित विकास संचालित ‘रानवारा’ अंकाची नोंदणी झाली आणि ‘निर्मळ रानवारा’ असे नामकरण होऊन पाक्षिक स्वरूपात प्रकाशित होणारा अंक मासिक स्वरूपात प्रकाशित होऊ लागला. वाचता येणे आणि वाचणे या दोन्ही प्रकियांमधील अंतर कमी करण्यासाठी वाचक मंडळांची सुरुवात करण्यात आली. ज्यांना वाचता येते त्यांनी वाचता न येणाऱ्यांना वाचून दाखविण्याची खास योजना तयार केली गेली आणि अगदी महाराष्ट्रभर खेडय़ांमधूनही वाचकवर्ग निर्माण केले. इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या आजच्या मुलांचे पालक ‘आमचा मुलगा मराठी वाचत नाही हो किंवा त्याला मराठी वाचता येत नाही,’ हे जेव्हा अभिमानाने सांगतात, तेव्हा या मुलांसाठी देखील असे मराठी वाचक मंडळ सुरू करण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित होते.

अंकाची नोंदणी झालेल्या दिवसापासून आजही कानाकोपऱ्यातील लेखक ‘निर्मळ रानवारा’ साठी लिहीत आहेत. लेख, गोष्टी, गाणी, कविता, नाटके, मुलाखती याशिवाय कोडी, विनोद, कलात्मक वस्तू तयार करण्याची माहिती, शब्द, खेळ, शब्दरंजनसारखे मनोरंजन आदी गोष्टींचा या अंकात समावेश असतो. तसेच विज्ञानातील सोपे प्रयोग, रोजच्या वस्तूंतील विज्ञान, शास्त्रज्ञांची चरित्रे, विज्ञान कथा आदींद्वारे समृद्ध होणाऱ्या या अंकाने दिवाळीच्या निमित्ताने विविध विषयांवर अंक प्रकाशित करायला सुरुवात केली. ‘ऋतु’ ,‘खाऊ’ आणि ‘रहस्य’ या विषयांवार मागच्या तीन वर्षांमध्ये अंक प्रकाशित झाले. ज्यांनी पारितोषिके मिळवण्याची प्रथा अबाधित राखत मागच्या तीनही वर्षांमध्ये खूप सारी बक्षिसे मिळवली.

याशिवाय मुलांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी म्हणून सप्टेंबरमध्ये प्रकाशित झालेला पर्यावरण विशेषांक. या अंकाच्या निमित्ताने पानशेत येथील ‘निसर्ग शाळा’ येथे मुलांची आयोजित केलेली सहल हे सगळेच मुलांच्या सर्वसमावेशक वाढीमध्ये उपयुक्त ठरणारे उपक्रम. विविध उपक्रमांमधील एक उपक्रम म्हणजे मागच्या तीन वर्षांपासून आयोजित केली जाणारी ‘वि. ल. शिंत्रे कथा स्पर्धा’. मुलांसाठी लिहिणारे अधिकाअधिक कथालेखक पुढे यावेत म्हणून सुरू केलेल्या या उपक्रमालाही लेखकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कथा स्पर्धेतून तयार झालेल्या कथा विशेषांकाचे प्रकाशन, कथा स्पर्धेतील पुरस्कारविजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम आणि अंतर्नाद मासिकाचे संपादक भानू काळे यांची ‘लेखनाची गरज’ या विषयाला धरून प्रकट मुलाखत. येत्या शनिवारी, ४ मे या दिवशी संध्याकाळी ५.४५ वाजता वेदशास्त्रोत्तेजक सभा, सारसबागेजवळ  येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोठय़ांना लिहिण्यासाठी प्रेरणा देणारा हा कार्यक्रम विनामूल्य असल्याचे मासिकाच्या संपादिका सुप्रिया कुलकर्णी यांनी सांगितले. निर्मळ रानवाराच्या, वंचित विकासच्या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल, तर (०२०) २४४५४६५८ या क्रमाकांवर संपर्क साधता येईल.

मोठय़ांबरोबर मुलांनीही लेखन करावे म्हणून त्यांच्यासाठी राखून ठेवलेली स्वतंत्र पाने हे जसे या अंकाचे वैशिष्टय़ तसेच कोणत्याही मानधनाशिवाय या अंकासाठी कार्य करणारे माजी संपादक सरोज टोळे, ज्योती जोशी आणि सल्लागार मंडळ देखील. हे वाचल्यानंतर लेखकांना मानधन दिले जाते का, हा प्रश्न स्वाभाविकपणे पडतोच. तर त्याचे उत्तर ‘हो, मानधन दिले जाते’ असेच आहे. या अंकात छापून येणाऱ्या प्रत्येक जसे लेखाला मानधन दिले जाते तसेच लेखन करणाऱ्या, चित्रे काढणाऱ्या मुलांच्या उत्तम कलाकृतीची निवड केली जाते आणि इंदिरा गोविंद स्मृती पुरस्काराने मुलांना सन्मानित करण्यात येते. ‘निर्मळ रानवारा’चे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे मुलांसाठी काम करणाऱ्यांना दिला जाणारा ‘कृतज्ञता पुरस्कार’. हा पुरस्कार देखील एक तपाहूनही अधिक वर्ष दिला जातो आहे.

वाचनसंस्कृती जोपासली जावी आणि वृद्धिंगत व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या या अंकात आणि पुढील पिढय़ांमधेही मैत्र निर्माण होईल अशी खात्री वाटते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit vikas sanstha ngo in maharashtra vanchit vikas pune