घटम्, मूअरसिंग, खंजिरी या वाद्यांचा त्रिवेणी संगम. त्याला प्रेक्षकांच्या टाळ्यांची साथ आणि तीन पिढय़ांनी साकारलेला आविष्कार..  ग्रॅमी पुरस्कार मिळालेले ज्येष्ठ घटम्वादक विक्कू विनायकराम यांच्या तीन पिढय़ांनी रंगवलेल्या ‘वसंतोत्सवा’च्या तिसऱ्या दिवशीची सांगता प्रसिद्ध पाश्र्वगायक स्वप्नील बांदोडकर, राहुल देशपांडे आणि अभिजित पोहनकर यांनी सादर केलेल्या फ्यूजनने झाली.
वसंतोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात विक्कू विनायकराम यांच्या ‘चतुर्घट लय समर्पणम’ या सादरीकरणाने झाली. विक्कू विनायकराम यांना त्यांचे पुत्र महेश विनायकराम, नातू स्वामीनाथन आणि शिष्य गणेशन यांनी साथ केली. काव्यावर आधारित रचनानांनी सुरू झालेली मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. विनायकराम यांनी त्यांच्या आजोबांच्या नावाने तयार केलेली शर्मा ताल, या १८ मात्रांच्या ताल रचनेला प्रेक्षकांच्या टाळ्यांची साथ मिळाली आणि नकळत प्रेक्षकांच्या टाळ्या आणि घटम् यांची जुगलबंदी सुरू झाली.
घटम्च्या तालावर रंगलेल्या तिसऱ्या दिवशीच्या उत्तरार्धात संगीताच्या वेगळ्या रूपाचा आस्वाद रसिकांना मिळाला. प्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर, राहुल देशपांडे आणि अभिजित पोहनकर  यांनी ‘फ्यूजन’ सादर केले. भारतीय शास्त्रीय संगीतातल्या प्रसिद्ध बंदिशी ‘लगन मोरी लागे’, ‘अलबेला सजन आयो रे’, पाहिले न मी तुला हे भावगीत.. यांना तबला, की बोर्ड यांच्याबरोबर  सॅक्सोफोन, गिटार, ड्रम्स या वाद्यांची साथ मिळाली आणि या गाण्यांचे वेगळेच रूप रसिकांनी अनुभवले. यासाठी ओजस अधिया, निखिल फाटक (तबला), अनिरूद्ध शिर्के (ड्रम्स), गौरव वासवानी (की-बोर्ड), आय. डी. राव (सॅक्सोफोन), सोनू (गिटार) यांनी साथ केली.
ज्येष्ठ कथक नृत्यांगना रोशन दाते आणि संगीत समीक्षक दीपक एस. राजा यांना डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सन्मान तर, युवा गायक लतेश पिंपळघरे यांना उदयोन्मुख कलाकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.