आजची वैज्ञानिक प्रगती आपण पाहात असतो. या आजच्या प्रगत वैज्ञानिक संकल्पना ‘कालच्या’ ज्ञानाला लावणं, हा कालभ्रम आहे. यातून वाढणारा राष्ट्रवाददेखील, इतर देश व इतर संस्कृतींतील ज्ञान-विकासाशी निकोप तुलनेऐवजी विनाकारण स्पर्धा करणारा असेल.. हा इशारा देण्याचं काम या पुस्तकानं केलं आहे!
अलीकडच्या काळात काही लोक भारतीय संस्कृतीचे उदात्तीकरण करण्याच्या नादात भारतातील प्राचीन विज्ञानाबाबत अतिरंजित दावे करीत आहेत. समाजातील धार्मिक व राजकीय असा कुठलाही पगडा नसलेला सामाजिक गटही त्यात सहभागी आहे. त्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकणारे ‘सायन्स इन सॅफ्रॉन’ हे पुस्तक लेखिका मीरा नंदा यांनी लिहिले आहे. त्यामुळे हे पुस्तक योग्य वेळी आले, असेच म्हणावयास हवे. या पुस्तकात प्राचीन काळातील विज्ञानाबाबत केल्या जाणाऱ्या अतिरंजित अशा दाव्यांचा साक्षेपी अभ्यास करून मते मांडली आहेत. दुसरीकडे, प्राचीन विज्ञानातील कुठल्या संकल्पना कशा विकसित होत गेल्या याचे पुरावे व स्पष्टीकरणदेखील या पुस्तकात केले आहे. त्यातून एक जाणवते ते असे की, प्राचीन व आताच्या विज्ञानाचा अभ्यास स्पर्धात्मकतेने न करता तुलनात्मक दृष्टिकोनातून केला पाहिजे, त्यात कुठल्या एकाच संस्कृतीला केंद्रस्थानी ठेवता कामा नये.
लेखिका मीरा नंदा या इतिहासकार आहेत व विज्ञान तसेच मानव्यविद्याशाखेतही त्यांनी बराच अभ्यास केलेला आहे, त्यामुळे अतिशय वेगळ्या व बहुविध दृष्टिकोनातून त्यांनी या प्रश्नाकडे पाहिले आहे. जेव्हा आपण प्राचीन विज्ञानाबाबत अतिरंजित दावे करू लागतो तेव्हा त्याला कालभ्रम (अनाक्रोनिझम) असे म्हणतात. कालभ्रम याचा अर्थ वर्तमानकाळाचे भूतकाळावर आरोपण. प्राचीन विज्ञानाचा अर्थ लावताना आपण वर्तमानकालीन संदर्भ तेथे चिकटवण्याचा प्रयत्न करतो. त्याचा वाईट परिणाम असा होतो की, गणित व विज्ञानातील संकल्पनांचे मानवी आकलन व इतिहासाचे धागे त्यातून विस्कटले जातात. मीरा नंदा यांचे हे पुस्तक खूप चांगले असले तरी काही ठिकाणी पुनरावृत्तीचा दोष टाळता आला असता. तो मुद्दा बाजूला ठेवला तर दिसते ते असे की, हे पुस्तक राष्ट्रवादाचा चष्मा बाजूला ठेवून विज्ञानाकडे पाहण्याची दृष्टी देते. भूतकाळात संकल्पना कशा विकसित होत गेल्या असाव्यात याचे विवरण त्यात आहे. शिवाय विचारसरणीपलीकडे जाऊन या गोष्टींच्या विचाराचा निखळ दृष्टिकोनही आहे. भारतातील प्राचीन विज्ञानात किंबहुना त्या वेळी प्रचलित असलेल्या निसर्ग तत्त्वज्ञानात जे शोध लागले, जी प्रगती साधली गेली त्याचा तुलनात्मक अभ्यास समकालीन संस्कृतींशी निगडित अशा पद्धतीने केला आहे. देशातील राजकीय नेते व इतरांनी अलीकडेच प्राचीन विज्ञानाबाबत जे दावे केले आहेत त्यांच्याबाबतची वास्तवता चार निबंधांतून मांडणारे हे पुस्तक आहे. पायथागोरसचा सिद्धान्त हा एक पहिला दावा आहे. प्राचीन काळातील ग्रीक मेसोपोटिमयन (म्हणजे आताचे इराक) तसेच भारतीय लोक गणिती किंवा भौमितिक तंत्राचा वापर अधिक सफाईदारपणे करीत होते. त्या प्रमेयाला पायथागोरसचे नाव देणे हा काही स्पध्रेचा भाग नव्हता, तर केवळ ग्रीक व मेसापोटेमियन लोकांना त्यांचे श्रेय देण्याचा भाग होता. शून्याचा शोध भारतात लागला, दशमान पद्धती भारताने शोधली असे दावे केले जातात त्यावरही यात प्रकाश टाकला आहे, पण त्यात त्यांनी पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यांचा वापर केला आहे, त्याचबरोबर विज्ञानाच्या इतिहासाचा धांडोळा घेतला आहे. भारताच्या दशमान पद्धतीसाठी प्राचीन काळातील भारतीय विद्वानांना उचित श्रेय दिले आहे. मात्र गणितातील काही संकल्पना भारतातून जगात गेल्या, त्या प्राचीन काळात विकसित झाल्या हे खरे असले तरी भारत हा केवळ अशा संकल्पनांचा केवळ दाता नव्हता तर ग्राहकही होता. ग्राहक अशा अर्थाने की, भारतानेही इतरांकडून बरेच काही घेतले होते.
जनुकशास्त्र व प्लास्टिक सर्जरी ही प्राचीन भारतात अस्तित्वात होती असा दावा राजकीय नेत्यांनी केला आहे. हा दावा पुराणांच्या आधारे केला आहे, त्यावर विश्वास ठेवता येणार नाही; पण त्याकडे अधिक व्यापक दृष्टिकोनातून बघावे लागेल. विशेषकरून हिंदू धर्माने प्राचीन भारतात सुरू असलेल्या वैद्यकीय संशोधनाच्या परंपरेला पुढे नेले नाही. सुश्रुताच्या उदाहरणाने हा मुद्दा अधिक स्पष्ट व्हावा. सुश्रुताने शल्यकर्मातील अत्यंत मूलभूत संशोधन केले होते. सुश्रुत संहितेत नाक, कान, ओठ यांच्या शस्त्रक्रियांचे पद्धतशीर वर्णन आहे. त्याने सांगितलेल्या शस्त्रक्रियेतील बाबी सोप्या व उपयोगी होत्या. त्याचे लिखित पुरावेही आहेत. हेच मूळ भारतीय लेखन नंतर अरबी व चिनी भाषांत रूपांतरित केले गेले, पण भारतात मात्र त्याने दाखवलेला मार्ग आपण सोडून दिला किंवा त्यावरून पुढे वाटचाल करण्याची तसदी घेतली नाही, किंबहुना शल्यक्रियांचे शास्त्र भारताने सुश्रुतानंतर पुढे नेल्याचे लेखी पुरावे नाहीत. यामागे जातिव्यवस्था हे प्रमुख कारण होते. त्या काळात शस्त्रक्रिया या संस्कृत पंडित असलेले प्रशिक्षित वैद्य किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञ करीत नव्हते, तर अशिक्षित लोक करीत होते. त्यांना शरीरशास्त्राचे ज्ञान नव्हते किंबहुना शस्त्रक्रियेतील टप्पे माहीत नव्हते. शरीरशास्त्र शिकण्यासाठी मानवी देहाचे विच्छेदन आवश्यक असते, पण विच्छेदनाची आपल्याकडील सुशिक्षितांची तेव्हाची पद्धत ‘बघा पण स्पर्श करू नका’ या प्रकारची होती. त्यामुळे भारताची शरीरविज्ञानात फार प्रगती झाली नाही. वैद्यकशास्त्राची पीछेहाट झाली. जातीय भेदभावाचे आणखी एक उदाहरण येथे देता येईल ते आहे तत्तरीय संहितेचे. यात वैद्यक व्यावसायिक हा ‘अपवित्र’ मानला गेला आहे व त्याने काही तसे काही कर्म केले तर त्याला शुद्धीकरण-विधीच्या कर्मकांडातून जावे लागत असे. एवढे सगळे र्निबध असूनही त्या काळात प्राचीन विद्वानांची ज्ञानाची तहान कायम होती यात शंका नाही. जे स्वातंत्र्य उपलब्ध होते त्यात त्यांनी वैद्यकीयशास्त्राची प्रगती केली यातही शंका नाही.
