प्रथम नेम पाहिजे पण फार नेम करू नये, या वाक्याचे विवरण आता संपले. हे विवरण करीत असतानाच आपण प्रपंच आणि परमार्थ या दुपदरी रस्त्यावर आलो आहोत आणि प्रपंचाबाबत तसेच आपल्या जडणघडणीबाबत अधिक तपशीलवार विचार आपण आता सुरू करणार आहोत. पण त्याआधी श्रीमहाराजांच्या ज्या तीन बोधवचनांपैकी तिसऱ्या बोधवचनाचा मागोवा आपण सुरू केला आहे तो पूर्ण करू. हे बोधवचन असे- ‘प्रेमाला नेमाची गरज लागत नाही. वियोग सहन होत नाही ते प्रेम. प्रेम ठेवावे म्हणजे नेम आपोआप साधतो. प्रथम नेम पाहिजे परंतु फार नेम करू नये.’  यातील ‘प्रथम नेम पाहिजे परंतु फार नेम करू नये’, ही पहिली पायरी आपण विस्ताराने पाहिली. आता या बोधवचनातली दुसरी पायरी म्हणजे ‘प्रेम ठेवावे म्हणजे नेम आपोआप साधतो’. ही पायरी कधी साधेल तर ‘प्रथम नेम पाहिजे परंतु फार नेम करू नये,’ ही पहिली पायरी सिद्ध झाली तर. नेमाने प्रेम निर्माण होईल आणि मग प्रेम असेल की नेम आपोआप होईल. आपल्याला देहाचं प्रेम सहवासानं आलं आहे. जन्मापासून क्षणोक्षणी हा देह आपल्याबरोबर आहे. असाच सहवास नेमाचा झाला तर मग नेमाचेही प्रेम निर्माण होईल. मग प्रेम आहे म्हणून नेम आपोआप साधेल, हा त्याचा मथितार्थ आहे. पण हा सहवास मात्र खराखुरा पाहिजे! जालन्याच्या श्रीराममंदिरात श्रीमहाराज सुखसंवाद करीत होते. तेवढय़ात एक अधिकारी पत्नीसह दर्शनासाठी आले. पाहा बरं. श्रीमहाराज आपल्या शिष्यपरिवारासह बसले आहेत आणि खेळीमेळीने त्यांच्याशी बोलत आहेत. या पतीपत्नीच्या माध्यमातून श्रीमहाराजांनी प्रत्येकाला अंतर्मुख होण्याची एक संधीच दिली. कशी? तर या दोघांनी अनुग्रह मिळावा म्हणून विनंती केली. अनुग्रह कशासाठी हवा, असं महाराजांनी त्यांना विचारलं. तिथे बसलेल्या शिष्यांनाही हा प्रश्न लागू होता. तुम्ही अनुग्रह घेतलात तो नेमका कशासाठी? अधिकारी म्हणाले, ‘‘रामाचे व त्याच्या नामाचे प्रेम यावे यासाठी हवा.’’ त्यावर श्रीमहाराज तिथे बसलेल्यांकडे पाहून म्हणाले, ‘‘तुमच्यापैकी प्रत्येकाला अनुग्रह घेऊन किती वर्षे झाली?’’ कोणी म्हणाले पाच, कुणी दहा, कुणी सतरा तर कुणी तर तेवीस वर्षे झाली, असं पटापट सांगितलं. मग महाराज म्हणाले, ‘‘मग तुम्हा सगळ्यांना नामाचं प्रेम लागलंच असेल, होय ना?’’ अनुग्रहाला किती र्वष झाली, याचं उत्तर पटापट देणाऱ्यांपैकी एकानंही ‘हो’ म्हटलं नाही! त्यावर श्रीमहाराज म्हणाले, ‘‘आपण रोज गुरूंची पूजा करतो, पोथी वगैरे वाचतो, पुष्कळ नामस्मरण करतो, तरी अजून नामाचे प्रेम का येत नाही? तर नाम हे जीवनातील सर्वस्व आहे, असे आपल्याला वाटत नाही. मी नामासाठी जगतो असे वाटत नाही. नामांत प्रेम यायला, एक गुरूंना ते आवडते म्हणून घ्यावे किंवा दुसरे नामातच माझे कल्याण आहे, या भावनेने ते घ्यावे. नामावाचून चैन पडेनासे झाले की प्रेमाचा उगम झाला, असे समजावे.’’ तेव्हा ज्यावाचून चैन पडत नाही तो सहवास खरा. नेमाचा सहवास असा वाढता हवा की त्यावाचून आपल्याला चुकल्याचुकल्यासारखं वाटावं.