आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ते कमी जणांना माहीत असतील, कदाचित त्यांचे म्हणणे ‘ही जुनीच माहिती’ किंवा ‘तेच ते आक्षेप’ म्हणून दुर्लक्षिले जात असेल, तरीही त्यांच्यासारख्यांनी बोलत राहणे महत्त्वाचे..

वास्तवाच्या टोकावरले सत्य सांगण्यासाठी मुळात कोणते वास्तव या प्रश्नाला आधी भिडावे लागते, पण बहुतेक जणांची वास्तवाची कल्पना संकुचित असते. त्यापलीकडचे वास्तव चॉमस्की पाहात आहेत..

अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच केटानजी ब्राऊन जॅक्सन या अश्वेत महिला त्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त झाल्या आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे त्या देशात डेमोक्रॅटिक पक्षाचे सरकार सत्तेवर आहे. याच सरकारच्या अमदानीत अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच उपाध्यक्षपदी एक महिला (तीदेखील अंशत: आफ्रिकी-आशियाई आणि अश्वेत) विराजमान झाली. अध्यक्षपदावर जो बायडेन हे प्रागतिक विचारांचे संवेदनशील गृहस्थ आहेत. पण असे असले तरीही नोम चॉमस्की चिंताग्रस्त आणि दुखावलेलेच आहेत. कोण हे नोम चॉमस्की? अमेरिकेतील हे एक विख्यात प्राध्यापक, विचारवंत, मनोविश्लेषक, भाषातज्ज्ञ अशी त्यांची बहुपैलू ओळख. पण सर्वात ठळक ओळख आहे ती अमेरिकेचे, अमेरिकेच्या धोरणांचे प्रखर टीकाकार म्हणून. लोकशाही संवर्धनाच्या नावाखाली अमेरिका एकीकडे जे करते, त्याच्या पूर्ण विपरीत लोकशाहीच्या गळय़ाला नख लावण्याचे उद्योग या देशाच्या अनेक सरकारांनी वर्षांनुवर्षे पार पाडले, हा त्यांचा प्रधान आक्षेप. नव्वदी ओलांडल्यामुळे आताशा त्यांच्या मुलाखती फारशा दिसत नाहीत. पण अलीकडेच ‘द न्यू स्टेट्समन’ या ब्रिटिश नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत, युक्रेन युद्धासाठी रशियाबरोबरच अमेरिकेलाही त्यांनी जबाबदार धरले. पुतिनला माथेफिरू ठरवल्याने पाश्चिमात्य नेत्यांचे आणि विचारवंतांचे काम तसे सोपे होते. पण सप्टेंबर २०२१ मध्ये अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरवण्याचा आपला इरादा जाहीर केला आणि त्या देशाला नाटोकडे खेचण्याचा प्रयत्न केला, हेही सत्य आहे. यांपैकी तुम्हाला कोणते सत्य हवे आहे ते ठरवा, असे सांगत चॉमस्की समोरच्याला अडचणीतच आणतात.

चॉमस्की यांचे हे म्हणणे वरवर पाहाता, कुठे तरी वाचल्यासारखे वाटेल.. विशेषत: भारत जेव्हा रशियाविषयी ‘तटस्थ’ राहिला होता, तेव्हा तर व्हॉट्सअ‍ॅपवर कुणी तरी तटवलेल्या कुठल्याशा संदेशातही अमेरिका-नाटो यांचेच पाप म्हणजे युक्रेन युद्ध, असा सूर दिसत असे.  अमेरिकेतही युक्तिवाद साधारण असाच. पण तरीही चॉमस्की वेगळे ठरतात. ते यासाठी की, समाजमाध्यमांचे वापरकर्ते हे अखेर प्रचारकीपणाच करत असतात. कुठल्या एका बाजूचे प्रचारक नसलेलेही समाजमाध्यमांत स्वत:चेच प्रचारक म्हणून उरतात. पण चॉमस्की हे कुणाचेही प्रचारक नाहीत. त्र्याण्णव वर्षांचे चॉमस्की स्वत:च्या प्रसिद्धीसाठी कुणालाही कुठल्याही मुलाखती देत नाहीत. ते अमेरिकेबद्दल वारंवार ठरावीक आक्षेप घेतात हे चॉमस्की यांच्याबाबतचे निरीक्षण बिनचूक असले तरी ते असमंजस आणि अयोग्य ठरते, कारण आक्षेपांचा तोच तो पाढा वाचतानाच एखादा नवा मुद्दाही ते मांडतात. उदाहरणार्थ, ‘प्रोपगंडातून बाहेर या आणि जरा आठवून पाहा. लोकशाहीवादी चळवळी अमेरिकेइतक्या कोणत्याही देशाने चिरडलेल्या नाहीत. इराण १९५३, ग्वाटेमाला १९५४, चिली १९७३ अशी किती तरी उदाहरणे आहेत..’, हे सारे सगळ्या जगात कितीकांनी कितीतरी वेळा सांगून झालेले, पण त्यापेक्षा महत्त्वाचे ठरते ते चॉमस्की यांचे – ‘चॉमस्की यांच्या मते पुतिन आणि अमेरिका या दोहोंना लोकशाहीविषयी सारखेच ममत्व वाटते!’ हे मत. आणि त्याला जोडूनच येणारा, ‘नाटो विस्ताराची नव्हे, तर रशियाच्या सीमावर्ती देशांमध्ये मुक्त, उदारमतवादी मूल्यांच्या वृद्धीची पुतिन यांना भीती वाटते’ हा युक्तिवाद. चॉमस्की तो करू शकतात कारण ते अमेरिकेची वा रशियाची वा युरोपीय देशांची बाजू घेत नसून, सद्य वास्तवातून ज्या सत्याचा प्रत्यय येतो आहे तेवढेच मांडतात. मात्र तशी मांडणी करताना तात्त्विक संकल्पनांऐवजी, ते माहितीचा आधार घेतात. मग ‘ही तर जुनीच माहिती’ असे म्हणून चॉमस्कींकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना, चॉमस्की हे कुणी वृत्तनिवेदक नव्हेत हे कसे माहीत असणार?

