जगनिरक्षर भोळ्याभाबडय़ा भारतीय चित्रनादिष्टांच्या भावुकतेची परिसीमा गाठणारा ‘शोले’ याकरीवेस्टर्नपटाचा कल्पनांशही बनला नव्हता. ‘गब्बर’ नावाचा नवखलनायकी अवतारही आकारला नव्हता. चित्रपटाची पारायणे करून त्यातील मोठय़ा भूमिकांइतक्याच लहानसहान वाक्यांना ‘अजरामर’सदृश विशेषणांनी कोंबण्याचा प्रघातही ‘शोले’इतका कुठल्या भारतीय चित्रपटाबाबत घडला नव्हता. त्याच काळात क्लींट ईस्टवूडच्या अमेरिकी वेस्टर्नपटांचा बोलबाला मात्र दशदिशांमध्ये घुमत होता. ‘शोले’च्या निर्मितीत प्रभाव टाकणाऱ्या शेकडो घटकांमध्ये ‘मॅग्निफिसण्ट सेव्हन’, ‘गुड, बॅड, अग्ली’ या वेस्टर्नपटांचा जितका वाटा आहे, तितकाचा गब्बर या दहशती खलरेखेच्या आखणीमध्ये इलाय वॉलॉख या खलोत्तमाचा मोठा आदर्श आहे.
वेस्टर्नपट त्यांतील अनिवांत हाणामाऱ्या, कुरघोडय़ा, लूटमारी, नायकाद्वारे अन्यायनिर्मूलन या ओळखीच्याच घटकांनी बनले. तरी त्यांचे एक वैशिष्टय़ कायम राहिले, ते म्हणजे नायकापेक्षा मणभर ताकद असलेला खलनायक. ज्याला थोपविण्यासाठी नायकसदृश ‘मॅग्निफिसण्ट’ सात जण उभे राहावे लागतात, अशा खलोत्तमाचे करारी दर्शन इलाय वॉलॉख यांनी एकटय़ा त्याच चित्रपटात दिले नाही, तर हाती आलेल्या सर्व खल भूमिकांना त्यांनी अविस्मृत बनवले. शिक्षकी पेशा स्वीकारण्याची तयारी केलेल्या वॉलॉख यांची अभिनय क्षेत्राशी ओळख झाली. पत्नीसमवेत त्यांनी अनेक भूमिका गाजविल्या. या लोकप्रियतेच्या बळावर त्यांची हॉलीवूड स्टुडिओमध्ये वर्णी लागली आणि काही वर्षांतच त्यांच्या खल भूमिका मोठय़ा व छोटय़ा पडद्यावर सारख्याच गाजत राहिल्या. ‘बॅटमॅन’ या मालिकेतील त्यांनी साकारलेल्या ‘मिस्टर फ्रिज’ या व्यक्तिरेखेच्या जवळपासही कुणी नंतर आलेल्या ढीगभर बॅटमॅनमधून जाऊ शकला नाही. साक्षात अरनॉल्ड श्वात्र्झनेगर या बलपुरुषानेही ‘बॅटमॅन अॅण्ड रॉबिन’मध्ये मिस्टर फ्रिज व्यक्तिरेखेचे भजे केले. मेरेलिन मन्रो ते हॉलीवूडच्या सर्वच दिग्गज आणि तल्लख कलावंतांसोबत सहा दशके अव्याहत आपल्या खलपुरुषी अभिनयांचे वैविध्य दाखविणाऱ्या कलावंताचा ऑस्करने अभिनयहयातीत सन्मान केला नाही. मात्र या प्रमादाला दूर करण्यासाठी २०१० साली त्यांना विशेष जीवनगौरव दिले. चित्रनादिष्टांच्या मनात १९६०चे दशक गाजविणाऱ्या देमार नायकांना महत्त्व होते. तसेच त्यांना त्यांचे नायकत्व मिरविण्यासाठी जबाबदार ठरणाऱ्या इलाय वॉलॉख यांच्या खलचेहऱ्याचेही मणभर अधिक महत्त्व होते. नुकत्याच झालेल्या त्यांच्या निधनामुळे लौकिकार्थाने या आद्य खलपुरुषाचा अंत झाला असला, तरी त्यांच्या ‘श्ॉमेलिऑनी’ भूमिका ‘अजरामर’सदृश विशेषणांना खरोखरच पात्र ठरणाऱ्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2014 रोजी प्रकाशित
इलाय वॉलॉख
जगनिरक्षर भोळ्याभाबडय़ा भारतीय चित्रनादिष्टांच्या भावुकतेची परिसीमा गाठणारा ‘शोले’ याकरीवेस्टर्नपटाचा कल्पनांशही बनला नव्हता.
First published on: 27-06-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ilia volok or ilia volokh