महाराष्ट्र हे १ मे १९६० रोजी मराठी भाषेचे स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले. तेव्हा ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’, ‘मनोहर’ ही मासिके महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे अभिन्न अंग होती. ही मासिके स्त्री-पुरुष आणि युवावर्गाची सांस्कृतिक भूक संस्कारित करीत होती. पैकी ‘किर्लोस्कर’ मासिकाचे विनाखंड ५०० महिने ५०० अंक प्रकाशनाचा योग ऑगस्ट १९६१ मध्ये जुळून आला. आपल्या पाचशेव्या अंकात या मासिकाने एक परिसंवाद योजला होता. त्याचा विषय होता ‘भारताचे ऐक्य धोक्यात आहे का?’ प्रस्तुत परिसंवादात सर्वश्री डॉ. पु. ग. सहस्राबुद्धे, प्रा. दि. के. बेडेकर, पत्रकार व संपादक अनंत गोपाळ शेवडे यांच्या बरोबरीने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपले विचार या मतसंग्रहात व्यक्त केले होते. त्याचे मनस्वी नि मार्मिक शीर्षक होते, ‘प्रक्षोभक वेदनांचा युगान्त.’

यात तर्कतीर्थांनी आपले मत व्यक्त करत म्हटले होते की, स्वातंत्र्यपूर्व काळात आपणापुढील आव्हान पारतंत्र्याचे होते. आता राष्ट्रबांधणीचे आव्हान आपल्यासमोर आहे. सद्या:स्थिती ही विलक्षण गुंतागुंतीची आहे. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक असे विविध धोके आहेत. इथे भाषाभिन्नता आहे नि प्रत्येक भाषेस आपला अभिमान आहे. राष्ट्रभाषेचा एकात्म विचार दुर्दैवाने इथे रुजला नाही. उत्तर विरुद्ध दक्षिण अशी भाषिक स्थिती आहे. धार्मिक वैविध्यात अहंकार आहे. सामंजस्य व सहिष्णुतेचा अभाव आहे. जातगत भेदांनी विषमता ठेवली आहे, असे असले तरी भारतीय संघराज्य एक व अभिन्न आहे. इथल्या इतिहास आणि भूगोलामुळे देशात हितसंबंधांची एकी (ऑरगॅनिक रिलेशनशिप) आहे; पण आता विध्वंसक शक्ती डोके वर काढत आहे. भारताचे ऐक्य पंचप्राणाप्रमाणे अबाधित राहायला हवे. आज राष्ट्रीय मन गोंधळलेले (अॅम्बिव्हेलन्ट) दिसते. आर्थिक नियोजनात असमतोल वाढत आहे. जागतिक युद्धाचे ढग जमलेले आहेत; पण आपले शिक्षण व संस्कार, संस्कृती एक आहे. ती धर्मातीत (सेक्युलर) आहे. तिच्यापुढे भाषा, पंथ, जात, धर्म, भेद गळून पडतील व भारत विपरीत स्थितीतही एकसंध राहील, असा आशावाद तर्कतीर्थांनी या मतसंग्रहात व्यक्त केला आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रीय ऐक्य साधण्याचे नवे आव्हान आपणापुढे ठाकले आहे, त्यामुळे भय व निराशेचे ढग दाटून येणे स्वाभाविक आहे. भारतीय लोकराज्याला अराजकाचा धोका भेडसावतो आहे. नियोजने आर्थिक कात्रीत सापडल्यासारखी स्थिती आहे. आपला राष्ट्रीयतेचा पाया युरोपीय राष्ट्रांपेक्षा भिन्न आहे. तेथील राष्ट्रे एकभाषिक अधिक आहेत. आपल्या राष्ट्रात राज्यनिहाय भाषाभिन्नता आहे. इथे भिन्न जाती-धर्मांचे विशाल मनुष्य समाज आहेत. भेद भिन्नतेतून अभिन्नता, अखंडता, एकात्मता साधण्याचे कठीण आव्हान आपणासमोर आहे.

राष्ट्रभेदावर रचलेले राजकीय भेद हेसुद्धा आधुनिक काळातील यांत्रिक वेगाने निर्माण होणाऱ्या एकसंध मानवी संबंधांशी विसंगत ठरत आहेत. या नव्या जगातील वैज्ञानिक व तांत्रिक शक्ती राजकीय व राष्ट्रीय भेदांना जरठ रूढीचे मृत अवशेष म्हणून धिक्कारण्यास लवकरच उद्याुक्त होतील, असा अंदाज भारतातील राजकीय द्रष्टे व्यक्त करत आहेत. म्हणून विज्ञान व तंत्र यांवर आधारलेल्या आर्थिक शक्तीमधील ऐक्यसाधक सामर्थ्य दिसते, त्यापेक्षा कितीतरी पटीने विशाल आहे, हे ध्यानात घेणे जरुरीचे आहे. जागतिक युद्ध जर दहा-वीस वर्षे लांबले, तर मानवी ऐक्याचा विशाल मेरू जागतिक राज्याच्या रूपाने अवतरेल, असेही भविष्य जर एखाद्या भविष्यवाद्याने सांगितले, तर त्यात फारसे गैर आहे असे म्हणता येणार नाही.

नवभारतात साकार होत असलेली दुसरी महत्त्वाची ऐक्यसाधक घटना म्हणजे समान शैक्षणिक मूल्ये व शिक्षणातील समान आशय होय. आधुनिक शिक्षणातील विद्या या जागतिक विद्या आहेत. त्या विद्या धर्मातीत (सेक्युलर) व विश्वैक्य सांधणाऱ्या आहेत. हे शिक्षण सर्वसामान्य जनतेच्या घरादारात वावरू लागले म्हणजे प्रांतिक, भाषिक, जातीय व धार्मिक भेदांचे अभिमान आपोआप गळून पडतील! हे लक्षात घेऊन राष्ट्र उभारणीचे प्रयत्न खरे तर राष्ट्रवास्तव लक्षात घेऊन व्हायला हवेत.
drsklawate@gmail.com