९४. उचित

प्रारब्धानुसार माझ्या वाटय़ाला अनुचित र्कम आलं असलं तरी ते टाळण्याचंही स्वातंत्र्य मला आहे. त्यासाठी मुळात अनुचित र्कम कोणतं, हे कळलं मात्र पाहिजे.

प्रारब्धानुसार माझ्या वाटय़ाला अनुचित र्कम आलं असलं तरी ते टाळण्याचंही स्वातंत्र्य मला आहे. त्यासाठी मुळात अनुचित र्कम कोणतं, हे कळलं मात्र पाहिजे. आता असं स्वातंत्र्य कसं असेल आणि ते र्कम टाळलं तर प्रारब्ध टळेल का, असा प्रश्न काहीजणांच्या मनात उत्पन्न होईल. हा विषय अत्यंत नाजूक आहे आणि त्यातून कोणताही गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. माझ्या आयुष्यात कुणी माझ्याशी वाईट वागतो आणि आपलं तत्त्वज्ञान सांगतं की गेल्या जन्मांमध्ये मीदेखील त्याच्याशी वाईट वागलो होतो, म्हणूनच तो हिशेब चुकता केला जात आहे. तर मग मी दुसऱ्याशी वाईट वागलो तर तेही प्रारब्धानुसार हिशेब चुकता करणं कशावरून नसेल? तर इथे सद्बुद्धीचा संबंध येतो. प्रारब्धाची चौकट तर आहेच पण सद्बुद्धीची देणगीही माणसाला त्याबरोबरच मिळाली आहे. मग त्या सद्बुद्धीच्या जोरावर उचित काय, अनुचित काय, हे मला कळू शकतं. मग मी केवळ मला अधिकार आहे, अनुकूलता आहे, सत्तेची साथ आहे, पैसा आहे म्हणून दुसऱ्याशी वाईट वागणं योग्य आहे का, दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण करणं योग्य आहे का, दुसऱ्याच्या अडचणीचा गैरफायदा घेणं योग्य आहे का, याचा निर्णय मला करता येऊ शकतो. सद््गुरूंच्या आधारावरच ते साध्य होतं. साईचरित्रातला एक प्रसंग आठवतो. एकदा साईबाबा रस्त्यानं जात असताना एका सापानं बेडकाला तोंडात पकडलं होतं आणि तो बेडूक जिवाच्या आकांतानं ओरडत होता. बाबा तात्काळ पुढे गेले आणि दोघांना सोडवत ओरडले, ‘‘आता तरी वैर थांबवा.’’ बाबा ओरडताच हे दोघे प्राणी वेगवेगळ्या वाटेनं पसार झाले. एका भक्ताला फार आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, ‘‘बाबा सापानं बेडकाला खाणं तर अगदी नैसर्गिक आहे. कायमचं आहे. त्यामुळे दोघांचं वैर तर ठरलेलंच. मग त्यांना सोडवण्याचा हेतू काय?’’ म्हणजेच बाबा जगभरातल्या बेडकांना सापांपासून वाचविणार की काय, असा प्रश्नही त्याला पडला असावा. बाबा हसून म्हणाले की, ‘‘गेल्या जन्मी हे मनुष्ययोनीत होते. दोघांचं अत्यंत वैर होतं. दोघांची एकमेकांशी प्राणांतिक हाणामारी झाली. मरता मरता, तुला पाहून घेईन, असं दोघं एकमेकांना म्हणाले. आता म्हणूनच त्यांना हा जन्म मिळाला आहे. पण ही वैराची साखळी अशी अनेक जन्म चालूच राहील. म्हणून मी त्यांना सोडवलं.’’ तेव्हा वरकरणी साप आणि बेडकाचं वैर ‘उचित’ भासलं तरी ते खरं उचित आहे की अनुचित हे केवळ सद्गुरूच जाणतात. त्यांच्या बोधाचा आधार घेऊन मी वागू लागलो तरच अनुचित कर्मासाठीची अनुकूलता असूनही मी तसं वागणार नाही. त्यामुळे मूळचं प्रारब्ध संपेलच उलट आध्यात्मिकदृष्टय़ाही गती लाभेल. आता जोवर सद्गुरूतत्त्वाचा परिचय नाही, सद्गुरूंचा बोध, त्यांचा सहवास लाभलेला नाही, तेव्हा काय करावं? अशा माणसानंही सद्बुद्धीचाच आवाज ऐकला पाहिजे. त्यासाठी ‘मी’चा गोंगाट थोडा कमी झाला पाहिजे.असा गोंगाट थोडा कमी झाला तरी चांगलं काय, वाईट काय, हे प्रत्येकालाच समजतं. मग जे चांगलं आहे ते आचरणात आणण्याचा अभ्यास सुरू केला पाहिजे.

मराठीतील सर्व संपादकीय ( Sampadkiya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sawroop chintan 94 appropriate

Next Story
प्रादेशिक पक्षांना मज्जावच योग्य
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी