वृत्ती सुधारली की कृती सुधारेलच. आज संकुचित वृत्तीतून कृतीही संकुचितच घडते. त्यामुळे परमार्थही संकुचित आणि प्रपंचही संकुचितच असतो. जर वृत्ती सुधारली तर कृती, अर्थात प्रपंचही तिला अनुसरून व्यापकच होईल. मग परमार्थ आणि प्रपंच यात ऐक्य होईल, एकलयता येईल. मग जेव्हा श्रीमहाराज सांगतात, ‘‘वृत्ती बनविणे म्हणजे परमार्थ, बाकीच्या गोष्टी प्रारब्धाने होतील.’’ तेव्हा या ‘बाकीच्या गोष्टी’ म्हणजे प्रपंचच असतो! वृत्ती सुधारली आणि जगण्याचा दृष्टिकोनही सुधारला, व्यापक झाला तर तोवर ‘माझे’पणात जखडलेला प्रपंचही व्यापक होईल. त्यातील कर्तव्ये आपण करू, अगदी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करू पण त्याचं फळ प्रारब्धानुसार आहे, हे आपल्या मनातून कधीही ओसरणार नाही. त्यामुळेच कृती पूर्ण ताकदीनिशी घडत असतानाच भीतीचं ओझं मनात नसेल. हे कसं साधेल? आज आपण प्रपंच सोडू शकत नाही ना, मग प्रपंच करतानाच परमार्थही मनापासून करा, असं श्रीमहाराज सांगतात. ते जेव्हा सांगतात की, ‘वासनेने युक्त परमार्थ म्हणजे प्रपंचच, तर वासनारहित प्रपंचसुद्धा परमार्थच होय.’ तेव्हा आपल्या जगण्यावरील, प्रपंच-परमार्थावरील वासनेचा प्रभाव आणि वासनेचा धोकाच ते उघड करून दाखवतात. वासना, इच्छा, कामना यांसह होणारा परमार्थ हा प्रपंचच असतो तर त्याउलट वासनारहित, इच्छारहित, कामनारहित वृत्तीनं केलेला प्रपंच हा परमार्थच असतो, असंच ते स्पष्ट करतात. मग आपल्यासारख्या प्रपंची माणसाला परमार्थाकडे वळविण्यासाठी ते प्रपंचापासूनच सुरुवात करतात. प्रपंचात रुतून अनंत यातना भोगत असूनही त्यातून सुटण्याचा उपाय माणूस शोधत नाही. हा उपाय म्हणजे प्रपंच सोडणं नव्हे! प्रपंचाची रीत बदलणे, हा तो उपाय आहे. प्रपंचात ‘मी’पणाने मी दुराग्रह, हट्टाग्रह जोपासत असतो, त्या वृत्तीमुळेच मी खरं तर दुख भोगत असतो. प्रपंचाचं वास्तविक स्वरूप जाणलं आणि प्रारब्ध भोगण्यासाठी योग्य असाच प्रपंच लाभला आहे, हे जाणलं तर प्रपंचातलं रुतणंही हळूहळू कमी होत जाईल. एका रेल्वे अधिकाऱ्याची पत्नी श्रीमहाराजांच्या भेटीस आली आणि जवळच्या आप्तांच्या मृत्यूमुळे प्रपंचात तोवर सोसलेल्या आघातांबद्दल कळवळून सांगू लागली. श्रीमहाराज तिला म्हणाले, ‘‘बाई, जगात अनेक आश्चर्ये आहेत. त्यापैकी प्रपंचातील माणूस निर्धास्त असतो, हे एक मोठे आश्चर्य आहे. तो ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेला आहे. तो ज्वालामुखी केव्हा भडकेल याचा नेम नाही. कोणाच्या वाटय़ाला कोणते दुख येईल याचा नेम नाही. मनासारखे न घडणे, सारखे बदलणे, हाच मुळी प्रपंचाचा धर्म आहे. म्हणून अनिश्चित प्रपंचात राहावे पण आधार धरावा भगवंताचा, तरच समाधान टिकेल..’’ (हृद्य आठवणी). तेव्हा ज्वालामुखीच्या तोंडावर बसल्या बसल्या श्रीमहाराजांचा बोध पाहू!
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2013 रोजी प्रकाशित
११. ज्वालामुखी
वृत्ती सुधारली की कृती सुधारेलच. आज संकुचित वृत्तीतून कृतीही संकुचितच घडते. त्यामुळे परमार्थही संकुचित आणि प्रपंचही संकुचितच असतो. जर वृत्ती सुधारली तर कृती, अर्थात प्रपंचही तिला अनुसरून व्यापकच होईल. मग परमार्थ आणि प्रपंच यात ऐक्य होईल, एकलयता येईल.
First published on: 15-01-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan volcano