इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे (१८६३ ते १९२६) यांनी मराठ्यांचा इतिहास, मराठी भाषेचे व संस्कृतीचे ऐतिहासिक व्याकरण, जुन्या (प्राचीन) मराठी वाङ्मयाचा इतिहास, भारतीय इतिहासाची समाजवैज्ञानिक चिकित्सा, भारतीय विवाह संस्थेचा इतिहास, अशी मूलभूत स्वरूपाची कार्ये करून मराठीत इतिहास लेखनाची वैज्ञानिक व वस्तुनिष्ठ परंपरा पुढे नेली. त्यांनी जे विपुल व विविधांगी लेखन केले, त्यातील प्रातिनिधिक लेखनाचा संग्रह म्हणजे राजवाडे लेखसंग्रह होय. वि. का. राजवाडे यांच्या विविधांगी लेखनाचे प्रातिनिधिक प्रतिबिंब म्हणजे हा लेखसंग्रह. या लेखांची निवड तर्कतीर्थांनी ‘साहित्यगुणालंकार’ निकषावर केली आहे. वि. का. राजवाडे यांनी जे लेखन केले, त्यामागे एक विशिष्ट दृष्टी होती. भारतीय समाजास पुनरुज्जीवन प्रेरणा मिळावी, अशी धडपड त्यामागे होती. भारतीय स्वाभिमान आणि वैज्ञानिक संस्कृती या दोन्हींचा लाभ झाल्याशिवाय भारतात युरोपसारखे नवजीवन अवतरणार नाही, अशी खात्री असल्याचा राजवाडे यांचा विश्वास होता. तो तर्कतीर्थांनी आपल्या या प्रस्तावनेत मांडला आहे. या प्रस्तावनेत त्यांनी वि. का. राजवाडे यांच्या एकंदर जीवन, साहित्य व कार्य, विचारांचा संक्षेपाने आढावा घेऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व वाचकांपुढे उभे केले आहे. त्यांचे कार्य अनवट (प्रभावी) कसे होते, ते रेखांकित केले आहे. नव्या ज्ञानाचा प्रकाश समाजास लोकभाषेतून मिळायला हवा, या उद्देशाने वि. का. राजवाडे यांनी ‘भाषांतर’ हे मासिक सुरू केले. ते अल्पजीवी ठरले, तरी प्लेटोच्या ‘ऑन रिपब्लिकन’सारख्या विश्वविख्यात कृतीच्या भाषांतराचे आरंभिक खर्डे याच मासिकातून प्रकाशित झाले होते, हे कोण विसरेल. वि. का. राजवाडे यांचे जीवित कार्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’चे २२ खंड हा इतिहास लेखन पद्धतीचा दीपस्तंभ होय. राजवाडे यांनी ‘विश्ववृत्त’, ‘ग्रंथमाला’, ‘सरस्वती मंदिर’, ‘प्राची प्रभा’, ‘इतिहास व ऐतिहासिक’, ‘रामदास व रामदासी’, ‘केसरी’, ‘संशोधन वृत्त’सारख्या नियतकालिकांतून विपुल लेखन केले. ते आपणास ‘इतिहासाचार्य’ वि. का. राजवाडे समग्र साहित्याच्या १३ खंडांमध्ये वाचनास उपलब्ध आहे.
वि. का. राजवाडे यांच्या साहित्य साधनेचा गौरव करत या प्रस्तावनेत तर्कतीर्थांनी म्हटले आहे की, ‘त्यांनी अनिकेत बनून; परंतु स्थिरमतीने साहित्य लेखन केले.’ तर्कतीर्थांनी या प्रस्तावनेत राजवाडे यांच्या इतिहास लेखनाविषयी धारणा नि दृष्टिकोनासंबंधी विस्ताराने विवेचन केले आहे. त्यातून भारतीय इतिहास लेखनाची मूलतत्त्वे स्पष्ट होण्यास साहाय्य होते. राजवाडे यांचे इतिहासलेखन म्हणजे वैज्ञानिक लेखनाचा वस्तुपाठच म्हणावा लागतो. त्यांनी साहित्य, इतिहास, समाज अशी गुंफण करीत लेखन केल्याने ते एकांगी राहत नाही, हेही तर्कतीर्थांनी या प्रस्तावनेत स्पष्ट केले आहे, याशिवाय वि. का. राजवाडे यांच्या संस्थात्मक कार्यावरही या प्रस्तावनेत प्रकाश टाकण्यात आला आहे. भारत इतिहास संशोधन मंडळाचे कार्य या संदर्भात महत्त्वाचे ठरते.
वि. का. राजवाडे यांनी स्वीकारलेली इतिहास कल्पना ही पाश्चात्त्य विचारवंतांनी मान्य केलेली संकल्पना होय. ती स्वीकारून त्या पद्धतीने लेखन करण्याचा कटाक्ष त्यांनी पाळला. असा कटाक्ष पाळणारे ते पहिले भारतीय इतिहासकार होत, म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी या लेखसंग्रहाच्या संपादनाचा घाट घातला. साहित्य अकादमीने हे संपादन प्रकाशित करून राजवाडे यांच्या जीवन, कार्य, विचारास एका अर्थाने राष्ट्रीय मान्यता देण्याचे कार्य केले आहे.
या संग्रह संपादनातून तर्कतीर्थांनी राजवाडे यांच्या तत्त्वज्ञानाचे आणि भारत, महाराष्ट्राच्या इतिहासाचे तर्कसंगत व सम्यक दर्शन घडविले. राजवाडे यांनी इतिहासास विज्ञानाप्रमाणे अभ्यासले विज्ञानास अपेक्षित वस्तुनिष्ठ लेखनशैली राजवाडे यांच्या समग्र लेखनाचे बलस्थान आहे, हे या संग्रहातून स्पष्ट होते. ‘‘इतिहासाचे काम फक्त प्रसंगाची विश्वसनीय हकीकत देण्याचे आहे. कालाचे पौर्वापर्य (अनुक्रम व संगती) लावून व प्रसंगांचे कार्यकारणत्व सिद्ध करून भूत (घडलेल्या) गोष्टी अशा सातत्याने (क्रमाने) झाल्या इतके सांगितले म्हणजे इतिहासाची कामगिरी आटोपली,’’ या राजवाडे यांच्या विधानातून त्यांचा इतिहास लेखनविषयक दृष्टिकोन पुरेशा प्रमाणात स्पष्ट होतो.
– डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com