सृष्टी-दृष्टी : उत्क्रांतीची सूत्रे

जीवसृष्टीचा इतिहास फार पुरातन म्हणजे कोटी वर्षांचा आहे. एवढय़ा मोठय़ा कालखंडात असंख्य वाटावे इतके जीवप्रकार घडत राहिले.

सृष्टी-दृष्टी : उत्क्रांतीची सूत्रे

जीवसृष्टीत वैविध्याची उपज का होते, याची डार्विनने शोधलेली सूत्रमय उत्तरे आजही लागू आहेत..

प्रदीप रावत

जीवसृष्टीचा इतिहास फार पुरातन म्हणजे कोटी वर्षांचा आहे. एवढय़ा मोठय़ा कालखंडात असंख्य वाटावे इतके जीवप्रकार घडत राहिले. त्यामध्ये एवढे अगडबंब वैविध्य कसे आले? कुठून उपजले? जे उपजले त्यातले काही नष्ट पावले तर काही तगले (आणि अजून तगून आहेत!) एका प्रकारच्या जीवामधून दुसरा जीव उपजतो. त्या दोहोंमधले साम्य कधी लक्षणीय असते तर काहींमध्ये बिलकूल साम्य नसल्यागत असे वेगळेपण असते. काही स्थित्यंतराचा वेग अगदी धाप लागल्यागत धिमा असतो तर काहींचा बदल होण्याचा झपाटा अवघ्या थोडय़ा दिवसांचा! काहींचा रहिवास ठरावीक भूभागातला तर काहींचा सर्वत्र म्हणावा इतका व्यापक! जीवसृष्टीच्या वैविध्यतेची ही महाकाय पर्वतराजी कशी साकारत आली? वैविध्याची उपज का होते? केव्हा आणि किती वेगाने होते? असे बदल घडण्यासाठी निसर्गरचनेत कोणते दबाव असतात? या दबावांचे स्वरूप काय? त्यांची ताकद किती? अशांसारख्या प्रश्नांची उत्तरे वर्णनपर आणि वर्गीकरणाच्या व्यवस्थेत आपसूक मिळत नाहीत.

डार्विनने या समस्यांचा विचार आपले मुख्य लक्ष्य बनविले. त्याच्या काळामध्ये हाती असलेल्या वर्णनपर इतिहासाचा व तथ्यांचा डोंगर हाताळताना काही सूत्रांचा त्याला सुगावा लागला. त्याचे पहिले महत्त्वाचे निरीक्षण सूत्र असे : आताच्या म्हणजे वर्तमान जाती भूतकाळातील जीवसृष्टीचे घटक होते असे मानणे योग्य नाही. ते भूतकाळाचे घटक नव्हेत तर भूतकाळात असणाऱ्या जीव प्रकारांचे ते वंशज आहेत. त्यांचे पूर्वज बऱ्याचदा पार समूळ अस्तंगत झालेले असतील. उदा. वानरसदृश प्राण्यापासून मानवजात उत्क्रांत झाली. पण ज्या वानर जातीपासून मनुष्य उत्क्रांत होत घडला तो आपला पूर्वज वानर वर्तमान वानरजातींपेक्षा (उदा. चिंपांझी, बोनोबो, गोरिला) भिन्न होता.

दुसरे सूत्र : जीवप्रकार उत्क्रांत होत असले तरी त्यांच्या उत्क्रांतीचा वेग समान नसतो. जीवप्रकार किती जलदपणे आणि केव्हा उत्क्रांत होतील याचे एक समान ठरावीक गणित असत नाही. काही चिवट स्थितीवादी असतात. उदा. घोडय़ाच्या नालेगत दिसणारा हॉर्सशू खेकडा, जिंगो जातीचा वृक्ष. देवमासा वा मनुष्य (त्यामानाने) जलदगतीने उत्क्रांत झाला. पण क्योला कान्थ नावाचा हिंदी महासागरात आढळणारा अतिप्राचीन मासा बघा-  त्यात काहीच उलथापालथ झालेली नाही. अशा जीवांना ‘सजीव जीवाश्म’ म्हणतात. परंतु सरासरीनेच बोलायचे तर उत्क्रांतीची प्रक्रिया आत्यंतिक धिमी आणि मंद असते. काही सूक्ष्म जीव मोठय़ा झपाटय़ाने पालटत जातात. उदा. अनेक जिवाणू आणि विषाणू. त्यातले काही जीवघेणे रोगकारी असतात. म्हणून आपण त्यांना आळा घालणारी प्रतिबंधके शोधतो. आणि ते उत्क्रांत होऊन त्यावरदेखील मात करतात. सूक्ष्म जिवाणू आणि विषाणूमधली ही उत्क्रांती माणसाला आपल्या जीवनकाळात सूक्ष्मदर्शक यंत्राखाली अनेकदा प्रत्यक्ष अनुभवाला येते! खरे तर हा डोळय़ादेखत पाहता यावा असा उत्क्रांतीचा प्रत्ययकारी पुरावा आहे.