ताज्या मुलाखतीतही चॉमस्की म्हणतात : अफगाणिस्तानमध्ये हजारोंनी माणसे भुकेकंगाल अवस्थेत जगताहेत. तेथे बाजारात अन्न आहे, पण ते खरीदण्यासाठी अफगाणांकडे पैसाच नाही. कारण त्यांच्या हक्काचा पैसा अमेरिकन बँकांमध्ये बंद केलेला आहे. पण अमेरिकनांना आणि युरोपियनांना पुतिन यांच्या अत्याचारांचा राग येतो. चॉमस्की यांच्या मते हा विरोधाभासच. पण तोही कदाचित अनेकांच्या लक्षात येणार नाही कारण वास्तवाच्या टोकावरले सत्य सांगण्यासाठी मुळात ‘कोणते वास्तव’ या प्रश्नाला आधी भिडावे लागते, पण बहुतेक जणांची वास्तवाची कल्पना संकुचित असते. त्यापलीकडचे वास्तव चॉमस्की पाहात आहेत, म्हणून ‘प्रलयघंटावादी’ ठरण्याची तमा न बाळगता ते म्हणतात की जग कधी नव्हे इतक्या धोकादायक वळणावर आहे, कारण एकीकडे रशियन आक्रमणामुळे अण्वस्त्रयुद्धाची शक्यता वाढली आहे. दुसरीकडे अमेरिकेत रिपब्लिकनांचे पुनरुज्जीवन होत असल्यामुळे हवामान बदलाच्या धोक्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणारा गट सत्तेच्या आसपास असल्यामुळे तेथूनही मानव जातीला धोका असल्याचे ते बजावतात.

या सगळ्यामध्ये नोम चॉमस्की काय म्हणतात यापेक्षाही एखाद्या देशामध्ये किंवा व्यवस्थेमध्ये नोम चॉमस्कींसारख्यांचे असणे कित्येक पट अधिक महत्त्वाचे ठरते. सध्याच्या काळात एकमितीय निष्कर्ष काढून, तोच प्रधान ठरवून, एकमितीयच धोरणे आणि कथानके रेटणाऱ्यांची संस्कृती जगभर सगळीकडेच बोकाळू लागलेली आहे. या कोलाहलात चॉमस्की यांच्यासारख्यांचा आवाज ऐकू येणे आणि ऐकला जाणे हे दोन्ही सारखेच महत्त्वाचे. प्रत्येक घटनेला भिन्न बाजू असतात, एकापेक्षा अधिक मिती असतात. सॉक्रेटिस, वॉल्टेयर असोत की आगरकर, डॉ. लागू, तेंडुलकर असोत किंवा चॉमस्की.. यांच्यासारखी मंडळी या मिती दाखवून देतात आणि समाजातील विकृती-वैगुण्याला पृष्ठभागावर आणून सोडतात. लिंकन किंवा डॉ. आंबेडकर हे त्याहीपुढे जाऊन समता आणि समन्यायित्वाला राजकीय मुख्य प्रवाहात आणतात. पण त्यांच्यासारखे थोडेच. त्यांच्याव्यतिरिक्त वर उल्लेखलेल्या चॉमस्कीसारख्या बहुसंख्यांच्या वाटय़ाला अवहेलनाच अधिक येते. ही मंडळी राजकीय व्यवस्थेला अडचणीची वाटतात. तरीही..  आणि तरीही आजतागायत चॉमस्की यांना विमानतळावर देशाबाहेर जाण्यापासून कोणी रोखलेले नाही किंवा त्यांच्या घरावर, आप्तस्वकीयांवर अमेरिकेत एफबीआय, आयआरएस वगैरे तपास यंत्रणांच्या धाडीही पडत नाहीत. काही वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमदानीत त्यांनी अमेरिकनांच्या प्रतिगामित्वाविषयी फार टोकाची विधाने केली होती. त्याबद्दल त्यांच्यावर समाजमाध्यमी जल्पकांच्या फौजा तुटून पडल्याचे वाचनात आले नाही किंवा समाजस्वास्थ्य बिघडवल्याच्या नावाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचेही ऐकिवात नाही. ब्रेग्झिटसाठी त्यांनी थेट त्या देशातील हुजूर पक्षाला जबाबदार धरले आहे. हा तोच हुजूर पक्ष, ज्याच्या काही खासदार व मंत्र्यांची बीबीसीला ‘आमच्या पैशावर जगतात नि आमच्याविरोधात बातम्या कशा देतात. यापुढे निधी पुरवण्याचा फेरविचार होईल’ असा दम देण्यापर्यंत मजल जाते. सत्तास्थानी असलेले आपल्या विवेकाचा आकार ठरवू शकत नाहीत, याची जाणीव देणाऱ्या- त्यासाठी जाब विचारत राहणाऱ्या चॉमस्की यांच्यासारख्यांचे असणे – आणि त्यांचे मुक्त असणेसुद्धा- अलीकडे दुर्मीळ आणि म्हणून महत्त्वाचे ठरते.

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chomsky old information really reality imagination compressed democratic party government ysh