मॉरिशस हा बहुवांशिक समाज असलेला देश आहे. भारतीय, आफ्रिकन, फ्रेंच व चिनी वंशाचे लोक तिथे राहतात. स्थलांतरितांचे प्रश्नही तिथे मोठे आहेत. आता या देशाचे पंतप्रधान म्हणून सर अनिरुद्ध जगन्नाथ यांची पुन्हा नियुक्ती झाली आहे.
वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी पुन्हा देशाची धुरा सांभाळली आहे. खरे तर ते माजी पंतप्रधान व अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांचा मॉरिशसच्या राजकारणातील अनुभव फार मोठा आहे. अध्यक्ष कैलाश पुरयाग यांनी त्यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. त्यांच्या राजकीय आघाडीने आताच्या संसदीय निवडणुकीत ६२ पैकी ४७ जागा पटकावल्या आहेत. मजूर पक्ष व मॉरिशियन मिलिटंट मूव्हमेंट या माजी पंतप्रधान पॉल बेरेंगर यांच्या आघाडीला केवळ १३ जागा मिळवता आल्या. अध्यक्षीय अधिकारांमध्ये वाढ व घटनात्मक सुधारणा हे मुद्दे निवडणुकीत केंद्रस्थानी होते. जगन्नाथ यांनी आताचे पराभूत पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांच्या जागी सूत्रे हाती घेतली आहेत. विशेष म्हणजे गेली २३ वर्षे रामगुलाम जेथून निवडून येत होते तेथे ते पराभूत झाले. मॉरिशसने आतापर्यंत चार पंतप्रधान बघितले आहेत. त्यात बहुतेक वेळा जगन्नाथ व रामगुलाम यांच्याकडेच हे पद राहिले. १९८२ पासून फक्त २००३ ते २००५ या काळात बेरेंगर हे पंतप्रधान होते. जगन्नाथ हे १९८२ ते १९९५ तसेच २००० ते २००३ या काळात पंतप्रधान होते. २००३ ते २०१२ या काळात अध्यक्षही होते. सर्वच देशात आर्थिक प्रश्नांवर निवडणुका केंद्रित होत असताना त्यांनी सत्तेवर येताच देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याचे आश्वासन दिले आहे.
१९६८ मध्ये मॉरिशसला ब्रिटिशांच्या जोखडाखालून मुक्तता मिळाली. त्यानंतर या देशाने बरीच प्रगती केली असली, तरी अजून बरेच काही बाकी आहेत. मॉरिशस हा आफ्रिकेतील एक श्रीमंत देश आहे, तरीही तेथे कापड उद्योग, साखर उद्योग व पर्यटन या प्रमुख व्यवसायांचे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यास जगन्नाथ यांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. चार निवडणुका लागोपाठ जिंकल्याने त्यांना तेथील राजकारणात रॅम्बो या नावाने ओळखले जाते. रामगुलाम यांच्या मंत्रिमंडळात १९६५ मध्ये ते मंत्री होते पण नंतर त्यांनी मिलिटंट सोशालिस्ट मूव्हमेंट पार्टी हा राजकीय पक्ष १९८३ मध्ये काढला. त्यांनी आर्थिक क्षेत्रात १९८० च्या सुमारास चमत्कार घडवला. शुल्क मुक्त विभाग सुरू केले, वस्त्रोद्योगात मॉरिशसला पुढे नेले. त्यांनी भारताशी संबंध वाढवण्याचा नेहमीच प्रयत्न केला.
कुणाचाही मुलाहिजा न बाळगता सडेतोडपणे काम करणारे समर्पित पंतप्रधान अशीच त्यांची प्रतिमा आहे. राणी एलिझाबेथ यांच्या नेतृत्वाखाली काम केलेल्या दोन पंतप्रधानांपैकी ते एक आहेत. ‘द राइज ऑफ कॉमन मॅन’ हे त्यांचे जीवनचरित्र प्रसिद्ध आहे.