गेल्या आठवड्यात जगभरात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले ते फेसबुक. तब्बल सहा तास ठप्प झालेली सेवा, पाठोपाठ फ्रान्सिस हॉगेन यांचा अमेरिकी काँगे्रसमधला गौप्यस्फोट आणि नोबेलविजेत्या मारिया रेसा यांची धारदार टीका या घटनांनी माध्यमविश्व व्यापले. यानिमित्ताने माध्यमांनी फेसबुक या बलाढ्य समाजमाध्यम कंपनीच्या अंतरंगात डोकावत आंतरजालकालीन समाजापुढील आव्हाने अधोरेखित केली आहेत.
एका दशकापूर्वी फेसबुकची सेवा अगदी एक-दोन दिवस खंडित झाली तरी फार कुणाची तक्रार नसायची. आता एखादा तास ती ठप्प झाली तरी गहजब होतो. आपण रात्रंदिवस फेसबुकविश्वात वावरावे, असे वाटणाऱ्यांची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढली, याकडे ‘बीबीसी’च्या एका वृत्तलेखात लक्ष वेधण्यात आले आहे. त्याचे शीर्षक आहे- ‘फेसबुकचा वाईट आठवडा’. त्यात फेसबुकसंबंधित घडामोडींबरोबरच कंपनीच्या धोरणात कसा बदल होत गेला, हे स्पष्ट करण्यात आले आहे.
फेसबुक ठप्प झाल्याने वापरकत्र्यांमध्ये इतकी अस्वस्थता का निर्माण झाली, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न काही माध्यमांनी केला. फेसबुकची सेवा ठप्प झाल्याने आपले समाजमाध्यमांवरील अवलंबित्व अधोरेखित झाले. समाजमाध्यमपूर्व काळात आपण स्वत:ला कसे व्यग्र ठेवत होतो, कुतूहल आणि एकटेपणा कसा दूर करत होतो, याची उजळणी अनेक माध्यमांबरोबरच ‘सीएनएन’ने केली. फेसबुकसारख्या आभासी विश्वात रममाण असणारे समाजमाध्यमी खरे तर प्रत्यक्षात एकटे असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळेच एकटेपणा दूर करण्याचा उपाय म्हणून ते समाजमाध्यमांत वावरून समाजाशी जोडण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, फेसबुक ठप्प झाले तसे आपणही या चक्रव्यूहातून बाहेर पडले पाहिजे, असे ‘सीएएन’च्या संकेतस्थळावरच्या एका लेखात म्हटले आहे.
फेसबुक सुरक्षिततेपेक्षा नफेखोरीला प्राधान्य देत असल्याच्या फ्रान्सिस हॉगेन यांच्या गौप्यस्फोटानंतर ‘द गार्डियन’ने या समाजमाध्यम कंपनीवर कठोर टीका केली. हे समाजमाध्यम ‘समाजविरोधी’ असल्याची टिप्पणी ‘द गार्डियन’ने केली. शिवाय फेसबुक हद्दपार झाले पाहिजे आणि मानवाधिकार आणि लोकशाहीशी सुसंगत दुसरा पर्याय पुढे आला पाहिजे, असा सूर ‘द गार्डियन’च्याच दुसऱ्या लेखात आढळतो. आपल्या दैनंदिन जीवनावर समाजमाध्यमांचा प्रभाव किती खोल आहे, याचा दाखला देणारा लेख ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये आहे.
अरब देशांत द्वेषपूर्ण भाषणांवर अंकुश ठेवण्यात फेसबुक अपयशी ठरले, याकडे ‘अरब न्यूज’ने लक्ष वेधले आहे. अमेरिकी निवडणुकीतील रशियाच्या हस्तक्षेपापासून ते सेवा ठप्प होईपर्यंतच्या अनेक घटनांचे दाखले ‘अरब न्यूज’बरोबरच बहुतांश माध्यमांनी दिले आहेत.
ऑस्ट्रेलियात फेसबुकवरील मजकुराचा मोबदला घेण्यासाठी या समाजमाध्यमाशी वाटाघाटी करण्याची संधी पारंपरिक माध्यमांना कायद्यानेच दिली आहे. या कायद्याचे सूतोवा करताच गेल्या फेब्रुवारीमध्ये ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’, ‘नाइन न्यूज’, ‘एबीसी’ आणि ‘द ऑस्ट्रेलियन’चा मजकूर फेसबुकने हटवला होता. याचा दाखला ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’ने यानिमित्ताने दिला आहे. समाजमाध्यमांच्या धोक्यापासून आपल्या मुलांना सुरक्षित ठेवले पाहिजे. भावी पिढीचे भावविश्व ताब्यात घेण्याची समाजमाध्यमांची महत्त्वाकांक्षा आहे, याकडेही ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’च्या लेखात लक्ष वेधण्यात आले आहे.
‘तथ्य नसेल तिथे सत्यता, विश्वासही नसेल. अर्थात तिथे लोकशाहीही नसेल.’ नोबेलविजेत्या मारिया रेसा यांचे हे विधान फेसबुकसाठी नवी डोकेदुखी ठरले. फेसबुक लोकशाहीसाठी धोकादायक आहे. द्वेषप्रसार आणि खोटी माहिती पसरविण्यावर नियंत्रण आणण्यात फेसबुकला अपयश आले, अशी टीका त्यांनी केली. ही फेसबुकसाठी मोठा धक्का असल्याची टिप्पणी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने केली आहे. आभासी विश्वात डोकावण्यासाठी इतर देशांप्रमाणे फिलिपिन्सच्या जनतेला फेसबुकचा मोठा आधार आहे. फेसबुक म्हणजेच इंटरनेट मानण्याइतकी फिलिपिन्सची जनता फेसबुकवर विसंबून आहे. जवळपास ९७ टक्के फिलिपिन्सची जनता फेसबुक वापरते. त्यामुळे फेसबुकचे सामाजिक दायित्व मोठे आहे, याकडे मारिया यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग यांचे अनेकदा लक्ष वेधले होते. मात्र, झकरबर्ग यांनी उलट मारिया यांनाच उर्वरित ३ टक्के नागरिक काय करतात, असा प्रश्न विचारला होता, असे म्हटले जाते. त्यामुळे अध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांचे प्रस्थ वाढत असताना खोटी माहिती प्रसारणात फेसबुकच्या सहभागाविरोधात मारिया यांनी आवाज बुलंद केला. आता मारिया यांनी हीच भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडल्याने फेसबुकला मोठा फटका बसू शकतो, अशी शक्यता ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या लेखात वर्तविण्यात आली आहे.
संकलन : सुनील कांबळी