तिसरे सूत्र : जीवप्रकारांनी उत्क्रांत व्हायला उद्युक्त व्हावे, बदलाच्या भरीस पडावे असे अनेक दबाव निसर्गत: असतात. अशा दबावाला तोंड देताना जीव बदलत्या स्थितीशी- परिसराशी जुळवून घेण्याचा आटोकाट सायास करतात. जे सायास यशस्वी आणि पुढच्या पिढीस बहाल करण्याजोगते अंगभूत होतात ते तगणारे! उरलेले नष्ट पावतात. नव्या स्थितीशी अनुकूलन साधले गेले की उत्क्रांती होण्याची निकड/ वेग मंदावतो.

चौथे सूत्र : नवीन आणि भिन्न जीवजातींचा उद्भव आणि समान पूर्वज या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. वरपांगी भिन्न वाटणाऱ्या जाती प्रकारांचा पूर्वज समान असणे अधिक स्वाभाविक आहे. पण समान पूर्वजांमधून झाडाला फांद्या फुटाव्यात तशा जीवप्रकारांचा उद्भव होत जातो. त्यांच्या परस्परांमध्ये गुणात्मक अंतर का पडते? एकाच वृक्षाच्या फांद्या आपसात प्रजनन करू शकत नाहीत. हे फांद्यांचे जैविक दुरावणे कशामुळे उद्भवते? एकीकडे काही कळीच्या लक्षणांमध्ये किंवा वैशिष्टय़ांमध्ये साम्य पण इतर अनेक कळीच्या वैशिष्टय़ांबद्दल पूर्ण फारकत असे या फांद्या- उपफांद्यांचे विलगणे ही विशेष समस्या होती. एकाच वृक्षाला त्याच प्रकारचे फलन देणाऱ्या फांद्या असणे स्वाभाविक; पण त्याच मुळाबुंध्यांवर निरनिराळय़ा- विलगलेल्या प्रजातींच्या-  फांद्या हा खरा आश्चर्यकारी प्रश्न होता. हे विलगणे म्हणजे जीववृक्षाला फुटणारे प्रजाती प्रकारांचे धुमारे! ओरिजिन ऑफ स्पेसीज ( स्पीशीज) या त्याच्या ग्रंथाच्या शीर्षकात मध्येच ‘स्पेसीज’ ऊर्फ ‘प्रजाती प्रकार’ असा ठळक उल्लेख आहे.

जीववृक्षावर असे प्रजातींचे विलगीकरण कसे दिसते याचे दोन छोटे चित्ररूप नमुने पाहा. चित्र क्र. १ मध्ये X आणि    Y या अक्षरांनी दोन बिंदू दर्शविले आहेत. हे बिंदू मूळ प्रजाती दर्शक आहेत. X या बिंदूपाशी एक शाखा उपजते. तिचे पुढे दोन फाटे होतात. त्यातला एक फाटा पुढे वाढत फुटतो आणि त्याला दोन फाटे उपजतात. हे दोन उपफाटे पाली अणि सर्प या दोन जातींची शाखा दर्शवितात. आणखी एक फाटा X पाशी उपजतो. तो पुढे सरसरत जाताना त्याला आणखी फाटे फुटतात. या आणखी फाटे फुटण्याआधी कुणी एक समान पूर्वज आहे पण तोदेखील   X प्रमाणे हयात नाही आणि ज्ञात नाही. पण त्याला फुटलेल्या धुमाऱ्यांनी सॉरोपोडस्थेरोपोडस् सारखे मांसभक्षी ‘डायनोसुरी’ भासणारे प्राणी आणि त्याच वेळी एमू, शहामृग यांसारखे पक्षी आणि दुसऱ्या फुटव्यावर किलबिलणारे पक्षी आढळतात.

आकृती २ मध्ये या शाखा आणि फुटव्यांच्या उपजण्यामध्ये समान गुणांचा उगम आणि आढळ कसा प्रकटत जातो याचे नमुनाचित्र आहे. या चित्रांमधले ठळक ठिपके त्या-त्या धुमाऱ्यावर प्रकटलेल्या वैशिष्टय़ांची वर्णने आहेत. हा वृक्ष विशिष्ट समान गुणांच्या जोडसांध्यांवर रेखलेला आहे. त्याचबरोबरीने या गुणांचा आढळ असणाऱ्या जातींचा अधिक एकवट समूह वरच्या बाजूस संकलित चौकटीत दर्शविला आहे. हे चित्र पृष्ठवंशी म्हणजे कणा असणाऱ्या जीवांच्या शाखेचे आहे. इतर सर्व जीवजातींप्रमाणे पृष्ठवंशी प्राण्यांची वर्गवारी श्रेणीबद्ध म्हणजे उतरंड रचल्यागत यात आढळेल. उतरंडीच्या वरच्या थरातील प्राणी एकत्र येतात ते केवळ थोडय़ा समान गुणधर्मामुळे! अधिक गुणवार तपशील पाहावे तर त्यांच्यातील सारखेपणाला उतरती कळा येते. याउलट उतरंडीच्या खालच्या थरात असणाऱ्या गटांमध्ये साधम्र्याचे गुण अधिक म्हणून त्याची एकवट त्या थरापर्यंत करता येते. उत्क्रांतीच्या नजरेने पाहिले तर मासे, उभयचर, सस्तन प्राणी, सरपटे प्राणी या सगळय़ांमध्ये पाठीचा कणा हा समान गुणधर्म आहे. या पृष्ठवंशी प्राण्यांचे दोन गट करता येतात. सरपटे व सस्तन यांचा एक गट का? तर त्यांच्या अंडय़ांमध्ये अंडय़ामधल्या भ्रूणाभोवती वेष्टनवजा विशेष द्रवाने भरलेले पटल असते. अशा भ्रूणपटलधारींना इंग्रजीत अ‍ॅम्निओटस म्हणतात. त्यांचा एक समान पूर्वज तुलनेने अलीकडच्या काळात होऊन गेला. म्हणून चित्रामधील वरच्या बाजूचे वर्गीकरण पृष्ठवंशी त्याचा खालचा थर अ‍ॅम्निओटस ऊर्फ भ्रूणपटली, त्याच्याखाली भ्रूणपटलाचे दोन प्रकार – सरपटे आणि सस्तन- असे दर्शविले आहे. अशा रीतीने समान गुण व भेद किंवा साधर्म्य आणि वैधर्म्य यांच्यावर आधारलेली जीववृक्षांची फांदी रेखाटता येते.

सजीवांची अशी गुणधर्मकारी उतरंड अणि वर्गीकरण घडणे फक्त सजीवांतच होऊ शकते. वर्गीकरण कोणत्याही वस्तुविश्वाचे करता येते. उदाहरणार्थ पोस्टाची तिकिटे गोळा करण्याचा छंद असलेली माणसे एकत्र आली आणि त्यांचा अवघा संग्रह घेऊन वर्गीकरण करायचे ठरवले तर?  मूल्यानुसार, तिकिटांच्या आकारानुसार किंवा विषयांनुसार स्वेच्छेने लहरीनुसार ठरवावे तसे व्यक्तिनिष्ठपणे वर्गीकरण होईल, स्वाभाविक वस्तुनिष्ठपणे नव्हे! त्याहून महत्त्वाचे म्हणजे तिकिटे उत्क्रांत होत नाहीत.. त्यांचे वैशिष्टय़ स्वतंत्रपणे शून्यातून आखणाऱ्याच्या लहरीनुसार उपजते! तिकिटांपेक्षा लाखपटीने विविधतेने नटलेली जीवसृष्टी कुणाच्या पूर्वकल्पनेवर (‘डिझाईन’वर) घडली नाही. त्याची उपज अनेक भौतिक गुण व अजाणता घडत आलेला भौतिक जीवनक्रम उलगडत होता होता झाली. त्याला ना कोणती पूर्वकल्पना वा संकल्पी आराखडा होता ना तसा आराखडा बेतणारा कुणी ‘कर्ता’!

pradiprawat55@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अन्वयार्थ : चर्चा होते, पण तात्कालिक..
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी