आयटी युगात एखाद्याने पाच वष्रे एखाद्या कंपनीत नोकरी केली तरी अनेकांच्या भुवया उंचावतात. अगदी कंपनीच्या स्थापनेच्या प्रक्रियेत असलेल्या अनेकांनाही ते कालांतराने जमत नाही. असे असताना तब्बल २८ वष्रे एकाच कंपनीत काम करणारे यू. बी. प्रवीण राव यांना इन्फोसिसने नुकतेच अध्यक्षपदावर विराजमान केले आहे. कामाची चिकाटी, प्रचंड बुद्धिमत्ता, नव्या संकल्पनांचे निर्मिती स्थान म्हणून राव यांची इन्फोसिसमध्ये ख्याती आहे. पण सार्वजनिक क्षेत्रात हे नाव तसे अपरिचितच आहे.
इन्फोसिसच्या स्थापनेनंतर काही वर्षांतच कंपनीत रुजू झालेले राव हे नारायण मूर्ती यांचे निकटवर्तीय मानले जातात. इन्फोसिसचे भावी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात आहे, त्यांच्यापैकी राव हे एक आहेत. बेंगळुर विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी काही कालावधीतच इन्फोसिसमध्ये नोकरी स्वीकारली. त्यांची निवड ही खुद्द नारायण मूर्ती आणि एन. एस. राघवन यांनी केली होती. कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय उच्चाधिकारी म्हणूनही राव यांची ओळख आहे. इन्फोसिसमध्ये त्यांनी विविध महत्त्वाची पदे भूषविली. कालांतराने त्यांना कार्यकारी मंडळावर बढती देण्यात आली. तेथे काम करत असताना त्यांनी संचालक मंडळासोबत व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने डावपेच आखताना महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलिया येथे इन्फोसिसच्या संचालक मंडळावर काम केले.
अमेरिकेची आर्थिक स्थिती मजबूत झाल्याने २०१४ मध्ये आऊटसोर्सिगची कामे वाढणार असल्याचा आयटीतज्ज्ञांचा अंदाज आहे. टीसीएसला स्पर्धा देण्यासाठी कंपनीच्या उच्चपदांवर बदल करणे नारायण मूर्ती यांना गरजेचे वाटले. राव हे नाव कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने, व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने चांगले आहे, यामुळे मूर्ती यांनी राव यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी दिली. इतकेच नव्हे तर आपली प्रतिमा जपणारे मूर्ती यांनी राव यांना पुढे करून स्वत:चा मुलगा कंपनीत उच्चपदावर कार्यरत असूनही त्याच्याऐवजी कंपनीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना संधी दिल्याचे दाखविल्याचेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. येत्या आर्थिक वर्षांत आयटी क्षेत्राला सुगीचे दिवस येणार असून त्यानिमित्ताने येणाऱ्या व्यावसायिक संधींचे सोने करण्याची क्षमता राव यांच्यात असल्याचा विश्वास उच्चपदस्थांना वाटतो. हा विश्वास राव खरा करतीलही, पण त्यांच्यात महत्त्वाकांक्षेचा अभाव असल्याचे कंपनीतील माजी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राव यांची कंपनीतील लोकप्रियता कर्मचाऱ्यांमध्ये काम करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणारी असल्याचेही इन्फोसिसकरांचे म्हणणे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jan 2014 रोजी प्रकाशित
यू. बी. प्रवीण राव
आयटी युगात एखाद्याने पाच वष्रे एखाद्या कंपनीत नोकरी केली तरी अनेकांच्या भुवया उंचावतात. अगदी कंपनीच्या स्थापनेच्या प्रक्रियेत असलेल्या अनेकांनाही ते कालांतराने जमत नाही.

First published on: 10-01-2014 at 03:38 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaiktivedh ub pravin rao