कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांची जन्मशताब्दी १९७३ मध्ये साजरी झाली. त्यानिमित्त तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी २२ एप्रिल, १९७३ च्या दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये ‘विश्वधर्माचा प्रज्ञावंत प्रवक्ता : कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे’ शीर्षकाचा गौरवपर स्मृतिलेख लिहून त्यांचे कार्य आणि विचार लक्षात आणून दिले होते.
नव्या सत्याच्या शोध व दर्शनाकरिता निघालेली माणसेसुद्धा ‘एकला चलो रे’ म्हणत मार्गक्रमण करीत असतात. अशांपैकी एक कर्मवीर शिंदे होते. आपल्या आयुष्याचा सूर्य कलता झाल्यावर सावल्या लांब पडत असताना या महर्षीने म्हटले होते, ‘‘अस्पृश्यतेचा छडा लावण्यात निवारण्याचा भाग तर राहू द्या, मला स्वत:ला जो जन्मभर अनुभव आला आणि आनंद झाला, तो लक्षात घेता मला आणखी एक जन्म मिळाला, तर तो याच बांधवांत आणि त्यांच्या सेवाशुश्रूतेत खर्चीन, अशी उमेद वाटली आहे.’’ तर्कतीर्थांनी महर्षींचे उद्धृत केलेले हे उद्गार त्यांच्या अस्पृश्यता निवारण कार्याची प्रतिबद्धता अधोरेखित करणारे ठरतात.
१९३५ मध्ये ‘किर्लोस्कर’ मासिकाने कर्मवीर शिंदे यांची ‘महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग’ अशी शीर्षक मुलाखत प्रसिद्ध केली होती. त्यात कर्मवीरांनी तरुणांना आवाहन करत म्हटल्याची नोंद तर्कतीर्थांनी करून ठेवली आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘तरुण पिढीने आपण केवळ हिंदी आहोत, एवढेच ध्यानात ठेवावे. एकी करावयाची तीसुद्धा महाराष्ट्रापुरती न करता प्रांतिक भेद व मात्सर्य यांना आपणामध्ये येऊ देऊ नये. तरुणांनी आपला दिलदारपणा विश्वकुटुंबीयत्वाला शोभेल असाच ठेवला पाहिजे.
महर्षी शिंदे यांना सामाजिक विसंगतीचा तिटकारा होता. तो लक्षात आणून देत तर्कतीर्थ या विश्वमानवाच्या विचारांचा अंगीकार करीत म्हणतात, ‘‘एका बाजूला समाजवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, समतावाद, बहुजनहितवाद वगैरे तत्त्वांचे उच्च घोषाने प्रतिपादन व उलट दिशेने सामाजिक बनवेगिरी, साम्राज्यवाद, संकुचित राष्ट्रवाद, जातनिष्ठा, वंशशुद्धी इत्यादी रूढ भावनांवर आधारलेला प्रचार हा वैचारिक विरोध होय.’’ सामाजिक क्रांतीच्या भावी झंझावाताचे व नव्या मतांच्या मूल्यांच्या भावी वावटळीचे आवाहन करण्यात शिंदे यांचा जन्म गेल्याची नोंद तर्कतीर्थांनी या लेखात करून ठेवली आहे. ऐतिहासिक दृष्टीने भारतीय समाजरचनेत हिंदू धर्म व तत्त्वज्ञान यांची मांडणी होणे त्यांना आवश्यक वाटत होते. या दृष्टिकोनातून त्यांनी परंपरागत हिंदू धर्म व रूढ हिंदू धर्म यांची समीक्षा केली आहे. याबाबत तर्कतीर्थ व कर्मवीर यांच्यात साम्य दिसून येते.
हिंदू समाजाचा दृष्टिकोन जातिवादी आहे. उच्च-नीच जातिभेद म्हणजे उच्च-नीच वंशभेद होय. या तऱ्हेचा विचार हा जातिभेदाचा पाया आहे. हा पायाच खोटा व भ्रांतिमय आहे. उच्च-नीच जातिभेदाचा अत्यंत विषारी व समाजघातक परिणाम म्हणजे अस्पृश्यतेची संस्था होय, या विचारांवर कर्मवीर शिंदे ठाम होते. या विचारांवर आधारित त्यांचे लिखाण याचीच साक्ष होय. जातिभेद उत्पत्तीसंबंधी कर्मवीर शिंदे यांचे विचार पाश्चात्त्य विचारक पार्जिटरच्या विचारांचे होते. म्हणून तर्कतीर्थांचे म्हणणे होते की, ‘‘सर्व प्रकारच्या भावनामय चळवळी असतात. आपण कोठूनही सुरुवात करा, शेवटी एकाच उगमापाशी पोहोचतो. तो उगम आध्यात्मिक होय. व्यापक नीतितत्त्वांवर आधारलेले वर्तन हेच त्या परमपवित्र विश्वसाक्षी शक्तीच्या भक्तीचे साधन होय. विशेषत: दलित व परतंत्र मानवाला मुक्त करण्याकरिता करावयाची सेवा ही या देवाची खरी पूजा होय, अशी श्रद्धा विश्वधर्माच्या प्रेरणेने शिंदे यांना मिळालेली होती.’’
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज समर्थक उपासना पद्धतीचे प्रचारक होते. आयुष्याच्या उत्तरायण काळात ते वाई मुक्कामी असत. त्या काळात तर्कतीर्थांच्या सहवासात ते जेव्हा आले, तेव्हा तर्कतीर्थांच्या घरी दलित मुलगा राहतो, जेवतो, शिकतो; स्वयंपाकघरात दलितांची सर्रास ये-जा पाहून कर्मवीरांच्या आश्चर्यास पारावार उरला नव्हता. गावात माहीत नसलेली ही गोष्ट कर्मवीर शिंदे यांनी आपल्या वाईतील एका भाषणाद्वारे समाजाच्या लक्षात आणून देऊन तर्कतीर्थ केवळ वेदान्ती नसून, कर्ते सुधारक असल्याचे म्हटले होते. कर्मवीरांच्या प्रार्थना समाजकार्यास तर्कतीर्थांचा सक्रिय पाठिंबा म्हणजे तिथे सुरू झालेले प्रार्थना समाजाचे अनाथ बालकाश्रम होय. त्यास तर्कतीर्थ, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज कार्यकर्ते सर्वतोपरी सहाय्य करीत.
drsklawate@gmail.com