Soya Bean Recipes For Breakfast : आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीराला आवश्यक पोषणद्रव्ये मिळणं खूप गरजेचं आहे. विशेषत: प्रोटीनची कमतरता असेल तर थकवा, अशक्तपणा, केसगळती, त्वचेवर परिणाम अशा अनेक समस्या निर्माण होतात. शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचे पर्याय तुलनेने कमी असतात. पण, यावर उत्तम उपाय आहे – सोयाबीन. हे लहानसहान तुकडे म्हणजे प्रोटीनचा प्रचंड साठा आहेत. एवढंच नाही तर यात ओमेगा-३, ओमेगा-६ फॅटी ॲसिडसह पॉलीअनसेच्युरेटेड फॅटदेखील असतात, त्यामुळे ऊर्जा मिळते, शरीर तंदुरुस्त राहते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो.
सोयाबीन हे सुपरफूड मानलं जातं. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी हे फायदेशीर ठरतं. विशेषत: जिम करणाऱ्यांसाठी हे प्रोटीनचं बेस्ट सोर्स आहे. स्नायू मजबूत होतात, ताकद वाढते आणि फिटनेस राखण्यास मदत होते. केस व त्वचेसाठीसुद्धा सोया चंक्स खूप उपयुक्त आहेत. अशा या पौष्टिक सोयाबीनपासून नाश्त्यासाठी चविष्ट पदार्थही बनवता येतात.
१. सोयाबीन कबाब
साहित्य
- सोयाबीन – २ कप
- हिरवी मिरची – ३ ते ४
- बारीक चिरलेला कांदा – १
- कोथिंबीर
- मीठ – चवीनुसार
- लाल मिरची पावडर – अर्धा चमचा
- काळी मिरी पूड – अर्धा चमचा
- कॉर्न फ्लोअर – २ चमचे
- आलं-लसूण पेस्ट – अर्धा चमचा
- तेल – तळण्यासाठी
कृती
सर्वात आधी सोयाबीन अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर त्यातील पाणी घट्ट दाबून काढा. मिक्सरमध्ये थोडं दरदरीत वाटून घ्या. या मिश्रणात कांदा, मिरची, आलं-लसूण पेस्ट, मसाले व थोडं पाणी घालून छान मळून घ्या. कबाबसारखे रोल तयार करा. हे रोल कॉर्न फ्लोअरमध्ये घोळवून बाजूला ठेवा. कढईत तेल तापवा व कबाब सोनेरी रंग येईपर्यंत डीप फ्राय करा. गरमागरम कबाब चटणी किंवा सॉससोबत खाल्ले की नाश्त्याला वेगळीच चव येते.
२. सोया पुलाव
साहित्य
- सोयाबीन – १०० ग्रॅम
- बासमती तांदूळ – दीड वाटी
- दही – २ चमचे
- मीठ – चवीनुसार
- लाल मिरची पूड – १ चमचा
- हळद – अर्धा चमचा
- तेजपत्ता – १
- काळी मिरी – ४ ते ५
- लवंगा – ४ ते ५
- दालचिनी – १ तुकडा
- जिरं – १ चमचा
- गरम मसाला – अर्धा चमचा
- कांदा – १ बारीक चिरलेला
- टमाटर – १ बारीक चिरलेला
- आलं-हिरवी मिरची – १ चमचा चिरलेली
- तळलेला कांदा – थोडा
कृती
सोयाबीन ५ मिनिटे उकळून घ्या. त्यात दही, हळद, मीठ व मिरची पूड टाकून १० मिनिटं मुरू द्या. दुसरीकडे तांदूळ अर्धा तास भिजवून ठेवा. कढईत तेल गरम करून तेजपत्ता, लवंगा, मिरी, दालचिनी व जिरं टाकून फोडणी द्या. कांदा परतून घ्या, त्यात आलं-हिरवी मिरची, टमाटर आणि मसाले घालून मऊ होईपर्यंत परता. नंतर मुरवलेले सोयाबीन टाका. आता भिजवलेला तांदूळ व तळलेला कांदा घाला. पाणी व गरम मसाला टाकून कुकरमध्ये २ शिट्ट्या द्या. झटपट तयार होईल स्वादिष्ट आणि पौष्टिक सोया पुलाव.