‘व्यावहारिक मराठी : गरज, मागणी व पूर्ती’ या विषयावर १९८१ मध्ये झालेल्या चर्चासत्रात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी उद्घाटनपर भाषण केल्याचा उल्लेख ‘नवभारत’ मासिकाच्या ऑगस्ट-सप्टेंबर, १९८१च्या जोड अंकात आहे. याच अंकात हे भाषण प्रकाशित झालेले आहे. पण हे चर्चासत्र कोणी, कुठे, केव्हा योजले होते त्याचा शोध घेऊनही तो लागला नाही.

तर्कतीर्थांनी आपल्या या भाषणात ‘भाषा व राष्ट्रीयत्व’ असे विचारसूत्र मनात ठेवून आपले विचार व्यक्त केले आहेत. राष्ट्रवादाचा उदय अठराव्या शतकात सर्वप्रथम युरोपात झाला. युरोपमध्ये आज जी छोटी-मोठी राष्ट्रे दिसून येतात, ती राष्ट्रभाषेच्या आधारावर स्वतंत्र राष्ट्रे म्हणून उदयास आली. या राष्ट्रांपैकी ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, रशिया, अमेरिका ही एकभाषी राष्ट्रे म्हणून परिचित आहेत. स्वित्झर्लंड व अमेरिकेतील कॅनडा ही बहुभाषी राष्ट्रे आहेत. येथील लोक जर्मन, फ्रेंच, इटली या भाषा कमी-जास्त प्रमाणात बोलू शकतात, त्यामुळे ही राष्ट्रे बहुभाषी असली तरी आपापल्या राष्ट्रांमध्ये राष्ट्रीयत्वाचा भाव जपून व टिकवून आहेत.

भारताचा राष्ट्रवाद युरोपमधील राष्ट्रवादापेक्षा वेगळा आहे. इथला राष्ट्रवाद हा परकीय सत्तेच्या गुलामगिरीविरोधात निर्माण झाला. तिचे लक्ष्य परकीय सत्तेस हुसकून लावायचे होते. त्या महत्त्वाकांक्षेतून भारतात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जी संघरचना इथे निर्माण झाली, ती विविधभाषी राज्यांतून. स्वातंत्र्यानंतर भारतात भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेचे धोरण स्वीकारण्यात आले. भाषावार प्रांतरचनेच्या धोरणातून राज्यांची निर्मिती झाल्याने राज्यांमध्ये भाषिक अस्मिता निर्माण झाल्या, तरी भारतीय संघराज्याचे ‘विविधतेत एकता’ हे आधार तत्त्व बनले. ते युरोपपेक्षा सर्वस्वी वेगळे आहे.

भारतात मराठीसारख्या ज्या विविध प्रांतांच्या राज्यभाषा आहेत, त्यांच्यात एकमेकांशी संपर्क आणि आदानप्रदान कमी आहे. स्वातंत्र्योत्तर काळात यासंदर्भात आपण राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रवाद म्हणून जे कार्य करणे गरजेचे होते, ते न केल्याने ही असंपर्क स्थिती निर्माण झाली. जगात जो राष्ट्रवादाचा विकास झालेला दिसतो, त्याचा आधार भाषिक व्यवहार आणि उपयोजन हेच आहे. तसा विचार येथील शिक्षण पद्धतीद्वारे होणे अपेक्षित होते. भाषिक गरज, मागणी व पूर्तीचे माध्यम शिक्षण आणि व्यवहार आहे. भारतीय संघराज्याची जी घटकराज्ये आहेत, तेथील विद्यापीठांतील बव्हंशी उच्च शिक्षण जे इंग्रजीप्रधान आहे. राज्य व राष्ट्र स्तरावर भाषिक राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली नाही. ‘एक राष्ट्र – एक भाषा’ असा युरोपीय राष्ट्रवाद भारतीय भाषेतून होऊ शकेल तर इथेही राष्ट्रवादी भावनेचे बीजारोपण शक्य आहे.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भाषा आणि राष्ट्रीयत्वाच्या अभिन्न संबंधांची तर्कशुद्ध मांडणी या भाषणात केली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महात्मा गांधी यांनी आपले भाषिक शल्य व्यक्त करीत म्हटले होते की, ‘राष्ट्रभाषा के बिना मेरा राष्ट्र गूँगा (मुका) है।’ स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या प्रवास आणि विकासानंतरही आपण या शल्याची क्षतिपूर्ती करू शकलेलो नाही, उलटपक्षी आपल्या शिक्षणात राष्ट्रीय पातळीवर ‘त्रिभाषा सूत्र’ अंगीकारूनही समाज व शिक्षण इंग्रजीधार्जिणे होत आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारत यामध्ये आर्य भाषा आणि द्राविडी भाषा असे अंतर आहे. ते राजकीय अधिक आहे; परंतु केव्हातरी राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रवाद, राष्ट्रीयत्व यांचा विचार करून देशास एकसूत्रात बांधणारे व राष्ट्रात एक संपर्कभाषा म्हणून हिंदीसारख्या बहुसंख्य भारतीय जाणणाऱ्या भाषेसंबंधी राष्ट्रीय धोरण स्वीकारून देश एकात्म भाषिक व्यवहार व आदानप्रदानाचा बनणे अनिवार्य आहे. त्यासाठी देशात राज्यापेक्षा राष्ट्र श्रेष्ठ असा भाव विकसित होणे जरुरीचे आहे. देशातील २२ भाषांना जोडणारी एक भाषा निर्माण करणे, विकास करणे आवश्यक आहे.
drsklawate@gmail.com