योग या विषयाला आज आधुनिक विज्ञानाचे कोंदण चढवले जात आहे, येथे लेखिका वाचकांना विज्ञान व छद्मविज्ञान यातील सीमारेषा ओळखण्याचा सल्ला देते. अनेक राष्ट्रवादी घटकांनी या सीमारेषा ओळखणे अवघड करून टाकले आहे.
प्राचीन काळातील संकल्पना या सर्व सीमा ओलांडणाऱ्या मानवी विकासाच्या होत्या. त्यात भारतीयांचा मोठा वाटा होता, पण भारताने ही प्रगती एकहाती केली असे म्हणता येणार नाही किंवा आपण त्यात प्रवर्तक किंवा स्पर्धक होतो असेही नाही. भारतातील विज्ञान सामाजिक उतरंडीमुळे तसेच अंधश्रद्धांमुळे मागे राहिले असा निष्कर्ष यात काढता येतो असे लेखिका म्हणते. वर्तमान व भविष्यकाळात आपण हे दोष दूर करून विज्ञान प्रगतीतील सामाजिक अडथळे दूर केले पाहिजेत. प्राचीन भारतातील वैज्ञानिक शोधांबाबत किंवा प्रगतीबाबत अतिरंजित व टोकाचे दावे हे आपल्या देशात राष्ट्रवादी व राजकीय हेतूंसाठी केले जात आहेत, त्यांना लेखिकेने गांभीर्यपूर्वक आणि सखोल आव्हान दिले असून, सर्व आक्षेपांचे समाधानकारक स्पष्टीकरणासह नोंदवलेले आहेत.
(लेखिका मीरा नंदा या अमेरिकेतील एक विदुषी आहेत. त्यांनी विज्ञान व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला असून विज्ञानाचा इतिहास, हिंदू राष्ट्रवाद, वैज्ञानिक दृष्टिकोनाशी होणारी तडजोड हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. धर्म व विज्ञान या शाखेत त्या जॉन टेम्पल्टन फाऊंडेशनच्या फेलो होत्या. सध्या त्या मोहाली येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रीसर्च या संस्थेत अभ्यागत प्राध्यापक आहेत. प्रॉफेट्स फेसिंग बॅकवर्ड- पोस्टमॉडíनझम, सायन्स अॅण्ड हिंदू नॅशनॅलिझम, पोस्ट मॉडíनझम अॅण्ड रीलिजियस फंडामेंटलिझम- अ सायंटिफिक रेब्युटल ऑफ हिंदू सायन्स, द गॉड मार्केट ही त्यांची इतर पुस्तके प्रसिद्ध आहेत.)
सायन्स इन सॅफ्रॉन : स्केप्टिकल एसेज ऑन हिस्टरी ऑफ सायन्स.
लेखिका: मीरा नंदा
प्रकाशक : थ्री एसेज कलेक्टिव्ह
पृष्ठे: ८+ १९६ किंमत : ४७५ रुपये
लेखक टाटा मूलभूत संशोधन केंद्रातील ‘होमी भाभा विज्ञानशिक्षण केंद्रा’त कार्यरत आहेत.
प्रीतेश रणदिवे
ईमेल : astroprit@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 14th May 2016 रोजी प्रकाशित
विज्ञानाचा ‘कालभ्रम’
समाजातील धार्मिक व राजकीय असा कुठलाही पगडा नसलेला सामाजिक गटही त्यात सहभागी आहे.
Written by प्रीतेश रणदिवे
Updated:
First published on: 14-05-2016 at 04:03 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Science in saffron skeptical essays on history of science