माधवी देसाई यांच्या निधनाची दखल मराठीमध्ये घेतली जाईल, घ्यायलाच हवी. त्या केवळ चित्रपट दिग्दर्शक भालचंद्र पेंढारकर यांच्या कन्या आणि प्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई यांच्या पत्नी होत्या म्हणून नव्हे, तर त्या मराठीतील लक्षणीय कथा-कादंबरीकार होत्या. देसाई यांच्याबरोबर १५ वर्षांचा संसार करून तो मोडला. त्यानंतर त्यांनी ‘नाच ग घुमा’ हे आत्मचरित्र लिहिलं. मराठीमध्ये आजवर लेखकांच्या पत्नीने लिहिलेल्या आत्मचरित्रांमध्ये सर्वश्रेष्ठत्वाचा दर्जा निर्विवादपणे ‘स्मृतिचित्रे’ला दिला जातो, तर सर्वाधिक खळबळजनक आत्मचरित्राचा मान ‘नाच ग घुमा’कडे येतो. ९०च्या दशकात या आत्मचरित्रानं मराठी साहित्यात मोठाच हलकल्लोळ माजवला होता. या आत्मचरित्रानं रणजित देसाई यांच्या जनमानसातील प्रतिमेला तडे गेले तसेच माधवीताईंना लेखिका म्हणूनही प्रस्थापित केलं. ‘नाच ग घुमा’ हे फिक्शन पद्धतीने लिहिलेलं, फ्लॅशबॅक तंत्राचा वापर असलेलं कादंबरीनिष्ठ आत्मचरित्र आहे. हे पुस्तक छापताना आणि लिहिताना बरेच धमक्यांचे फोनही आल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. ते खरं असेल तर त्याबाबतीतही हे आत्मचरित्र वेगळं ठरतं. तसं पाहिलं तर मराठीत नामवंत लेखकांच्या पत्नींनी लिहिलेल्या आत्मचरित्रांची संख्या तशी फार मोठी नसली तरी ती फार लहानही नाही. माधवीताईंना ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ (रमाबाई रानडे), ‘स्मृतिचित्रे’ (लक्ष्मीबाई टिळक), ‘आमची अकरा वर्षे’ (लीलाताई पटवर्धन), ‘मीच हे सांगितलं पाहिजे’ (शीलवती केतकर), ‘बालकवी आणि मी’ (पार्वतीबाई ठोंबरे) या आधीच्या आत्मचरित्रांपासून प्रेरणा मिळाली असावी. स्त्रीचं लेखन ही स्वत:वरच लादलेली सेन्सॉरशिप असते, या समजाला फाटा देत त्यांनी आपल्या जनमानसात सुप्रसिद्ध असलेल्या पतीच्या वर्तनाविषयी ‘ब्र’ उच्चारण्याचे धाडस केले. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणाची मोठय़ा प्रमाणावर दखल घेतली गेली. माधवीताईंनी कथा, कादंबरी आणि ललितलेखनही केलं. सुगम, सुघड आणि वाचनीय कथा त्यांनी लिहिल्या. स्त्री भावभावनांचं तरल चित्रण त्यांच्या कथांमधून होतं. त्यांची कथा जुन्या पद्धतीची म्हणजे गाठ-निरगाठ उलगडणारी आहे. मीरा तारळेकर, पारू नाईक आणि यशोधरा भोसले या त्यांच्या तिन्ही मुलीही लेखिका आहेत. म्हणजे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने लेखनाच्या प्रांतात मुशाफिरी केली आहे. माधवीताईंना मर्यादित अर्थाने सामाजिक कार्यकर्त्यां हे बिरुद लावता येईल. गोव्याच्या सामाजिक जीवनात त्यांचा थोडाफार सहभाग होता. सीमावर्ती भागातल्या साहित्य चळवळीसाठीही त्यांनी बरेच प्रयत्न केले. माधवीताईंच्या कथा-कादंबऱ्या आणखी पाचपन्नास वर्षांनी वाचल्या जातीलच याची खात्री नाही, त्यांच्या ‘नाच ग घुमा’ची दखल मात्र तेव्हाही घेतली जाईलच. कारण अभिजात पुस्तकांपेक्षा खळबळजनक पुस्तकांना अधिक वाचनीयता असते.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jul 2013 रोजी प्रकाशित
खळबळजनक आणि लक्षणीय
माधवी देसाई यांच्या निधनाची दखल मराठीमध्ये घेतली जाईल, घ्यायलाच हवी. त्या केवळ चित्रपट दिग्दर्शक भालचंद्र पेंढारकर यांच्या कन्या आणि प्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई यांच्या पत्नी होत्या म्हणून नव्हे, तर त्या मराठीतील लक्षणीय कथा-कादंबरीकार होत्या. देसाई यांच्याबरोबर १५ वर्षांचा संसार करून तो मोडला. त्यानंतर त्यांनी ‘नाच ग घुमा’ हे आत्मचरित्र लिहिलं.

First published on: 16-07-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exciting and significant