तसे त्यांचे नाव दयानंद बांदोडकर; पण गोव्यात नि परिचितांत ते भाऊसाहेब बांदोडकर म्हणूनच ओळखले जात. तर्कतीर्थांचा नि त्यांचा सहवास, परिचय १९३६ पासूनचा; पण घनिष्ठता आली ती मुख्यमंत्री झाल्यावरच. १९७१ ला त्यांचा षष्ट्यब्दीपूर्ती समारंभ झाला, तेव्हा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला होता. त्यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी गौरवलेख लिहिला. त्याचे शीर्षक आहे, ‘अनेक तेजस्वी पैलू असलेले व्यक्तिमत्त्व : भाऊसाहेब बांदोडकर’. १९६२ पासून ते १९७३ पर्यंतच्या सुमारे दशकभरच्या सहवासातून उमगलेले भाऊसाहेब या लेखातून जिवंत होतात.

दयानंद बांदोडकर यांचे मूळ घराणे तुळजापूरचे. ते गोव्यातील पेरनेम इथे जन्मले. गरिबीतून स्वकष्टाने मोठे झाले. त्यांचा मूळ शेती व्यवसाय होता. ते पुढे खाण मालक झाले. गोवा मुक्तीनंतर ते गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा, या मताचे होते. म्हणून त्यांनी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाची स्थापनाही केली होती, परंतु गोव्यातील मूलनिवासी ख्रिाश्चनांचा विलीनीकरणास विरोध होता, म्हणून केंद्र शासनाने जनमत घेतले. त्यात गोवा स्वतंत्र राज्य करण्याच्या बाजूने कौल गेला. स्वतंत्र गोवा राज्याच्या पहिल्या निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षास बहुमत मिळून दयानंद बांदोडकर मुख्यमंत्री झाले. ते मृत्यूपर्यंत (१९७३) या पदावर होते.

१९६३ ला एका शेतकरी परिषदेच्या निमित्ताने तर्कतीर्थ गोव्यास गेले असता त्यांचा भाऊसाहेबांशी निकट परिचय झाला. पहिल्या गोमांतक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व दुसऱ्या संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून तर्कतीर्थांचे गोव्याला जाणे झाले होते. या संपर्कातून उमगलेल्या भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब या लेखात उमटले आहे.

भाऊसाहेब बांदोडकरांचे व्यक्तिमत्त्व गौरकाय, टणक, भरदार, तेजस्वी होते. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलन काळात ते मुंबईत होते. त्या काळात मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांनी त्यांना भारून टाकले. या काळात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी मानवेंद्रनाथ रॉय यांनी स्थापन केलेल्या ‘रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टी’चे प्रवक्ते म्हणून कार्यरत होते. या पक्षाच्या अनेक कार्यक्रम, उपक्रमांमध्ये भाऊसाहेब उपस्थित असत.

भाऊसाहेब बांदोडकर गरिबीतून श्रीमंत झाले; पण जुने दिवस विसरले नाहीत. त्यामागचे रहस्य सांगत तर्कतीर्थांनी नमूद केले आहे की, ‘‘महात्मा गांधींनी, श्रीमंती ही श्रीमंती नव्हे, त्यावर गरिबांचीच मालकी आहे. श्रीमंतीला केवळ विश्वस्त म्हणूनच अधिकार आहे, हा सांगितलेला श्रीमंतीचा आदर्श मला भाऊसाहेबांमध्ये आढळला.’’ भाऊसाहेब जिथे राहात, त्या परिसरात ख्रिाश्चन कोळ्यांची वस्ती होती. त्यांना होड्या, जाळी इत्यादींसाठी मदत करण्यास भाऊसाहेब नेहमी तत्परता दाखवत. गोवा हे कलाकारांचे निजधाम. इथे उत्सव व यात्रांचा सुकाळ असतो. भाऊसाहेब उत्सवप्रेमी. मंदिर, चर्च इत्यादींना मुक्तहस्ते मदत करण्याचा रिवाज त्यांनी पाळला. धार्मिक पावित्र्याबद्दल त्यांच्या मनात ओढ होती. हिंदू-ख्रिाश्चन असा भेद त्यांनी मानला नाही. मानवी समानतेचे तत्त्व त्यांच्या अंगी बाणलेले होते, ती त्यांची निष्ठा होती. ही निष्ठा त्यांची कृतीच बोलवून दाखवीत असे.

भाऊसाहेबांनी आपल्या हयातीत हिंदू, मुस्लीम, ख्रिाश्चन अशा सर्व थरांतील बहुजनांच्या मनात अढळपद संपादन केले होते. त्यामुळे सर्व सार्वजनिक निवडणुकांत त्यांच्या पक्षास बहुमत मिळत गेले. ते राजकीय मुत्सद्दी नव्हते. मुत्सद्द्याला लागणारी बुद्धिमत्ता त्यांच्या ठायी होती; पण इतरांच्या नाना कळा ते ओळखून होते, असे दिसून येते. सडेतोड बोलण्याच्या दोषामुळे अनेकांना त्यांनी नाराज केले. राजकीय मुत्सद्दीपणाला खोल मन व मौन आवश्यक असते. नुसती बुद्धी राजकारणात उपयुक्त ठरत नाही. भांडवल संचयकला त्यांच्यात मजबूत दिसते, परंतु त्यांनी राजकीय भांडवलसंचय केल्याचे दिसत नाही. ते रसिकमनाचे होते. कलेवरील प्रेम घरातील चित्रसंग्रहातून स्पष्ट होते. ते मैदानी खेळांचे शौकीन होते. त्यांना शिकारीचा छंद होता. त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांगांनी समृद्ध दिसण्यात तर्कतीर्थांचा उदार मनाचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. भाऊसाहेब बांदोडकर राजकीय ध्येयवादी असले, तरी व्यावहारिक दृष्टीने बहुजन समाजहिताचा निरंतर विचार त्यांचा स्थायिभाव होता.

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com