‘ढगाला लागली कळ’ आणि ‘बिंदीया चमकेगी’ यासह आगामी खो-खो चित्रपटातील गीताचे उषा उथ्थुप यांनी केलेले गायन.. दिलीप प्रभावळकर यांनी ‘लगे रहो मुन्नाभाई’तील ‘बापूं’ची करून दिलेली आठवण.. अभिजित खांडकेकर आणि भार्गवी चिरमुले यांनी घेतलेले उखाणे.. ‘गाइड’ चित्रपटातील देव आनंद यांचे संवाद या चित्रपटाची नायिका वहिदा रहमान यांच्याकडून ऐकताना ‘आज फिर जीने की तमन्ना है’ अशीच रसिकांची भावना झाली.
‘वरदलक्ष्मी चित्र’तर्फे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते वहिदा रहमान, अभिनेते दिलीप प्रभावळकर, अशोक समर्थ, अभिजित खांडकेकर, भार्गवी चिरमुले आणि पार्श्वगायिका उषा उथ्थुप यांना ‘उमेद पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. उद्योजक अनिरुद्ध देशपांडे आणि संस्थेचे महेश टिळेकर या प्रसंगी उपस्थित होते. श्रोत्यांच्या प्रश्नांना कलाकारांनी दिलेल्या दिलखुलास उत्तरांनी कार्यक्रमाची रंगत वाढली.
कलाकाराला जात, धर्म आणि पक्ष नसतो. कलाकार हा केवळ कलाकारच असतो, अशी भावना वहिदा रहमान यांनी व्यक्त केली. देव आनंद यांच्याबरोबर ‘सीआयडी’ हा पहिला चित्रपट केला. त्यानंतर सात चित्रपटांत आम्ही एकत्र असल्याने आमचे ‘टय़ूनिंग’ जमले. ‘मदर इंडिया’ चित्रपट करायला आवडला असता. मी तारुण्यावस्थेत असते, तर ‘जब वुई मेट’ केला असता, असेही त्यांनी सांगितले.
नेते आणि अभिनेते यात श्रेष्ठ कोण असे विचारले असता दिलीप प्रभावळकर म्हणाले, नेते हेच श्रेष्ठ अभिनेते असतात. आम्ही देखील त्यांना शरण जातो. दाऊदची भूमिका कराल का या प्रश्नावर ‘मी पूर्वी खलनायक रंगविला आहे’, असे त्यांनी सांगितले.
‘दम मारो दम’ हे गीत पूर्वी माझ्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले होते. मात्र, चित्रपटामध्ये हे गीत आशा भोसले यांच्या स्वरामध्ये आहे. आर. डी. बर्मन यांनी माझ्यासाठी गीत तयार असल्याचे सांगितले आणि ‘हरे रामा हरे कृष्णा’ हे गीत माझ्या आवाजात स्वरबद्ध झाले. माझ्या हातून अशी बरीच गाणी हिसकावली गेल्याची खंत उषा उथ्थुप यांनी व्यक्त केली. त्यावर वहिदा रहमान यांनी हे गीत तुमचे असल्याचे मला आजच समजल्याचे सांगितले.