भोगतन्मय असतानाच देवासाठी भावतन्मय होऊ पाहणाऱ्या आपल्याला ही ओवी सांगते, देहाची आसक्ती सोड, कामना सोड आणि मग प्रसंगपरत्वे वाटय़ाला आलेल्या सर्व भोगांचा उपभोग घे! आता हे मोठं लचांडच वाटतं! देहाची आसक्ती आणि इच्छा सोडणं काय सोपी गोष्ट आहे? त्यातच अवघा जन्म सरेल. बरं, ते झालं की मग प्रसंगपरत्वे सगळे भोग भोगायचे! मग शेवटी जर भोग भोगायचेच आहेत तर ते आत्ताच का भोगू नये, असा प्रश्न धूर्त मनात येईल. तेव्हा ही ओवी सांगते, बाबा रे, भोग तर तू आत्ता घेतच आहेस. भोग भोगायची सवय जन्मजात आहेच. भोग भोगण्याच्या सवयीत, आसक्तीत तू इतका दंग आहेस की त्यापलीकडे जाऊन तू विचारही करीत नाहीस. हा देह आणि तुझ्यातल्या सूक्ष्म क्षमता या भोगपूर्तीपुरत्या नाहीत.  त्या देहाकडे आणि तुला लाभलेल्या क्षमतांकडे थोडं अधिक सजगतेनं लक्ष दे! काय सूक्ष्म क्षमता आहेत हो आपल्यात? त्यांचं सूचन कामना या शब्दात आहे. इच्छा ही माणसाची मोठी क्षमता आहे! इच्छा वाईट, इच्छा सोडली पाहिजे, इच्छारहित जीवन हेच खरं उदात्त जीवन, असं आपण ऐकतो. श्रीनिसर्गदत्त महाराजांच्या बोधानुरूप सांगायचं तर ‘इच्छा वाईट नसते, इच्छेचा संकुचितपणा वाईट असतो. तुमच्या इच्छा इतक्या व्यापक करा की त्यांच्या पूर्तीसाठी तुम्हालाही व्यापकच व्हावं लागेल!’ इच्छा हीच शक्ती आहे. आपण म्हणतो ना, इच्छा तिथे मार्ग! तेव्हा इच्छा असली तर तिच्या पूर्तीचा मार्ग आपोआप शोधला जातो, घडवला जातो. पाण्याचा प्रवाह जसा रस्त्यासाठी अडून बसत नाही, तोच आपली वाट तयार करीत वाहू लागतो. त्याचप्रमाणे इच्छेचं बीजच तिच्या पूर्तीचा रस्ता शोधायला आणि तो नसेल तर तयार करायला भाग पाडतं. माणसाच्या मनात उमटणारी प्रत्येक इच्छा ही संकल्पच आहे. जीव हा परमात्म्याचा अंश आहे. परमात्मा हा सत्यसंकल्पवान आहे. अर्थात परमात्म्याचा संकल्प सत्यात उतरतोच. मग त्याचाच अंश असलेल्या जीवाचा संकल्पही सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही. फरक इतकाच की जीवाच्या संकल्पपूर्तीला काळ-वेळ, परिस्थितीची साथ लागते. त्या संकल्पानुरूप काळ-वेळ, परिस्थिती निर्माण होण्याची वाट पहावी लागते. त्यात अनंत जन्मही सरू शकतात, पण संकल्पाचं बीज कधीच नष्ट होत नाही आणि त्या संकल्पाची पूर्ती झाल्याशिवाय राहात नाही. मग जो परमार्थ पथावर आला आहे, ज्याला या खेळातूनच सुटका हवी आहे त्याला इच्छांचे अनंत संकल्प किती बांधून टाकतील? शारदामाता म्हणायच्या, बर्फीचा तुकडा खायची इच्छाही अपूर्ण राहिली तरी तिच्या पूर्तीसाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो! मग आपल्या मनात अशा कित्येक इच्छा क्षणोक्षणी उत्पन्न होत असतील! त्यासाठीच प्रभूंचा आग्रह आहे की, कामनाजात सांडावें! इथे नुसतं कामना म्हटलं नाही तर कामनाजात म्हटलं आहे. या शब्दाला फार खोल अर्थ आहे. कामनाजात म्हणजे सर्व तऱ्हेच्या कामना. केवळ वाईटच इच्छा बांधतात, जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकवतात असं नाही. इच्छा चांगली असो वा वाईट, देहबुद्धीतून प्रसवली असेल तर सदिच्छाही बाधकच आहे.