मुंबईतून प्रकाशित होणारे ‘अलका’ मासिक आधी नव कला मंडळ, मुंबई आणि नंतर पॉप्युलर प्रकाशन चालवत असे. मराठी चित्रपट, साहित्य आणि स्त्रियांच्या लेखनासाठी ते विशेष प्रसिद्ध होते. पु. ल. देशपांडे, गंगाधर गाडगीळ, व. पु. काळे, ग. दि. माडगूळकर, द. मा. मिरासदार यांचे लेखन विशेषत्वाने यात प्रकाशित होत असे. विसाव्या शतकाच्या पाचव्या दशकात या मासिकाचे दिवाळी अंक ग. रा. जोशींच्या संपादनामुळे वाचनीय असत. १९५६ च्या ‘अलका’च्या दिवाळी अंकात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींचा ‘क्रांतीच्या नव्या साधनेची आवश्यकता’ शीर्षक लेख प्रकाशित झाला होता. तो गाजला. सांस्कृतिक अध:पतनाचा वेग वाढण्याची चिंता व्यक्त करीत लिहिला गेलेला हा लेख नव बदलाचे सूचन होय.
या लेखात गेल्या ५०० वर्षांतील वैश्विक परिवर्तनाचा आढावा आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर मार्क्सवादी विचारांचे गारूड जगावर होते. क्रांतीनेच समाजवादी समाजरचना शक्य असल्याच्या भ्रमकाळास छेद देत क्रांतीच्या नव्या साधनेची आवश्यकता तर्कतीर्थ अधोरेखित करतात. चौदाव्या शतकापूर्वीचे जग पारलौकिक होते. पुनरुज्जीवन चळवळीमुळे ऐहिक जीवनाचे महत्त्व माणसास उमगले. ही जागृती इटलीच्या महाकवी डांटेमुळे घडली. धर्म नि पुरोहित सत्तेचे वर्चस्व झुगारण्याची प्रेरणा जगास देण्याचे कार्य त्याने केले. निधर्मी राज्यसत्तेची आवश्यकता यातून निर्माण झाली. आधी राजकारण आणि मग समाजकारणाचे सूत्र, यातून चौदाव्या शतकात उदयास आले होते. (आधी राजकारण की समाजकारण हे द्वंद्व महाराष्ट्र देशी विसाव्या शतकाच्या आरंभी दिसते.) धर्मसत्तेच्या जागी राज्यसत्ता नि राज्यसत्तेच्या जागी लोकसत्ता, असा सामाजिक क्रांतीचा प्रवास पाचशे वर्षांचा दिसून येतो.
रशियात समाजवादी क्रांती पहिल्या महायुद्धानंतर सुरू झाली. या सामाजिक क्रांतीचे मुख्य ध्येय स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूळ फ्रेंच राज्यक्रांतीच्या अठराव्या शतकाच्या अंतिम दशकातील समाजमूल्यात शोधता येऊ शकते. ऑक्टोबर क्रांती (१९१७) होऊन तीन दशके उलटली तरी रशियात या मूल्यांचा मागमूस दिसू नये, याचे आश्चर्य आणि चिंता तर्कतीर्थांसारख्या समाजचिंतकास वाटणे स्वाभाविकच म्हणायला हवे. तिथे आर्थिक क्रांती होऊन लष्कर सत्तेच्या हाती तिची सूत्रे गेल्याने एकचालकानुवर्ती सत्ता अस्तित्वात आली. लोकसत्तेचे स्वप्न दाखवून निर्माण झालेली क्रांती, तिची परिणती निरंकुश सत्तेत होण्याचे कामगार आणि सामान्य जनता राज्यसत्तेच्या जोखडाखाली नवे पारतंत्र्यच भोगत होती. क्रांतीच्या नव्या साधनेची आवश्यकता त्यातून निर्माण झाली.
राज्यसत्तेला एकांगी महत्त्व दिल्याची परिणती म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याचा लोप होय. मानवी जगाचे राजकारण (१९५६) दूषित झाल्याने विचारस्वातंत्र्याची महती पटलेला प्रगल्भ समाज निर्माण करण्याचे आव्हान जगास भेडसावू लागले. लोकशिक्षण, लोकजागृतीमुळे लोकसत्ता बळकट होऊ शकते, असा विश्वास तर्कतीर्थ व्यक्त करीत, तीच नव्या क्रांतीची नवी साधने असल्याचे या लेखातून लक्षात आणून देतात. आजचा सुशिक्षित समाज मनोदौर्बल्याने पछाडलेला आहे. प्रचंड सामाजिक उलथापालथीत तो एकाकीपण अनुभवत आहे. स्वहिताकडे दुर्लक्ष केले, तर आपली लांडगेतोड होईल, याचे कधी नव्हते इतके भय त्याच्यात निर्माण होणे, हे समाजक्रांतीचे यश की अपयश, असा प्रश्न निर्माण होतो.
सामाजिक जीवनात बंधुत्वाचे स्नेहमय संबंध आवश्यक असल्याच्या काळात असणारी हताशा जीवघेणी असते खरी! यामुळे व्यक्तीत आत्मश्रद्धेचे बळ उरत नाही, ही वर्तमानाची खरी शोकांतिका आहे. म्हणूनच कोणत्याही संघशरण, उद्दाम, भावनात्मक हुकूमशाही प्रसाराची बाधा होऊन तो बेभानपणे नेत्यास व पक्षास वश होतो. आक्रमक राजकारणाचा तो बळी ठरतो. आजची सामाजिकता त्याच्या व्यक्तित्वाला समर्थ व नित्य विकासाभिमुख का करीत नाही, हा प्रश्न सोडविल्याशिवाय विश्वबंधुत्वाचे, समतेचे व मानवी स्वातंत्र्याचे ध्येय दृष्टिपथात येणार नाही, हे तर्कतीर्थांचे आकलन १९५६ इतकेच २०२५लाही वैश्विक मानवी समाजाच्या सद्या:स्थितीचे भयसूचन ठरते. त्या त्या राष्ट्रातील माणसांचे परस्पर संबंध जर परस्परांच्या बंधुत्वावर व विवेकपूर्ण सहकार्यावर आधारले गेले तरच विश्वबंधुत्व जागृत होईल, असा त्यावेळी व्यक्त केलेला आशावाद आजही आवश्यक वाटणे यात तर्काधिष्ठित भविष्य चिंतनाचे प्रतिबिंब अनुभवास येते.
– डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com