samyog gandhi s concept of satyagraha acharya vinoba bhave thought on satyagraha zws 70 | Loksatta

साम्ययोग : संत-वीर अतुलित बलधामा

गांधीजींना आपले सत्याग्रह कितीही अपुरे वाटत असले, तरीही त्याची बलस्थाने विनोबांनी नेमकेपणाने सांगितल्याचे दिसते.

साम्ययोग : संत-वीर अतुलित बलधामा
( प्रतिनिधिक छायाचित्र )

अतुल सुलाखे

शत्रूवर प्रेम करणे सर्वात सुरक्षित.

– विचारपोथी, विनोबा

गो-स्वामी तुलसीदासजींच्या रचनेमध्ये थोडा बदल केला की सत्याग्रहाचा गांधीप्रणीत अर्थ उकलतो. खरेतर मूळ ‘रामदूत’ शब्दही ठीक वाटला असता. गांधीजी आणि विनोबांची रामनामाविषयीची अभंग निष्ठा पाहिली की त्यांना आधुनिक काळातील ‘रामदूत’ म्हणता येतेच. परंतु मग त्यात विचारप्रधानता राहणार नाही. त्यामुळे ‘संत वीर’ म्हणणेच योग्य ठरेल आणि त्यामुळे सत्याग्रह विचार केंद्रस्थानी राहील.

संत आणि वीर या दोन शब्दांमधे आपल्याकडच्या दोन भव्य परंपरा सामावल्या आहेत. इथे संत, गाथा या मध्ययुगीन गोष्टी आहेत, असा समज झाला असेल तर तो गैर आहे. विनोबांच्या मते या संकल्पना वेदांइतक्याच प्राचीन आहेत. वीरांची परंपरा किती जुनी आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

विनोबांच्या मते, भारतात दोन विचारप्रवाह चालत आले आहेत. पहिला आहे, ‘वैराने वैर वाढते म्हणून निर्वैर राहायला हवे.’ दुसरा आहे, ‘समाजात कुठेही अन्याय होत असेल, तर त्याचा प्रतिकार केलाच पाहिजे.’ पहिला विचारप्रवाह म्हणजे संतांची परंपरा. कबीर, तुलसीदास या प्रवाहात येतात.

दुसरा प्रवाह वीरांचा. अन्याय प्रतिकाराच्या प्रवाहात महाराणा प्रताप, छत्रपती शिवराय आदि वीर आणि वीरांगना यांचा उदय झाला. अन्यायाचा प्रतिकार शस्त्रानेदेखील केला पाहिजे असे त्यांनी मानले. तथापि त्यांनी स्वत:हून कोणावर आक्रमण केले नाही. प्रतिकार करू पण स्वत:हून कोणावर आक्रमण करणे अन्यायाचे आहे.

गांधीजींनी संत परंपरा आदर्श मानली आणि तिला प्रतिकाराशी जोडले. त्यांनी म्हटले, आम्ही निर्वैर राहू तथापि प्रतिकारही करू. जगासमोर हा एक फार मोठा विचार त्यांनी ठेवला. एरवी समाजात बुद्धिभेद सुरू राहिला असता आणि समाजाचे तुकडे पडले असते. सत्याग्रहामुळे दुग्धशर्करा न्यायाने निर्वैरता आणि प्रतिकार यांचे ऐक्य झाले. दोन्ही विचारधारांचे बळ वाढले.

सत्याग्रहापूर्वी लोक प्रेमाचे महत्त्व जाणत होते तथापि, प्रेम आपले रक्षण करेल असा त्यांचा विश्वास नव्हता. हेच ज्ञानाच्या बाबतीतही लागू आहे. ज्ञानाचे महत्त्व लोकमान्य असले तरी ज्ञानरक्षकही आहे, असा विश्वास नसतो. त्यामुळेच एकीकडे सैन्य आहे आणि दुसरीकडे शिक्षण खातेही आहे, असा विरोधाभास दिसतो. मोठे लोक हा विरोधाभास कमी करण्याचा प्रयत्न करतात पण ही शिलाई टिकाऊ नसते.

सर्वोदयात सत्याग्रहाचे जे दर्शन झाले त्यामुळे ही शिलाई कमी झाली. ताणाबाणा नष्ट होऊन एकरूप होऊन अखंड वस्त्र तयार झाले. सत्याग्रहात संत आणि वीर या दोन्ही परंपरा एकरूप होतात हे त्या मार्गाचे वैशिष्टय़ आहे.

गांधीजींना आपले सत्याग्रह कितीही अपुरे वाटत असले, तरीही त्याची बलस्थाने विनोबांनी नेमकेपणाने सांगितल्याचे दिसते. गांधीजींच्या नंतरचा सत्याग्रहाचा मार्ग कसा विकसित झाला हे लेखाच्या सुरुवातीला आलेल्या विनोबांच्या वचनातून स्पष्ट होते. शत्रू समोर आला तरी आम्ही प्रेमरूपी शस्त्रानेच त्याचा प्रतिकार करू.

jayjagat24@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
लोकमानस : भारतातील सत्ताधारी ब्रिटनकडून धडा घेतील?

संबंधित बातम्या

देश-काल : वेदनादायक सत्याचा दाखला!
अन्वयार्थ : नेपाळ  कोणाकडे?
साम्ययोग : भूदानस्य कथा..
लोकमानस : पाकिस्तानविरोधात सज्ज राहावेच लागेल
चतु:सूत्र (गांधीवाद) : दोन महामानवांचे जीवनदर्शन

व्हिडिओ

ताज्या बातम्या
धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण असू शकतो? यावर सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला खुलासा
ओला, उबरच्या धर्तीवर बेस्टची टॅक्सी सेवा; पुढील सहा महिन्यांत ५०० टॅक्सी बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार
मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश; पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; काय सुरू काय बंद? जाणून घ्या
“दोघांनी छेडलं आणि दोघांनी वाचवलं”, मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन तरुणीने घेतली ‘Indian Heroes’ची भेट
तुपात तळलेले लसूण खाल्ल्यास मिळतात आश्चर्यचकित फायदे; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही