नारायणे दिला वसतीस ठाव! तेव्हा सद्गुरूंनी मला जवळ केलं, हा झाला पहिला टप्पा. सद्गुरूच्या जवळ जाणं, त्यांच्यासोबत राहणं, त्यांचा सहवास मिळणं हे एक वेळ साधेल पण त्या सहवासाचा खरा हेतू, खरं मोल उमगेलच असं नाही. त्यांचं बाह्य़रूप पाहिलं पण त्यांची आंतरिक कळकळ ओळखली नाही, तर काय उपयोग? त्यांच्या देहाची सेवा केली पण त्यांच्या उद्दिष्टाशी एकरूप झालो नाही, तर काय उपयोग? त्यामुळे नुसत्या वरवरच्या सहवासानं काही साधणार नाही. त्यांनी वसतीस ठाव देऊनही, जवळ करूनही काही साधणार नाही. श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘ गुरुच्या देहाची सेवा करणे हीच गुरूची सेवा, असे तुम्हाला वाटते का? त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरूची खरी सेवाच नव्हे; गुरू सांगेल तसे वागणे, हीच त्याची खरी सेवा होय. माझ्याजवळ जे येतात, ते कुणी मुलगा मागतो, कुणी संपत्ती मागतो, कुणी रोग बरा करा म्हणून मागतो. तेव्हा माझी सेवा करायला तुम्ही येता की मीच तुमची सेवा करावी, म्हणून येता? माझ्याजवळ येऊन मनुष्यदेहाचे खरे सार्थक होईल, असे करा’’ (प्रवचने, २ जुलै). आपण देहबुद्धीनुसार वावरत असतो त्यामुळे आपल्याला देहसुखाची गोडी असते. आपल्या देहाला सुखकारक सोयीसुविधा कुणी दिल्या तर त्याचा आपल्याला आनंद होतो. त्यामुळे देहाची सेवा हीच आपल्या दृष्टीने खरी सेवा होते. सद्गुरूंमध्ये देहबुद्धी नसतेच. देहभावनेच्या आधारावर ते जगतच नसतात. त्यामुळे त्यांच्या देहाची सेवा ही त्यांना सेवाच वाटत नाही. उलट त्यांनी कळकळीने जे सांगितले ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे, हीच त्यांना खरी सेवा वाटते. त्यातही सेवेसाठी म्हणून गोतावळा जमतो आणि तो आपल्यालाच काय काय कमी आहे, त्याचं रडगाणं सुरू करतो. भौतिकातलं जे कमी आहे ते स्वप्रयत्नानंच मिळवायचा प्रयत्न माणसानं केला पाहिजे. त्यासाठीची सर्व क्षमता, बुद्धी माणसात उपजत आहे. ते प्रयत्न न करता किंवा करीत असतानाही जे आपल्या मनात आहे तेच व्हावं, यासाठी सद्गुरूंकडे प्रार्थना करणं हा त्यांच्या प्राप्तीचा, भेटीचा गैरवापर आहे. म्हणूनच श्रीमहाराज सांगतात, ‘‘पुष्कळांना संतांची गाठ पडते, परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही’’ (प्रवचने, ३ जुलै). संतांचा सहवास हा भौतिकातील प्रगतीसाठी, भरभराटीसाठी नाही. त्यातील अडचणींच्या निवारणासाठी नाही. त्या सहवासातून आपोआप भौतिकाची प्रगती होईलही पण तो त्यांचा हेतू नाही, अग्रक्रम तर मुळीच नाही. त्यांच्या सहवासातून खरा लाभ आहे तो म्हणजे भगवंताचं प्रेम! श्रीमहाराज म्हणायचे की, माझ्याजवळ येऊन तुम्हाला जे मिळेल ते व्यावहारिक जगात कुठेही मिळणार नाही. ते म्हणजे भगवंताच्या नामाचं प्रेम. तेव्हा ज्या ऐक्यभावानं ते भगवंताशी तद्रूप आहेत त्या ऐक्यभावाची प्राप्ती हा नारायणाने वसतीस ठाव दिल्याचा खरा लाभ आहे. त्या ऐक्यभावानंच समस्त भयाचा अंत होऊन खरी नि:शंक आणि निश्चिंत स्थिती लाभणार आहे. त्या सहवासाचं खरं मोल मात्र त्यासाठी कळलं पाहिजे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Aug 2013 रोजी प्रकाशित
चैतन्य चिंतन १५७. खरा लाभ
नारायणे दिला वसतीस ठाव! तेव्हा सद्गुरूंनी मला जवळ केलं, हा झाला पहिला टप्पा. सद्गुरूच्या जवळ जाणं, त्यांच्यासोबत राहणं
First published on: 09-08-2013 at 12:22 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan 157 authentic advantage