मराठी साहित्य इतिहासाच्या विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक विचारप्रवाह नि साहित्यप्रकारांचे साहित्य निर्माण होऊन ते बहुआयामी बनले. यातही दलित साहित्य आणि आत्मकथांनी मराठी साहित्यात युगांतर घडवले. हिंदी साहित्यात १९३६मध्ये प्रेमचंदांनी ‘प्रगतिशील लेखक संघ’ स्थापून परंपरागत हिंदी साहित्यात दिशांतर घडवून आणले, त्याचवेळी १९३६ मध्ये- मराठी साहित्याचा ऊहापोह ‘अखिल मुंबई इलाखा महार परिषदे’त झाला. त्या वेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले बीजभाषण स्वातंत्र्योत्तर काळात मराठी साहित्याचे दिशांतर घडवून आणणारे ठरले.

पुढे १९७०च्या दशकापासून दलित साहित्य संमेलने होऊ लागली, त्यापैकी १९८१मध्ये अमरावतीत भरलेल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. स्वातंत्र्योत्तर काळात विविध दलित, बौद्ध, आदिवासी साहित्याचे अध्यक्षपद पु. ल. देशपांडे, ग. त्र्यं. माडखोलकर, गं. बा. सरदार, भाई माधवराव बागल, प्रा. भालचंद्र फडके, अरुण साधू प्रभृती दलितेतर महानुभावांकडे होते, यातून एकप्रकारचा उदारमतवाद उभयपक्षी दिसून येतो.

तर्कतीर्थांनी १९८१च्या दलित साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणात दलित साहित्यास व्यापक क्षितिज देणारी व्याख्या करीत म्हटले होते की, ‘दलित अथवा अन्यांनी (दलितेतर) दलितांविषयी लिहिलेले साहित्य म्हणजे दलित साहित्य होय.’ डॉ. जनार्दन वाघमारे यांनी तर ‘सबाल्टर्न लिटरेचर’ आणि ‘ब्लू साँग्जह्णसारख्या विश्वसाहित्यास भारतीय दलित साहित्य जोडले होते.

तर्कतीर्थांनी या भाषणात स्पष्ट केले की, ‘‘दलित साहित्यासंबंधी व्यापक व उदार विचार होणे आवश्यक आहे. एकोणिसाव्या शतकातील दलित हा दबलेला होता. विसाव्या शतकात अस्पृश्यतानिवारण कार्य, समाजसुधारणा, साहित्य विकास इत्यादींमुळे ‘अत्त दीप भव!’ असे म्हणणारा आत्मदीप समाज उदयाला आला. दलितांनी ज्या व्यथा-वेदना भोगल्या, त्यामुळे त्यांचे साहित्य प्रक्षोभक होणे स्वाभाविकच म्हणायला हवे. या साहित्यात भोगलेल्याचा दाह आहे आणि विद्रोहाचा हुंकारही! … ज्या साहित्यात असे संकटग्रस्तांचे अनुभव भरलेले असतात, ते पुढच्या पिढीसाठी संकटमोचक सिद्ध होत असते. दलित साहित्य विद्रोही असल्याने ते व्यापक सामाजिक शोध घेत असल्याचे दिसून येते. मराठी दलित साहित्य परंपरा, रूढींविरुद्ध बंड करणारे आहे. या साहित्यात दास्यत्वाचे दारुण चित्र आढळते. ते वाचताना हृदय पिळवटून येते. भारतीय प्राचीन साहित्यात अशा दलितांवरील अन्याय, अत्याचारांच्या कथा दिसून येतात. ‘गुणकर्मविभागश:’ विचारातून तत्कालीन समाजात चातुर्वर्ण्याची निर्मिती झाल्याचे लक्षात येते. असे असले तरी या व्यवस्थेत स्थित्यंतर शक्य आहे. खरे पाहिले असता आदर्श समाजरचनेत ‘माणूस’ ही एकच जात असायला हवी. त्यामुळे जर आपणास मानवी समाजाचा खऱ्या अर्थाने विकास करावयाचा असेल, तर त्यासाठी समाजात आत्मशोध वृत्ती असायला हवी. त्यासाठी समाजात निरंतर आदान-प्रदान होत राहणे गरजेचे असते. वर्तमान मराठी दलित साहित्य व समाजाचे भविष्य उज्ज्वल आहे, यात शंका बाळगायचे कारण नाही. कारण जगभरच समाज उदारमतवादी बनत चालला आहे. आज मराठी दलित साहित्य राष्ट्रव्यापी बनत आहे. मराठी दलित साहित्य ही मराठी वा महाराष्ट्राने भारतीय भाषा आणि साहित्यास दिलेली देणगी व योगदान आहे. हे साहित्य युगांतरसूचक आहे.’’

मराठीत दलित साहित्याचा उदय होणे ही तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या दृष्टीने युगांतरसूचक घटना होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हा या साहित्याचे तर्कतीर्थ अधिष्ठान मानतात. शंबुक आणि एकलव्य यांची उदाहरणे दलित साहित्याचे उगमबिंदू म्हणून पाहता येतात, असे त्यांनी आपल्या भाषणात साधार स्पष्ट केले आहे. ‘रामायण’, ‘महाभारत’ या महाकाव्यांत अशा अनेक कथा, प्रसंगांतून तत्कालीन दलित स्थितीवर प्रकाश पडतो, हेही तर्कतीर्थ या भाषणातून स्पष्ट करतात. आंबेडकरवाद, मार्क्सवाद यांच्यासंदर्भात तर्कतीर्थांनी आपल्या भाषणात दलित साहित्याचा विचार केलेला दिसतो.